उडता पंजाब ते पढता पंजाब

उडता पंजाब ते पढता पंजाब

एकेकाळचे सर्वात श्रीमंत राज्य अशी पंजाबची ओळख. आता पंजाबचा विकास खुंटलाय. म्हणून तो मागे पडलाय. या राज्याला गहू आणि तांदळावरील किमान आधारभूत किंमत शक्‍य तितकी अधिक वाढवून हवीय, ज्याआधारे पंजाब देशातील आघाडीचे राज्य म्हणून उदयास येईल.

सिंघू. उत्तरेतून दिल्लीच्या ग्रॅन्ड ट्रंक रोडवर प्रवेश करताना लागणारे पहिलेच गाव. सध्या हे गाव देशातील सर्व वृत्तपत्रांच्या बातम्यांमध्ये झळकत आहे. इथे शेतकऱ्यांनी आंदोलन छेडलंय. यात पंजाबमधील शेतकऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. वृत्तपत्रांचे प्रतिनिधी, छायाचित्रकार आणि कॅमेरामन रोज इथला कानाकोपरा पालथा घालत बातम्या मिळवत आहेत. पटांगणात पिझ्झा लंगर लागलेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे इथे अनेक पुस्तकांनी भरलेली वाचनालयेही आहेत.

वार्तांकन, क्षणचित्रे, राजकारण आणि वाद, कौतुक आणि टवाळीच्या या तुमुल युद्धात एका छायाचित्राने गेल्या आठवड्यात माझे चित्त वेधून घेतले. तरुण छायाचित्रकार मनीषा मोंडल हिने आंदोलन स्थळावरील वाचनालयातील एक खूपच रोचक क्षण तिच्या कॅमेऱ्यात टिपला. तीन महिला वाचनात गढून गेलेल्या. बरं हे सारं इतक्‍या सहजतेने छायाचित्रबद्ध झालं की त्या तिघींना त्याची भनकसुद्धा लागलेली नव्हती.. पण खरी गोष्ट या पुढेच आहे. छायाचित्रातल्या त्या तिघींच्या वर एका रंगवलेल्या बोर्डाने, खासकरून मला, ती गोष्ट सांगितली. तो बोर्ड गुरुमुखी आणि रोमन लिपीत लिहिलेला होता. त्यावर लिहिलेलं होतं... उडता पंजाब नही, पढता पंजाब... त्याचा अर्थ असा की पंजाब अमली पदार्थांसाठी प्रसिद्ध नाही, तर बुद्धिमान लोकांची जिथे निपज होते असा पंजाब.

२०१६ साली आलेला ‘उडता पंजाब' हा चित्रपट कुणी जर का पाहिला नसेल म्हणून सांगतो. पंजाबमधील अफू-गांजाची विक्री आणि त्याच्या आहारी गेलेल्या तरुणाईवर बेतलेला हा चित्रपट या राज्यातील स्थितीचा उपहास (ब्लॅक कॉमेडी) नसून मोठे धाडसी राजकीय विधान त्यातून करण्यात आलेले होते. भाजप आणि अकाली दल मिळून तयार झालेल्या युतीचे सरकार त्या वेळी पंजाबच्या सत्तेत होते. पंजाबमध्ये सामाजिक आणि आर्थिक बदलाचे वारे वाहू लागले होते. त्याच वेळी या राज्यातील तरुणाई अमली पदार्थांच्या आहारी जात असल्याबद्दल चिंता व्यक्त केली जात होती.

राज्यातील प्रत्येक गावांतील तरुण या खाईत लोटला गेला आणि हे सारे सरकारमध्ये बसलेल्या राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने झाले आहे. सुखबीरसिंग बादल यांचा मेहुणा या साऱ्याचा सूत्रधार असल्याचे सांगितले गेले. उडता पंजाब चित्रपटात या मेहुण्याची व्यक्तिरेखाही साकारण्यात आली आहे. पंजाब म्हणजे नशेबाज, सामूहिक बलात्कारी, तस्कर- मग तो राजकारणी असो वा पोलिस- सारेच जण या काळ्या धंद्यामध्ये गुंतल्याचे चित्र या चित्रपटात रंगविण्यात आले. पडद्यावर हे पाहिल्यानंतर साऱ्या देशाच्या नजरा पंजाबकडे वळल्या; परंतु पंजाबच्या या चित्राने त्या राज्यातील अनेकांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. आमच्या पंजाबात समस्या आहेत; पण अशा स्वरूपाच्या नाहीत. हे सत्य सांगण्यास अनेकांनी सुरवात केली. केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांविषयी पंजाब आणि पंजाबींच्या मनात काही म्हणून भीती, अविश्‍वास आणि तक्रारी आहेत. हे राज्य शीखबहुल आहे. ते स्वाभिमानी आहेत. दिल्लीतील कारभाराकडे अर्थात दिल्ली दरबाराकडे पाहण्याची त्यांची एक दृष्टी आहे. पण १९९१ साली उदयास आलेल्या मुक्त अर्थव्यवस्थेच्या वृक्षाला लागलेली फळेही पंजाबच्या पदरात पडली नाहीत.

मॉन्टेकसिंग अहलुवालिया आणि विविध तज्ज्ञांच्या समितीने पंजाबातील शेतीचा आलेख कसा घसरला आहे, याची माहिती सादर केली आहे. २००४-०५ ते २०१९ या १५ वर्षांच्या काळात पंजाबात शेतीत केवळ दोन टक्‍के वाढ नोंदवली गेली. बिहार ४.८ , उत्तर प्रदेश २.९ इतकेच नाही तर हरियाना (३.८) आणि हिमाचल प्रदेशने (२.७) पंजाबला मागे टाकले. महाराष्ट्रातील दरडोई उत्पन्न हे २५ टक्‍के इतके आहे. या राज्यात शेतीत ३.४ टक्‍के वाढ नोंदवली गेली. त्यामुळे दरी वाढल्याचे जाणवते. आकडेवारीतून अधिकच कटू सत्य समोर आले. त्यामुळे किमान आधारभूत किंमत आणि अनुदाने आगामी काळातही कायम राहिलीच पाहिजेत; परंतु पंजाब राज्याने त्यांच्यातील उद्योजकता नव्याने शोधली पाहिजे. जमिनीचा केवळ शेतीसाठीच उपयोग न करता तिचा उद्योजकतेसाठी वापर कसा होईल, याचा विचार इथल्या शेतकऱ्याने केला पाहिजे. हरियानातील शेतकरी ते करीत आहेत. जमिनी गोदामे आणि औद्योगिक कारणांसाठी उपलब्ध करून दिली पाहिजेत. त्यातून नव्या औद्योगिक संधी निर्माण होतीलच. किमान आधारभूत किमतीलाही काही मर्यादा आहेत. त्यावर पूर्णपणे अवलंबून न राहता पंजाबने नवा मार्ग निवडला पाहिजे. नाहीतर बॉलीवूडवाल्यांच्या लेखणीतून प्रसवलेला फुक्रा (फुंकारा) म्हणून पंजाबीची ओळख होण्यास वेळ लागणार नाही.

दरडोई उत्पन्नात पंजाब आघाडीवर
पंजाब आजही दरडोई उत्पन्नात आघाडीवर आहे. इतर राज्यांतील औद्योगिक विकासामुळे पंजाबचे अग्रस्थान डळमळीत झाले. २००२-०३ मध्ये पंजाब पहिल्या क्रमांकावर होता. आजघडीला हे राज्य १३ व्या स्थानापर्यंत खाली घसरले आहे. राज्याचे दरडोई उत्पन्न राष्ट्रीय सरासरीच्या १५ टक्‍क्‍यांवर आहे. गोवा आणि सिक्कीम यांसारख्या छोट्या राज्यांची तुलना सोडा, पंजाब, हरियाना (पाचव्या स्थानी) आणि हिमाचल प्रदेश (१२ व्या) च्याही मागे आहे. यात कौतुकाची बाब म्हणजे बिहारींच्या तुलनेत पंजाबी माणूस सरासरी साडेतीन पटीने श्रीमंत आहे. गोव्यातील व्यक्तींच्या एक तृतीयांश इतकी कमाई करतो. हरियानाने पंजाबला मागे टाकले आहे.

(अनुवाद : गोविंद डेगवेकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com