राष्ट्रहिताच्या नजरेतून : पूर्वप्रभावी संयम

pranab mukherjee
pranab mukherjee

प्रणव मुखर्जी यांच्या आत्मचरित्राच्या अखेरच्या खंडात खऱ्या राजकीय मुद्द्यांना बगल देण्यात आली आहे, त्यात सखोल माहितीचा अभाव आहे. तसेच यात समोर आलेल्या तथ्थ्यांपेक्षा लपलेले अधिक असल्यामुळे निराशा झाली आहे.

प्रणव मुखर्जी यांच्या आत्मचरित्राचे (द प्रेसिडेंशियल इयर्स, २०१२-२०१७) पहिले तीन खंड वाचले असतील तर चौथा खंड वाचताना बदललेली मनोदशा, त्याचा रोख आणि हातचे राखून सांगितलेले सत्य या गोष्टी प्रकर्षाने जाणवतात. यात खोटेपणा आहे असे माझे म्हणणे नाही; परंतु, सत्य मांडताना हात आखडता घेण्यात आला आहे. या चौथ्या खंडात त्यांच्या कार्यकाळाचा लेखाजोखा आहे. कदाचित राष्ट्रपती भवनातील पक्षातीत व्यक्ती ही प्रतिमा जपण्याच्या प्रयत्नात लिखाणात अतिसंयमाचा अंश आला असावा. सन २०१४ च्या निवडणुकीत आपण मत का दिले नाही, हा मुद्दा त्यांनी काळजीपूर्वक अधोरेखित केला आहे. त्यांची दोन्ही मुले काँग्रेस पक्षात सक्रिय असल्यामुळे आणि त्यांच्यामधील स्पर्धा ठाऊक असल्यामुळे कदाचित प्रणवदांनी अधिकची काळजी घेतली असावी, असाही एक मतप्रवाह आहे.

आश्चर्याची बाब म्हणजे कुठल्याही मुद्द्य़ाच्या खोलात जाणे प्रणवदांनी काळजीपूर्वक टाळले आहे. सार्वजनिक जीवनात तोलून मापून शब्द वापरणारे अशी त्यांची ख्याती होती होती. एखादा मुद्दा वा निर्णयावर बोलताना आपल्याकडे अधिकाराने सांगण्यासारखे काही आहे असे वाटत असल्यास बाकीच्यांना काय वाटेल याचा विचार न करता ते आपले मत मांडत. प्रणवदांच्या आत्मचरित्राच्या या खंडाने वर्तमानपत्रांना मथळे जरूर दिले.

पक्षाच्या कठीण काळात सोनिया गांधी यांचे नेतृत्व कमी पडले या त्यांच्या वक्तव्याने चांगलीच खळबळ उडवली. ते मंत्रिमंडळात असते तर त्यांनी ममता बॅनर्जी यांना ‘यूपीए’ सोडून जाऊ दिले नसते, असेही मत त्यांनी मांडले. हे मुद्दे मांडून उत्सुकता चाळवली खरी पण हे त्यांनी कसे केले असते याच्या खोलात जाण्याचे त्यांनी टाळले आहे. प्रकाशकांना  पुस्तकातील माहितीचे मथळे होणे हवे असते. या बाबतीत या खंडाने निराश केले नाही. मात्र, मथळ्याच्या पलीकडे असलेल्या बातमीचे काय ? तसे यात काहीच नाही.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आधीच्या खंडांमध्ये त्यांनी रोखठोक मते मांडली आहेत. त्यांना पक्षात कशा पद्धतीने त्रास देण्यात आला यावर त्यांनी प्रकाश टाकला आहे. जसे राजीव गांधी यांनी त्यांना बाहेर कसे घालवले, त्यांच्याकडे कसे दुर्लक्ष करण्यात आले. श्रेष्ठींना त्यांच्यासोबत कुणी दिसणे पसंत नसल्याने ते संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये एकटे बसलेले असत, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. मुंबईच्या काँग्रेस कार्यकारिणीत त्यांचा कसा जाहीर अपमान करण्यात आला, याचाही उल्लेख त्यांनी केला आहे. 

राजीव गांधी यांना इंदिरा गांधी यांचा उत्तराधिकारी निवडण्याच्या प्रक्रियेवरही त्यांनी पहिल्या खंडात आक्षेप घेतला आहे. यावेळी पक्षाचे नेतृत्व करण्यास ते कसे सक्षम होते ही बाब न सांगताही त्यांनी अधोरेखित केली आहे. काँग्रेस संसदीय पक्ष आणि मंडळाची बैठक न घेता एक नोकरशहा पी. सी. अलेक्झांडर आणि राजीव यांचे मित्र अरुण नेहरू हे पुढचा पंतप्रधान कोण असणार याचा निर्णय कसा घेऊ शकतात, असा खडा सवाल प्रणवदांनी केला आहे. दुसरा खंडही त्यांनी काळजीपूर्वक मांडल्याचे दिसून येते. याचे एक कारण राष्ट्रपतीपदाचा त्यांचा कार्यकाळ संपून अधिक काळ लोटलेला नव्हता हे असू शकते.  

सोनिया यांना मात देत मायावती, ममता बॅनर्जी तसेच भाजप व शिवसेनेशी त्यांनी कसे संधान साधले यावर आता दुसऱ्या कुणाला पुस्तक लिहावे लागेल. विरोध असतानाही त्यांनी राष्ट्रपतीपद स्वतःकडे राखले आणि यामुळे यूपीएला सगळ्यात मोठा पराभव बघावा लागला. इंदिरा गांधी यांच्यानंतर गांधी परिवाराने सतत डावलल्यामुळे आपण दुःखी होतो, असा स्पष्ट उल्लेख प्रणवदांनी कुठेही केलेला नाही. बाबा रामदेव यांच्याशी वाटाघाटी करण्यासाठी प्रणवदांनी एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ दिल्ली विमानतळावर नेले होते. यामुळे सोनिया कमालीच्या नाराज झाल्या होत्या.

प्रणवदा कधीही सोनिया आणि राहुल गांधी यांचे चाहते नव्हते. राहुल यांचा या खंडात केवळ एकदाच उल्लेख आहे. प्रणवदा विरुद्ध गांधी घराणे या लढतीत कुणाचा विजय झाला याच्या उत्तराची अजूनही सगळ्यांना प्रतिक्षा आहे. सोनिया यांचा विरोध असतानाही प्रणवदा राष्ट्रपती झाल्याने त्यांचा विजय झाला काय ? तसे असेल तर या घराण्याने त्यांना काहीही दिले नाही, अशा त्यांच्या विरोधातील तक्रारीचा सूर का दिसतो ? याचे उत्तर आपल्याला कसे मिळणार ? त्यासाठी त्यांच्या आत्मचरित्राचे चारही खंड वाचायचे आणि त्यातून प्रणवदा विजयी ठरले की पराभूत, याचे उत्तर आपणच शोधायचे.

सुरक्षित मार्ग
ज्या देशात सार्वजनिक जीवनात वावरणारे नेते कुठलेही लिखाण, पत्रे वा पुस्तके मागे ठेवत नाहीत तेथे त्यांनी आपला अनुभव चार खंडांमध्ये मांडला याबद्दल त्यांचे आभारच मानायला हवेत. तथापि, हे करताना खऱ्या मुद्द्यांना बगल देण्यात आल्यामुळे मोठी निराशा झाली आहे. सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग ही दुकली राजकीय नेतृत्व देण्यास पुरेशी सक्षम नाही असे त्यांचे मत होते तर पक्ष आणि पक्षाच्या ध्येयधोरणांसाठी खस्ता खाण्याऐवजी त्यांनी राष्ट्रपती भवनात जाण्याचा सुटकेचा व सुरक्षित मार्ग त्यांनी का निवडला? 

अनुवाद : किशोर जामकर.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com