esakal | कारण विषाणू मत देत नसतो

बोलून बातमी शोधा

Narendra Modi
कारण विषाणू मत देत नसतो
sakal_logo
By
शेखर गुप्ता

कोणताही शक्तिमान नेता आपली चूक कधीच कबूल करत नसतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत गेल्या काही दिवसांत तीन वेळा असे घडले आहे. त्यांच्या पंतप्रधानपदाच्या सात वर्षांच्या कारकिर्दीत प्रथमच ते अस्वस्थ झाल्याचे दिसून आले. विषाणू मत देत नसतात हे त्यांना समजून चुकल्याचे दिसत असून त्यामुळेच त्यांनी तातडीने आपल्या एकूणच निर्णयप्रक्रियेत बदल केल्याचे दिसते.

सध्या सर्वत्र कोरोनाच्या विषाणूने धुमाकूळ घातला आहे. त्याच्या आक्रमणाने आरोग्य यंत्रणा मोडकळीस आली आहे. डॉक्टर, नर्स, औषधे आणि ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे. कोरोनाचे संकट गहिरे होत असताना सर्वांनी एकत्र येऊन त्याच्याविरोधात खांद्याला खांदा लावून उभे रहायला हवे. अशा राष्ट्रीय संकटावेळी शांत, गप्प रहायला हवे. मात्र, लोकशाहीमध्ये राजकारण थांबत नसते. येथे टीकाटिप्पणी होतच राहणार, प्रश्न विचारलेच जाणार. डोनाल्ड ट्रंप ते बोल्सोनारो, रिसेप तैय्यप, एर्दोगान, बेंजामिन नेत्यान्याहू ते नरेंद्र मोदी या सर्वांना या बाबींची कल्पना आहे. ते सर्वजण एका पायावर स्वतःला मांडत असतात. जोपर्यंत तो पाया आनंदी असतो...यशस्वी असतो तोपर्यंत अनेकदा जिंकत राहतात किंवा विजयी होतात.

सामर्थ्यवान नेता कधीही आपले अपयश कबूल करत नाही, पराभव समोर दिसत असला तरी मान्य करत नाही. ते काही दिव्य व्यक्ती नसतात किंवा अवतारही नसतात ते सामान्य मनुष्यच असतात म्हणूनच त्यांनी चूक केल्याचे कबूल केल्यास तो मास्टरस्ट्रोक ठरतो आणि त्यासाठी त्याचे स्वागत करायलाच हवे...परंतु तसे सहसा होताना दिसत नाही. या आठवड्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक स्वतःमध्ये बदल केल्याचे जाणवले आणि तेही एकदा नव्हे तर तीन वेळा. सर्वात आधी दूरचित्रवाहिन्यांवरून राष्ट्राला उद्देशून केलेले भाषण प्रथमच आश्वासन, उपदेश मुक्त होते तसेच त्यातून कोणताही संभ्रम निर्माण होणार नाही याची त्यांनी काळजी घेतल्याचे दिसून आले. दुसरे म्हणजे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी पाठविलेले पत्र. या पत्राला आरोग्यमंत्र्यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही...पण सिंग यांनी सुचविल्याप्रमाणे लसीकरण वाढवण्याच्या सूचना त्यांनी तातडीने दिल्या. आणि तिसरे म्हणजे पश्चिम बंगालमधील प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात सहभागी न होण्याचा घेतलेला निर्णय.

पश्चिम बंगालमधील निकाल जाहीर होताच मात्र सध्याचे चित्र नक्की बदलेल, बातम्यांचे मथळे बदलतील. जर भाजपने बंगालमध्ये शंभरचा आकडा पार केला तरी भाजपचा नैतिक विजय कसा झाला याचे रकानेच्या रकाने भरून येतील. जर जिंकले तर विशेषणांचा आणि कौतुकाचा पाऊस पडेल. मात्र काहीही झाले तरी कोरोनाच्या लाटेत हे सर्व मागे पडणार हे नक्की. शास्त्रज्ञांना जरी या विषाणूबद्दल माहिती नसले तरी आम्ही त्याबाबत जाणतो. हा विषाणू काही मतदान करत नाही किंवा कोण जिंकले किंवा हरले याची काळजी घेत नाही. विषाणू ध्रुवीकरण करू शकत नाही. विषाणू फक्त आजारपण, दुःख, मृत्यूचा प्रसार करते. अविश्वास पसरवते व त्यातून राजकारणाला खाद्य देते. अमेरिका, ब्राझील, युनायटेड किंगडमच्या नेत्यांना या अतिविश्वासाची किंमत मोजावी लागली आहे. भारतातही तो धोका उभा ठाकलेला आहे आणि वरील तीन घटनांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्याची जाणीव झाल्याचे दिसून येत आहे.

फेब्रुवारी महिन्याच्या उत्तरार्धात कोरोनाच्या दुसऱ्या संक्रमणास प्रारंभ झाला. केरळ, पंजाब आणि महाराष्ट्रात त्याची पुन्हा वाढ झाली. या तिन्ही राज्यांत भाजपविरोधी सरकारे असल्यामुळे त्यांच्याकडे लक्षच दिले गेले नाही. उलट तेथे राजकारण करण्यात आले. महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जेव्हा लसीकरण वाढविणे गरजेचे असल्याचे म्हटले तेव्हा त्यांची खिल्ली उडवण्यात आली तर दुसरीकडे उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथांच्या सरकारने कोरोनाविरोधात केलेल्या कामगिरीचे कौतुक करण्यात आले. मात्र, कोणताही विषाणू राज्यांच्या सीमा ओळखत नसतो हे दिसून आले.

दुसरीकडे लसीकरण कार्यक्रमाच्या प्रारंभी अगदीच आत्मसंतुष्टपणा दिसत होता. सुट्या घेत, सण साजरे करत लसीकरण करण्यात आले. त्याला अपेक्षित वेग नव्हता. या जोडीलाच कुंभमेळ्याला परवानगी देण्यात आली. पश्चिम बंगालमध्ये लाखोंच्या उपस्थितीत प्रचार करताना `मी असा प्रतिसाद पाहिला नव्हता,` असे नरेंद्र मोदी म्हणाले आणि त्याचदिवशी वास्तवाची जाणीव करून देणारे पत्र माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी पंतप्रधान मोदी यांना लिहिले. कौतुक सोहळ्यात आपण मश्गूल न राहता लसीकरण वाढविले असते, त्यासाठी देशात तसेच परदेशातील लशींची खरेदीसाठी नोंदणी केली असती तसेच संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही हे पाहिले असते तर अनेकांचे प्राण वाचविण्यात नक्कीच यश मिळाले असते. आता आपण नोंदणी केलेल्या लशींची निर्यात थांबवत आहोत, परदेशांतून ज्यांचे जीव जात आहेत त्यांच्याप्रती दुःख व्यक्त करायलाही आपल्याकडे वेळ नाही... आता दुसरी लाट संपूर्ण देशाला विळख्यात जखडू पाहत असताना आमचे सरकार काहीसे थिजल्यासारखे दिसत आहे. यातून बाहेर पडण्यासाठी सरकारला अत्यंत वेगाने लसीकरण वाढविणे, तसेच जे जे आवश्यक आहे ती पावले तातडीने टाकणे आवश्यकच आहे. तसे केल्यासच ते कौतुकास पात्र ठरू शकता.

आणि त्याने डाव साधला....

जानेवारीत दावोस येथे जागतिक व्यापार संघटनेच्या व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिभाषण झाले. त्या भाषणात, भारताने कशाप्रकारे कोरोनाविरोधात लढा दिला व त्यावर विजय मिळविला हे कौतुकाने सांगितले. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने मोदींच्या अभिनंदनाचा ठराव केला. त्यातून कोरोनाविरोधात लढ्यात मोदी कसे नायक ठरलेत हे अभिमानाने सांगितले. मात्र कोणताही विषाणू असले कौतुकसोहळे पाहत नसतो, भाषणे ऐकत नसतो, तो कोणाची काळजीही घेत नाही तो फक्त आपल्या आळसाची वाट पाहत असतो...ती त्याने पाहिली आणि नंतर डाव साधला.

(अनुवाद : प्रसाद इनामदार)