corona
corona

भाष्य :  'कोरोना'मुक्तीचा वैज्ञानिक झगडा

"कोरोना'च्या साथीने आपल्याला बरंच काही शिकवलं आहे. घरात "निष्काम' बसायला लावून अंतर्मुख केलं आहे. त्याचबरोबर सारे वैद्यक ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान; सारी वैद्यकसृष्टीच जणू पणाला लागली आहे. एकूणच एका अतिसूक्ष्म शत्रूशी दोन हात करता करता त्या शत्रूच्या काही खोडी आता माहिती झाल्या आहेत आणि त्यानुसार शस्त्रास्त्र परजणे चालू आहे. या ज्ञानसंचिताचा हा मागोवा. 

म्हटलं तर 125 नॅनोमीटर इतका सूक्ष्म आणि जेमतेम तीस गुणसूत्रांची लड बाळगून असलेला हा "सार्स कोव्ह 2' नामक इवलासा जीव. याला जीव म्हणावं का हासुद्धा  प्रश्‍नच आहे जीवशास्त्रापुढे. पण या विषाणूला जणू दहा हात आहेत आणि एकाच वेळी वेगवेगळ्या हातानं तो माणसाच्या वेगवेगळ्या अवयवांवर घाव घालतो. याच्या चित्रात जी शिंगं शिंगं दिसतात ना त्याच्याच मदतीनं हा आपल्या पेशींना चिकटतो. त्यातही "एसीई' नावाचं द्रव्य असलेल्या पेशी याच्या लाडक्‍या. मधुमेहींत तर "एसीई' जरा जास्तच असतं. म्हणून मधुमेहींवर हा लुब्ध. हे "एसीई' असतं फुफ्फुसात, आतड्यात आणि रक्तवाहिन्यांत. म्हणूनच फुफ्फुसं, श्‍वसन, पचन, रक्त साकळण्याची क्रिया वगैरेंवर हा मर्मभेदी हल्ला करतो. 

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही की जवळपास 80 टक्के लोकांना या विषाणूची लागण झाली तरी बाधा होत नाही. हे लोक आपोआप बरे होतात. उरलेल्या विसातील जवळपास सतरा लोक वाचतात. शंभरीत तीन जण मृत्युमुखी पडतात. थोडक्‍यात "कोरोना' बरा करणारं औषध नसलं, तरी तीन टक्के वगळता बाकीचे वाचतील, असे उपचार मात्र आहेत. आजाराची सुरुवात तशी आस्ते कदम होते. पांढऱ्या पेशी कमी होतात. बऱ्याच विषाणूजन्य आजारांचं हे एक लक्षण. मग सीआरपी, फेरिटीन, डी डायमर या दूतांद्वारे शरीरात सूज पसरत असल्याचा सांगावा येतो. सुमारे चौदा दिवसांनंतर हा विषाणू शरीरात सापडतही नाहीच. पण त्याच्यामुळे आलेली सूज चालू राहाते. ती घातक ठरते. शरीरात कोणताही परका पदार्थ शिरला; मग तो एखादा विषाणू असो, जिवाणू असो, अथवा मलेरियाचा परोपजीवी असो, त्याचा शरीरात जिथे वास तिथे आजूबाजूला सूज येते. सूज म्हणजे आपल्या प्रतिकारशक्तीनं त्या शत्रूविरुद्ध रचलेला चक्रव्यूह. यामुळे शत्रूचा नायनाट केला जातो; पण काही वेळा, "कोरोना'सारख्या विषाणूमध्ये हे गणित चुकतं. लाभ होण्याऐवजी शरीराची हानी होते. अतिप्रमाणात सूज येते, सर्वदूर सूज येते आणि विषाणू नष्ट होऊनही सूजेवर आपलं नियंत्रण राहत नाही. अशी सूज येऊ नये आणि आलीच तर आटोक्‍यात राहावी म्हणून हायड्रॉक्‍सीक्‍लोरोक्वीन, इंडोमेथॅसिन अशी औषधे वापरली जात आहेत. या विषाणूचे काही गुणधर्म जिवाणूसदृश आहेत, बॅक्‍टेरियासारखे आहेत, त्यामुळे "अझिथ्रोमायसीन'सारखं (अँटिबायोटिक) प्रतिजैविक वापरलं जातं. 

आणखी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

या सूजेच्या परिणामी शरीरात त्या त्या परकीयाविरुद्ध प्रतिपिंडे (Antibodies) तयार होतात. आजारातून नुकत्याच उठलेल्या व्यक्तीत अशी तयार प्रतिपिंडे असतातच. ही रेडिमेड प्रतिपिंडे नव्या आजाऱ्यांना टोचायची आणि आजार रोखायचे, हीदेखील जुनी युक्ती. रेबिज, धनुर्वात अशा आजारात रामबाण ठरलेली. "कोरोना'विरुद्ध ही शक्ती आजमावून पाहणं चालू आहे. या सर्वदूर सुजेबरोबरच प्लेटलेट्‌स कमी होतात. प्लेटलेट्‌स म्हणजे खरं तर रक्तातील काही खास पेशींचे कपटे. यांचा मुख्य उपयोग रक्तवाहिन्यांची सातत्याने दुरुस्ती करण्यासाठी होतो. केशवाहिन्या नाजूक असतात. रोज त्यांना बारीक छिद्रे पडत असतात. ही सूक्ष्म छिद्रे तातडीने बुजवली नाहीत, तर आतल्या आत रक्तस्त्राव होतो. इतकंच काय रक्तवाहिन्यांची अंत:त्वचाही हळवी असते. काही कारणानं, उदा: सूज येऊन ती खडबडीत झाली तर ती ताबडतोब गुळगुळीत 

करावी लागते. हे प्लेटलेट्‌सच्या गिलाव्यानं साधले जाते. हे साधलं नाही तर तिथं रक्तप्रवाह थांबतो. अशा प्रकारे रक्तप्रवाह कुंठित होणं कोणत्याही प्रकारे परवडण्यासारखं नसतं. त्यामुळे प्लेटलेट्‌स कमी झाल्या की एका बाजूला रक्तस्रावाचा धोका वाढतो आणि त्याच वेळी रक्त ठिकठिकाणी साकळतं. 

रक्त प्रवाहित राखण्याची नैसर्गिक क्रिया ही गुंतागुंतीचं संतुलन साधून असते. मात्र "कोरोना'सारख्या आजारांमध्ये दोन्हीकडचा तोल सांभाळता सांभाळता आपला जणू दोन्हीकडे तोल जातो. काही रुग्णांत हाडातील मगजावर हा विषाणू हल्ला चढवतो. इथं रक्तातील विविध पेशी बनत असतात. पेशींच्या कारखान्यावर हल्ला झाल्यामुळे अशा रुग्णांत पांढऱ्या पेशी कमी होतात, प्रतिकारशक्ती डळमळीत होते. अशा पेशंटला इतर संसर्ग सहज होतात. हे तर चक्क "एचआयव्ही'सारखं वागणं झालं. त्यामुळेच "एचआयव्ही'विरोधी औषधे (उदा : रेमडेसीविर) वापरून पाहिली जात आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

आपली फुफ्फुसं हे या विषाणूचं लाडकं मैदान. ताप, खोकला, धाप आणि अंतिमतः प्राणवायूचं चलनवलन बंद होऊन प्राणोत्क्रमण हे सारं या फुफ्फुसातल्या सुजेमुळे घडतं. पण "कोरोना'चं वैशिष्ट्य हे की यात शरीरातील प्राणवायू कमी होत जातो; मात्र त्या मानानं रक्तातील कार्बनडाय ऑक्‍साईड फारसा वाढत नाही. यामुळेच की काय, रुग्ण सावध आणि दिसायला बरा दिसतो; पण ऑक्‍सिजन मात्र चिंताजनकरीत्या कमी झालेला असतो. अशा अवस्थेला "हॅपी हायपॉक्‍शिया' असं नाव आहे. परिस्थिती बिकट होते तेव्हा जणू कडेलोट होतो. झपाट्याने रुग्ण रसातळाला जातो. त्यामुळे ऑक्‍सिजन, कार्बनडाय ऑक्‍साईड, प्लेटलेट, डीडायमर हे सातत्यानं तपासावं लागतं. फुफ्फुसातल्या सुजेमुळं सायटोकाइन नावाची द्रव्यं तयार होतात. "सायटोकाइन' वाढल्यामुळे रक्त साकळण्याची क्रिया जलद होते आणि शरीरात बारीक-बारीक रक्तवाहिन्यांत सर्वदूर रक्त साकळतं. ज्या त्या अवयवाला ऑक्‍सिजनची उणीव भासते. ऑक्‍सिजन कमी झाल्यानंही रक्त साकळतं. सारे अवयव एकाच वेळी गळाठून जातात आणि पाठोपाठ येते "सायटोकाईन स्टॉर्म'. सायटोकाइनची जणू ढगफुटी होते. एखाद्या वादळात होत्याचं नव्हतं व्हावं, तसं फुफ्फुसाचं कार्य थोड्या कालावधीत पूर्णतः बाधित होतं. बहुतेकदा यातच मृत्यू होतो. 
ही साथ ओसरेल काय आणि कधी, हे प्रश्‍न प्रत्येकाच्या मनात आहेत. प्रतिबंधक उपाय आणि प्रभावी औषधांचा शोध कधी लागेल, हे सांगता येणार नाही. पण अनेक साथी आल्या आणि गेल्या असं इतिहास सांगतो. त्यातील अनेकांवर प्रभावी लस वा औषधं नव्हती, काहींवर अजूनही नाहीत. सध्याची भीतीची साथ आधी ओसरेल. जगातील बहुतेक प्रजा "कोरोना'चा सामना करून रोगमुक्त होईल. मग हल्ला करायला ताजे भक्ष्य मिळणं दुरापास्त ठरेल. साथ आटोक्‍यात येईल. अधूनमधून कुठे कुठे हा जंतू आपले प्रताप दाखवेल. हे असं इतका वेळ चालू राहील, की शेवटी माणसं "कोरोना'कडे करुणार्द्र नजर टाकतील, "हम साथ साथ है' म्हणतील आणि आपापल्या कामाला लागतील. 

नव्या युगाच्या नव्या तंत्रज्ञानाच्या साथीनं माणसानं लढवलेली ही पहिलीच साथ. बिग डेटा, महाप्रचंड माहिती आणि त्याचं वेगवान विश्‍लेषण शक्‍य झाल्यावर उद्भवलेली. आज हे विश्‍लेषण आणि विश्‍लेषणांचे विश्‍लेषण क्षणात सर्वांना उपलब्ध होतं. या संगणक युगात प्रसिद्धीपूर्वीच शोधनिबंधातली माहिती खुली आहे. कॉपीराइट वगैरे जाऊन आता "कॉपी लेफ्ट'चा जमाना आहे. म्हणजे इथे कॉपी आहे; ज्याला हवी त्यानं ती वापरावी. जेनॉमिक्‍स, ग्लायकॉमिक्‍स, प्रॉटीओमिक्‍स अशा अनवट क्षेत्रात धामधूम चालू आहे. नाना देशातले भले बुद्धीचे सागर, ज्ञानमंथनात गुंतले आहेत. त्यातून उपचार व लसीचे अमृत लवकरच प्राप्त होईल, अशी आशा वाटते ती यामुळेच. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com