वंगबंधू शेख मुजीब

आनंद हर्डीकर
Tuesday, 17 March 2020

दक्षिण आशियाचा भूगोल बदलवणारे ‘वंगबंधू’शेख मुजिबूर रहमान यांची जन्मशताब्दी आज (ता. १७) बांगलादेशात साजरी होत आहे. त्यानिमित्त...

पूर्व बंगालच्या फरीदपूर जिल्ह्यातील टांगीपाडा गावात १७ मार्च १९२० रोजी शेतकऱ्याच्या घरात मुजीबचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्याला गोरगरिबांबद्दल सहानुभूती वाटत असे. घरातले अन्नधान्य तो गरिबांना वाटत असे. कोलकत्त्याला इस्लामिया महाविद्यालयात कला शाखेचे शिक्षण घेत असताना मुजीब राजकारणातही रस घेऊ लागले. त्यांचे वक्तृत्व आणि संघटनाकौशल्य पाहून मुस्लिम लीगच्या स्थानिक नेत्यांनी त्यांना विद्यार्थी संघटनेचे सचिवपद दिले. ते राजकीय चळवळीत भाग घेऊ लागले. त्या काळात मुजीब हे सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाच्या प्रभावाखाली होते. सुभाषचंद्रांनी पूर्वी म्हणजे १९३३ मध्ये लंडनमध्ये एका राजनैतिक परिषदेत केलेल्या भाषणाची पुस्तिका ते सतत जवळ बाळगत असत. देश स्वतंत्र व्हायचा असेल, तर सुभाषबाबूंच्या नेतृत्वाखाली आंदोलन उभारले जायला हवे, असे त्यांना वाटत असे.

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पाकिस्तानची निर्मिती झाल्यानंतर पूर्व विभागात काही काळ उत्साहाचे वातावरण होते खरे. परंतु अल्पावधीतच मुजीबसारख्या असंख्य तरुणांना पश्‍चिम पाकिस्तानातील नेत्यांच्या वर्चस्ववादी धोरणांचा जाचक अनुभव येऊ लागला. सुरवात झाली, बंगाली भाषेच्या स्थानावरून. मार्च १९४८ मध्ये ढाक्‍क्‍यातील सभेत गव्हर्नरजनरल बॅ. महंमद अली जिना यांनी उर्दू हीच पाकिस्तानची राजभाषा राहणार असल्याचे जाहीर करताच मोठा गोंधळ माजला. ‘बंगाली आणि बंगालीच पूर्व पाकिस्तानची राजभाषा झाली पाहिजे’, अशी घोषणा देणाऱ्या युवकांच्या गटाला आणि शेख मुजिबूर रहमान या त्यांच्या नेत्याला पोलिसांनी अटक केली; तथापि मातृभाषेबद्दलच्या अभिमानाने पेटून उठलेल्या संपूर्ण बंगाली समाजाने ती मागणी उचलून धरली. विद्यार्थ्यांनी-प्राध्यापकांनी- साहित्यिकांनी त्या आंदोलनात हालअपेष्टा सोसल्या, बलिदानही केले. पश्‍चिम पाकिस्तानी नेत्यांनी लष्कराचा वापर केला, तरीही शेवटी त्या प्रश्‍नावर पूर्व बंगाली जनतेने विजय मिळवलाच!

अवामी लीग पक्षाचा उदय  
त्या आंदोलनाच्या दरम्यान मुस्लिम लीगच्या विरोधात जनसामान्यांच्या हक्कांसाठी लढू पाहणाऱ्या अवामी लीग या पक्षाचा पूर्व पाकिस्तानात  उदय झाला. मुजीब त्या पक्षाचा उदयोन्मुख नेता म्हणून वावरू लागले. नंतर पक्षाची धुरा त्यांच्याकडे आली. ती जबाबदारी स्वीकारणे म्हणजे पश्‍चिम पाकिस्तानी नेत्यांच्या हडेलहप्पी धोरणांना विरोध करणे, त्यासाठी वेळोवेळी तुरुंगवासाची शिक्षा भोगणे, तुरुंगातून बाहेर पडल्यावर प्रांतिक स्वायत्ततेची मागणी पुढे रेटत राहणे हे ठरल्यासारखेच होते. मुजीबनी हे सारे केले. लष्करशहा अयूबखान यांनी भरलेल्या देशद्रोहाच्या आरोपाखालील खटल्याला ते सामोरे गेले. ‘आगरताळा कट खटला’ उभा राहिला. भारताच्या मदतीने उठाव करायचा आणि पूर्व पाकिस्तान स्वतंत्र करण्याचा कट रचल्याचा आरोप मुजीब यांच्यावर ठेवण्यात आला. ज्या नाटकी पद्धतीने त्या खटल्याचे कामकाज चालवले जात होते, त्यावरून आरोपींना मृत्युदंड ठोठावण्यासाठीच सारा खटाटोप असल्याचे स्पष्ट दिसत होते.

 बांगलादेशाची निर्मिती
तथापि अचानक पश्‍चिम पाकिस्तानातील राजकारणाने वेगळे वळण घेतले. अयूबखानांच्या लष्करशाहीविरुद्ध मोठे लोकआंदोलन उभे राहिले आणि त्याची व्याप्ती वाढत गेली, त्यात अयूबखानांचाच बळी गेला आणि त्यांना दूर सारून सत्तेवर आलेल्या याह्याखान नावाच्या नव्या लष्करशहांनीही कालांतराने लोकशाहीवरील प्रेमाचा देखावा करीत सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली. त्या निवडणुकीत अवामी लीगला मुजीब यांच्या नेतृत्वाखाली पूर्व पाकिस्तानात भरघोस यश मिळाले. परंतु ते यश इतके मोठे आणि निर्विवाद होते, की संपूर्ण पाकिस्तानचीच सूत्रे त्यांच्या हाती सोपवावी लागतील, अशी स्थिती निर्माण झाली. याह्याखानांची तसे करण्याची मुळीच तयारी नव्हती. झुल्फिकार भुट्टो यांच्यासारख्या अन्य नेत्यांनाही पूर्वेचा संभाव्य वरचष्मा मान्य नव्हता. त्यांच्या संगनमतातून पुढे पूर्व पाकिस्तानात लष्करी दमनशाहीचा भीषण नंगानाच सुरू झाला. त्या विरोधात मार्च १९७१ मध्ये मुजीबनी संपूर्ण असहकाराचे आंदोलन छेडले. सगळा बंगाली समाज पश्‍चिम पाकिस्तानी लष्कराच्या विरोधात उभा ठाकला. शिवाय अत्याचारांपासून बचाव करण्यासाठी लाखो लोक भारताच्या आश्रयार्थ धावले. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी त्या सर्वांना आधार तर दिलाच; पण राजनैतिक मुत्सद्देगिरीसह लष्करी व्यूहरचनेतील विजिगीषू कल्पकतेलाही पूर्ण वाव देत पूर्व पाकिस्तानच्या जागी बांगलादेश उदयाला येईल, अशी पावले उचलली.

मुजीब हे पाकिस्तानी तुरुंगात असतानाच त्यांच्या नेतृत्वाखालच्या स्वाधीन बांगलाच्या निर्वासित सरकारला राजनैतिक मान्यता व लष्करी साह्य देऊन भारताने नवा इतिहास घडवला. पाकिस्तानबरोबरच्या युद्धात निर्णायक विजय तर मिळवलाच; पण ९३ हजार पाकिस्तानी सैनिकांना शरणही आणले. त्यानंतर जागतिक दडपणामुळे वंगबंधू मुजीबना सोडून देणे पाकिस्तानला भाग पडले. ते मुक्‍त होऊन भारतामार्गे मायदेशी परतले आणि सरकारचे नेतृत्व करू लागले.बांगलादेशासमोर समस्यांचा प्रचंड डोंगर होता. त्यावर मात करण्याचे मुजीब यांचे प्रयत्न फारसे यशस्वी ठरत नव्हते. असंतुष्ट गट कटकारस्थानांत गुंतले आणि १५ ऑगस्ट १९७५ रोजी त्यांना यश मिळाले. ढाक्‍क्‍यातील अध्यक्षीय प्रासादात घुसून बांगलादेशाच्या काही लष्करी अधिकाऱ्यांनी मुजीब यांची त्यांच्या सर्व उपस्थित कुटुंबीयांसह हत्या केली. परदेशात असणाऱ्या दोन मुली सुदैवाने वाचल्या. सध्याच्या पंतप्रधान शेख हसीना वाजेद त्या दोघींपैकी एक. नंतरच्या काळात त्या देशाने अनेक चढउतार पाहिले, लष्करशहा अनुभवले, तशीच संसदीय लोकशाहीची बूजही राखली. मुजीब त्या देशाचे ‘राष्ट्रपिता’ - ‘जातीर जनक’ किंवा ‘जातीर पिता’ - म्हणून आजही आदराचे स्थान बनून राहिले आहेत. पाकिस्तानची फाळणी घडवून आणण्यात साह्यभूत ठरलेले एक भारतमित्र म्हणून आपल्या देशातही त्यांना मानाचे स्थान आहेच.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sheikh Mujibur Rahman