
साऱ्या जगभर थैमान घालणाऱ्या कोविड-१९च्या महासाथीच्या उगमाचा शोध अद्याप लागलेला नाही. केवळ सैद्धान्तिक मांडणीच केली गेली.
भाष्य : राज को राज ही रहने दो!
साऱ्या जगभर थैमान घालणाऱ्या कोविड-१९च्या महासाथीच्या उगमाचा शोध अद्याप लागलेला नाही. केवळ सैद्धान्तिक मांडणीच केली गेली. त्यामुळे भविष्यातील उपाययोजनांना काहीशी खीळ बसू शकते. ‘चीनने हा विषाणू मुद्दामहून प्रयोगशाळेबाहेर आणला. जगभर साथ फैलावली’ हे अमेरिकेला सांगायचे आहे. परंतु त्यासाठीचे भक्कम पुरावे त्यांच्याकडे असल्याचे अद्याप तरी दिसलेले नाही.
जागतिक आरोग्य संघटनेने कोविड-१९ ही जागतिक महासाथ असल्याचे ११ मार्च २०२० रोजी जाहीर केले. भारतामध्ये २४ मार्च २०२० रोजी देशव्यापी टाळेबंदी जाहीर करण्यात आली. अवघ्या जगाला सुमारे तीन वर्षे वेठीस धरलेल्या कोविडच्या साथीस चीनमधील वुहान प्रांतातून प्रारंभ झाला असला तरी त्याच्या उद्गामाचे रहस्य काही उलगडले गेले नाही, कदाचित उलगडणारही नाही. अमेरिकेच्या विविध गुप्तचर संस्था कोविडच्या उद्गामाचे रहस्य भेदण्याचे काम ‘त्यांच्या दृष्टीने’ करीत आहेत. नुकतेच अमेरिकेच्या ऊर्जा विभागाने कोविडचा विषाणू प्रयोगशाळेतून बाहेर निसटल्यामुळे (लॅब लिक थिअरी) साथ सुरू झाल्याची शक्यता मांडली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कोविडचा उद्गम चर्चेचा विषय झाला आहे.
विषाणू प्रसाराच्या काही शक्यता आहेत, त्या कोविड विषाणूबाबातही लागू पडतात. या शक्यता म्हणजेच कोविड प्रसाराविषयीची गृहितके! एका गृहितकानुसार कोविडचा विषाणू, सार्स-कोव्ह-२, कोविडची बाधा झालेल्या प्राण्यापासून थेट माणसामध्ये संक्रमित होतो. अशा तऱ्हेने बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या अन्य व्यक्तींमध्ये संक्रमण होऊ शकते. ही शक्यता किंवा गृहितक गांभीर्याने घेतले जात नाही. कारण माणूस अशा प्राण्यांच्या संपर्कात येण्याची शक्यता खूप कमी असते.
दुसऱ्या गृहितकानुसार बाधित प्राण्यांचे मांस अन्य खाद्यपदार्थांसोबत रेफ्रिजरेटरमध्ये अधिक काळ टिकण्यासाठी ठेवले जाते. हे मांस आणि त्यासोबतचे खाद्यपदार्थ हाताळताना, त्यांना वेष्टण लावताना विषाणूचे संक्रमण माणसामध्ये होऊ शकते. चीनने कोविडबाबत प्रसृत केलेल्या या गृहितकाकडे कोणीही गांभीर्याने पहिले नाही. तिसऱ्या गृहितकानुसार मूळ बाधित प्राण्यांच्या सानिध्यात आलेल्या प्राण्यांमध्ये किंवा मूळ बाधित प्राण्यांच्या शरीरद्रव्याच्या- लाळ, विष्ठा, मूत्र संपर्कात आलेले प्राणी बाधित होऊ शकतात. हे प्राणी माणसाच्या सानिध्यात आल्यास अशा मध्यस्थ प्राण्यापासून कोविडचा मानवामध्ये प्रसार होऊ शकतो. अशा व्यक्तींच्या संपर्कामुळे साथ पसरू शकते. हा सिद्धांत (अनेक माध्यमांनी थिअरी हा शब्द वापरला आहे.) कोविडच्या साथीबाबत सर्वाधिक स्वीकारार्ह समजाला जातो. त्या दृष्टीने संशोधन करत असताना विषाणूंच्या उत्क्रांतीमधील काही टप्पे गायब झाल्याचे आढळले, म्हणजे त्यांचे पुरावेच सापडले नाहीत. मूळ प्राण्यामधील विषाणूची जनुकरचना आणि त्या विषाणूमुळे बाधित झालेल्या माणसामधील विषाणूची जनुकरचना यामध्ये फरक आढळतात.
विषाणू उत्क्रांत होत असतात. उत्क्रांत होण्याचे टप्पे असतात, ते क्रमाने घडल्याचे न आढळल्यास त्याच्या उत्क्रांतीचा एखादा टप्पा अन्य प्राण्यांच्या मध्यस्थ प्राण्याच्या शरीरात हा विषाणू असताना घडला असल्याचे समजले जाते. कोविडचा विषाणू सतत बदलणारा आणि कुत्री, खवलेमांजरे व तत्सम प्राण्यांमध्येही संक्रमित होत असल्याचे आढळून आले आहे. या सिद्धांताला नैसर्गिक संसर्ग असेही म्हणतात. परंतु अद्याप मध्यस्थ प्राणी व प्रथम संक्रमित प्राणी निश्चित होऊ शकलेला नाही.
अजून एका गृहितकानुसार विषाणूंविषयी संशोधन करणाऱ्या प्रयोगशाळांमधून, संशोधन संस्थांमधून शास्त्रज्ञांच्या अनावधानाने, निष्काळजीपणामुळे विषाणू प्रयोगशाळेबाहेर येऊ शकतो; किंवा शास्त्रज्ञ, प्रयोगशाळेतील सहाय्यक कर्मचारी वर्ग जाणूनबुजून विषाणू बाहेर पडेल, असे वर्तन करतो. या सिद्धांताला ‘अमेरिकेचा प्रयोगशाळेतून विषाणू गळती सिद्धांत’ (अमेरिकन लॅब लिक थिअरी) असेही म्हटले जाते. कारण अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोविडची साथ चीनने जगभर पसरविली अशी विधाने केली. अमेरिकी गुप्तचर संस्था त्या दृष्टीने सोयीस्कर निष्कर्ष मांडीत राहिल्या. अर्थात त्याला चीनचे वर्तन आणि कोविडच्या प्रारंभाचे ठिकाण त्याहून अधिक जबाबदार आहे, हेही तितकेच खरे!
एकतर कोविड विषाणूचा प्रादुर्भाव जगात सर्वप्रथम चीनच्या वुहान प्रांतात झाला. येथेच जिवंत प्राण्यांचे बाजार भरतात. प्राणी मारून, कापून, तेथेच विकले जातात. या शहरातच द वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी आहे. अगदी प्रारंभी या प्रयोगशाळेतील कर्मचाऱ्यांना नव्या आजारांमुळे तेथील दवाखान्यात दाखल करावे लागले होते. त्यामुळे अर्थातच चीनकडे संशयाची सुई जातेच. या गृहितकास पुष्टीसाठी अन्य काही तार्किक कारणे आहेत, ती म्हणजे तपासकामात चीनने अपेक्षित सहकार्य न कारणे, वाजवीपेक्षा ‘मोठ्या आवाजात’ कोविडचे खंडन करणे, खंडन करणाऱ्या शास्त्रज्ञांचे फसवे वर्तन इ. शास्त्रज्ञांचे पथक वुहान येथील मासे व जनावरांच्या बाजारात शोधकार्यास प्रारंभ करण्यापूर्वीच तेथेच निर्जंतुकीकरण करण्यात आले होते. तेथील बहुतेक सर्व प्राणी मारून टाकल्याचे वृत्त होते.
हे गृहितक किंवा कोविड प्रसाराचा सिद्धांत अमेरिकेने उच्चरवात सांगणे यामागे वेगळाच सिद्धांत वा गृहितक आहे. चीनने हा विषाणू मुद्दामहून प्रयोगशाळेबाहेर आणला. जगभर साथ फैलावली हे अमेरिकेला सांगायचे आहे. परंतु त्यासाठीचे भक्कम पुरावे त्यांच्याकडे नाहीत. शास्त्रीय पुरावाही या सिद्धांतासाठी पुरेसा नाही. काही साहसी व चौकस शास्त्रज्ञांच्या (यामध्ये पुण्यातील शास्त्रज्ञही आहेत) स्वतंत्र संशोधनामुळे प्रचंड विदा आंतरजालावर प्रसृत करण्यात आली आहे. त्यामुळे ‘लॅब लिक थिअरी’कडे सर्वांचे लक्ष आहे. चीनचा कावेबाजपणा आणि धूर्तपणाही या सिद्धांतास तार्किकदृष्ट्या पुष्टी देतो.
आता अमेरिकेच्या ऊर्जा विभागाने कोविडचा प्रारंभ चीनमधील प्रयोगशाळेतून विषाणू गळतीमुळे झाला असावा असा अहवाल ‘द वॉलस्ट्रीट जर्नल’ने सर्वप्रथम प्रसिद्ध केला. त्यानंतर तो अमेरिकी संसदेपुढे मांडण्यात आला. याच ऊर्जा विभागाचे यापूर्वी कोविडच्या उद्गमाबाबत वेगळे मत होते. ‘द वॉलस्ट्रीट जर्नल’ने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले की, ऊर्जा विभाग आपल्या अहवालाबाबत ठाम नाही. याचाच अर्थ असा की, ऊर्जा विभागाकडे सबळ पुरावे नाहीत. तरीही हा अहवाल अमेरिकी संसदेपुढे मांडण्यात आला, हे विशेष! अर्थात यातून कोविडचे रहस्य उलगडत नाही.
राजकारणाची विज्ञानावर मात
कोविडचा विषाणू चीनने प्रयोगशाळेत जनुक अभियांत्रिकीच्या सहाय्याने निर्माण केला आणि जैविक अस्त्र म्हणून वापरला असे मानणारेही काही कमी नाहीत. चीन हे सर्व प्रकार राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे ठासून सांगत आहे. द वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीमधील विषाणू संशोधनासाठी अमेरिकेतील पिटर दस्झाक या शास्त्रज्ञाची एकोहेल्थ अलायन्स ही कंपनी अर्थसहाय्य करते. तिचे अध्यक्ष पीटर दस्जॅक हे कोविड साथीच्या प्रारंभी वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. अमेरिकेतीलच नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठातील विषाणूतज्ञ राल्फ बारीक हेही वुहान प्रयोगशाळेशी संलग्न राहून संशोधन करीत होते. त्यांनी त्यांच्या आर्थिक फायद्यासाठी विषाणू अधिक संक्रमणशील कसे होतील, याविषयी संशोधन केल्याचे त्यांच्या आणि पीटर दस्झाक यांच्यातील ई-मेलवरून समोर आले आहे. पीटर दस्झाक यांनी ते नाकारले असून, कोविडची साथ नैसर्गिक संक्रमणामुळे पसरल्याचे निवेदन केले आहे.
कोविडचा उद्गम जगाला बहुधा कळणार नाही आणि कळूही दिला जाणार नाही. यामागे स्वार्थ आहेत. सर्वांचेच वर्तन संशयास्पद आहे. कोविड महासाथीच्या बिकट प्रसंगी जगाने एकजुटीने सामोरे जायला हवे होते. परंतु दुर्दैव म्हणजे, हा विषय ना जागतिक आरोग्य संघटनेने व्यवस्थित हाताळला, ना अमेरिकेने, ना शास्त्रज्ञांनी, ना राजकीय नेत्यांनी! विषाणूंमुळे उद्भवणाऱ्या साथींचे मूळ शोधणे आणि सापडणे अत्यंत महत्त्वाचे असते. भविष्यात अशा साथी उद्भवल्यास त्या अनुभवाचा आणि ज्ञानाचा उपयोग होऊ शकतो. प्रादुर्भावाचे प्रमाण, मृत्यूंची संख्या, यांवर नियंत्रण मिळविता येऊ शकते. मानवी इतिहासात साथींवर कशी मात केली किंवा जग साथींना कसे सामोरे गेले याला विशेष महत्त्व आहे. शास्त्रज्ञ मोठ्या उद्योगांच्या दावणीला बांधल्यासारखे विकले गेले असतील तर अशा साथी कोण रोखणार? कोविडचा उगम शोधण्यातले अपयश हा विज्ञानाचा पराभव नाही. परंतु जागतिक राजकारणाने विज्ञानावर केलेली मात आहे, असे नक्कीच म्हणता येईल.
(लेखक विज्ञानविषयक घडामोडींचे अभ्यासक आहेत.)