‘ताईगिरी’चा सेरेनापट

विजेतेपद, विक्रम यांच्या जोडीने आपली प्रभावशाली कारकीर्द सेरेना विल्यम्सने टेनिसच्या कोर्टवर निर्माण केली. महिला टेनिसचे एक युग तिने आपल्याभोवती विणले होते आणि मैदानही गाजवले होते.
serena williams
serena williamssakal
Summary

विजेतेपद, विक्रम यांच्या जोडीने आपली प्रभावशाली कारकीर्द सेरेना विल्यम्सने टेनिसच्या कोर्टवर निर्माण केली. महिला टेनिसचे एक युग तिने आपल्याभोवती विणले होते आणि मैदानही गाजवले होते.

विजेतेपद, विक्रम यांच्या जोडीने आपली प्रभावशाली कारकीर्द सेरेना विल्यम्सने टेनिसच्या कोर्टवर निर्माण केली. महिला टेनिसचे एक युग तिने आपल्याभोवती विणले होते आणि मैदानही गाजवले होते.

दिग्गज खेळाडूंची दोन श्रेणींमध्ये तुलना होत असते. पहिली श्रेणी मिळवलेल्या विजेतेपदाची आणि केलेल्या विक्रमांची असते; पण दुसरी श्रेणी इम्पॅक्ट अर्थात प्रभाव पाडणाऱ्या खेळाडूंची असते. विक्रम कधी ना कधी मोडले जातात, त्यांची जागा नवे खेळाडू घेतात. पण एखाद्या खेळाडूचा प्रभाव अमर्यादीत रहातो. महान महिला टेनिसपटू सेरेना विल्यम्स खरं तर दोन्ही श्रेणीतील हक्काने स्थान मिळवलेली टेनिसपटू. किती ग्रँड स्लॅम जिंकले यापेक्षा तिने महिला टेनिसचे एक युग आपल्याभोवती विणले म्हणून न्यूयॉर्कमध्ये सुरू असलेली यूएस ओपन स्पर्धा मध्यावर आली असली तरी चर्चा मात्र एकट्या सेरेनाची. ही आपली अखेरची स्पर्धा असल्याचे अगोदरच जाहीर करणारी सेरेना तिसऱ्या फेरीत हरली आणि अख्या टेनिसविश्वासमोर सेरेनापट तरळला. मार्गारेट कोर्ट, बिली जिन किंग या महान महिला टेनिसपटूंचा खेळ पाहणारी पिढी आता कदाचीत नसेल, पण मार्टिना नवरातिलोवा आणि स्टेफी ग्राफ या सम्राज्ञींची दुसरी पिढी पाहिलेले अनेक जण आहेत. त्यानंतर महिला टेनिस म्हणजे सेरेना असे समीकरण अनेकांनी अधोरेखित केले. आपल्या ताईगिरीने सुरू केलेला झंझावात वयाच्या ४१व्या वर्षी सुपरमॉमचेही बिरूद पाठीशी ठेऊन थंडावला.

ना थकली, ना जिद्द हरली

वयाच्या सतराव्या वर्षी पहिले ग्रँड स्लॅम आणि पस्तीसाव्या वर्षी तेवीसावे ग्रँड स्लॅम विजेतेपद ही आकडेवारी थक्क करणारी याचसाठी कारण तिशीनंतर निवृत्तीचे वेध लागलेले असतात दुखापतींची कुरबूर सुरू झालेली असते. दमसासही कमी जास्त प्रमाणात होत असतो; पण सेरेना ना थकली ना जिद्दीमध्ये कमी पडली. म्हणूनच शोकेसमध्ये विजेतेपदाचे जेवढे करंडक असतील त्यापेक्षा तिचा महिला टेनिसचा दबदबा पुढच्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. वयाच्या चौथ्या वर्षी टेनिस रॅकेट हातात घेतलेल्या सेरेनाच्या या उत्तुंग भरारीत तिच्या वडिलांचा मोठा वाटा आहे, म्हणूनच शनिवारी पराभवानंतर तिला प्रथम वडील आठवले. ‘थँक्यू डॅडी अँड मॉम’, हे पहिले शब्द तिच्या मुखातून निघाले.

प्रत्येक महान खेळाडूचा प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी असतो. सेरेनासह तिची बहिण व्हिनस हीसुद्धा दिग्गज खेळाडू. पण सेरेनाचे नेहमीच एक पाऊल पुढे राहिले. पण म्हणतात ना यशाने पायाशी लोळण घेतली तरी एखादे स्वप्न अपुरेच राहते. महिला टेनिसमध्ये सर्वाधिक २४ ग्रँड स्लॅम विजेतेपदाचा मार्गारेट कोर्ट यांचा विक्रम सेरेनाला मोडता आला नाही. तेवीसवरच पूर्णविराम मिळाला असला तरी यापुढे जेव्हा जेव्हा महान महिला टेनिसपटूंचा उल्लेख केला जाईल, तेव्हा तेव्हा मार्गारेट कोर्ट यांच्यासह सेरेनाही तेथे असेल. युएस ओपन आपली अखेरची व्यावसायिक स्पर्धा असेल, असे सेरेनाने भले स्पर्धा सुरू होण्याअगोदर सांगितले असले तरी तिने किंवा डब्ल्यूटीए या व्यावसायिक महिला टेनिस संघटनेने निवृत्तीचे अधिकृत भाष्य केले नाही.

निवृत्तीच्या प्रश्नांना सेरेनाने बगल दिली असली तरी शनिवारी आर्थर अॅश सेंटर कोर्टवर सेरेनाचा जवळपास निरोपाचाच सोहळा होत होता. डोळ्यातील अश्रू ती लपवू शकत नव्हती. अमेरिकेच्या माजी फर्स्ट लेडी मिशेल ओबामा यांच्यापासून सेरेनाची प्रतिस्पर्धी नाओमी ओसाका कोको गॉफ या खेळाडू कोर्टवर उपस्थितीत राहून सेरेनाच्या निवृत्तीचा हा क्षण डोळ्यात साठवत होत्या. चोवीसावे विक्रमी ग्रँड स्लॅम विजेतेपद सेरेनाला कदाचीत खुणावत असेल. पुन्हा कोर्टवर येणे आता सोपे नसेल, पण महिला टेनिसमध्ये सेरेनायुग मात्र पूर्ण झाले हे निश्चित.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com