esakal | चहाच्या आनंदाला कपाचे कोंदण I Tea
sakal

बोलून बातमी शोधा

Tea

चहाच्या आनंदाला कपाचे कोंदण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

- शिरीष चिंधडे

सहा तासात मॅडमचा तो सहावा चहा असावा. मी पाच वेळा नको म्हणालो होतो. तेव्हा त्या म्हणाल्या, “चहाला नकार? मला हा असा अर्धा कप चहा दिवसाला आठ-दहा कप लागतो.’ चाह बरबाद करेंगी हमे मालूम न था! हे कुंदनलाल सैगलचे गाणे त्यांनी गुणगुणून दाखवले! क्रिकेट आणि इंग्रजी भाषा या दोन त्रासदायक गोष्टींबरोबर ही चहाबाजीची विरासत देखील साहेबाने भारताला दिली. चहा माहात्म्य काय वर्णावे! कुणीतरी संस्कृतात “चाहागीता” लिहिली असल्याचे ऐकले होते. म्हणे, कुंभकर्णाला झोपेतून जागे करायला एवढा ढोलताशा बडवणारे राक्षस एकूण म्हणजे मूर्ख जमात. “चहा सिद्धं किं न प्रोक्तं, अहो मूढैः राक्षसाः” (चहा तयार आहे, असे का नाही कंठरवाने ओरडला एखादा राक्षस? ते ऐकताच कुंभकर्ण खडबडून जागा झाला असता.) अशी एक ओळ ध्यानात आहे!

चहाविषयी माझ्या काही झकास आठवणी आहेत. दक्षिणेतल्या एका कॉलेजात ‘नॅक’ समितीवर गेलो होतो. कॉलेज पंचाहत्तर वर्षे जुने असल्याचा अभिमान त्यांच्या अहवालात आणि बोलण्यात ओसंडून वाहात होता. प्रत्यक्षात फारसे संशोधन, प्रकाशन, राष्ट्रीय स्तरावरची विद्यार्थी किंवा प्राध्यापकांची कामगिरी दिसत नव्हती. देशभर दिसणारे कॉलेजांचे हे सुमार प्रातिनिधिक दर्शन म्हणायला हवे. प्राचार्यांशी चर्चा सुरू असताना आमच्या समितीचे अध्यक्ष असलेल्या कुलगुरूंनी चहा मागितला. पाच मिनिटांत समोर घोटभर चहा असलेले छोटे दोन-घोटी कागदी कप आले. झटकन मला माझ्याच कॉलेजातला असाच प्रसंग आठवला. तपशील थोडा वेगळा. नियामक समितीची बैठक होती. चहा आला. अध्यक्ष मॅडम मला हळूच म्हणाल्या, “प्रिंसिपल, पुढच्यावेळी क्रोकरी बदला.” समजायचे ते मी समजलो. याही वेळी हेच घडत होते. कुलगुरू त्या कपाला हात लावेनात. मी ओळखले काय बिनसले. हेडक्लार्कला बाजूला घेऊन म्हणालो, “तुमचे कॉलेज इतके समृद्ध परंपरा असलेले. किती कुलगुरू आणि राष्ट्रीय समित्या भेटीसाठी आल्या आहेत? असे कागदाचे घोटभर चहाचे पेले वापरले का प्रत्येक वेळी?”

दुपारी एकदम ट्रान्सफर सीन. उत्कृष्ट दर्जाची क्रोकरी हजर झाली! हे काम आधी जमले नसते का? हिंडल्या, पाहिल्या, शिकल्याशिवाय कसे बदल होणार! दुसऱ्यांसाठी नव्हे, स्वतःसाठीही शक्य असेल, परवडत असेल तर उत्तम का नको! प्रत्येक कामात, निवडीत अभिरुची प्रगटत असते. भपका, आढ्यतेचे प्रदर्शन नको. पण तसे न करताही राजसपणे वागता येते. सावधपण, निरीक्षण असले म्हणजे जमते.

आणखी एक डोळे उघडणारी चहास्मृती. अमृतसर विद्यापीठातल्या गेस्ट हाऊसमध्ये मुक्काम होता. पंजाबी थंडीचा कहर. रविवार सकाळ, चहा नाही! आम्ही शोध घेत होतो. कॅम्पसमधले कँटीन बंद. तेवढ्यात समोर एकदोन सरदारजी कँटीन उघडताना दिसले. “सत श्री अकाल सरदारसाब, चाय कहां मिलेगी?” “सत श्री अकाल. सरजी, कंटीन तो आज बंद है...” दुर्मुखलेले आम्ही दुसरीकडे जायला वळलो. तेव्हा एकजण म्हणाला, “सरजी, रुकिये. बैठो. हमारी खुदकी चाय बननी. चलो, आप भी लेलो.” पाचदहा मिनिटांत वाफाळणारे चविष्ट पंजाबी बंपर आमच्या समोर उभे ठाकले. फुल! उत्तम कपातला उत्तम चहा. मग आवराआवर करताना सरदारजी म्हणाला, “सरजी, ठीक रही चाय? और है, देदू?” “बिलकुल नही जी, पेट फुल है! बहुत बढीया चाय पिलादी जी इस ठंडभरी हवामें. धन्यवाद.” संवाद आणखी थोडा पुढे सरकला आणि घोटाळा झाला. “कहांसे आये हो?” “पुणेसे.” आता सरदारसाहेब समोरच्या खुर्चीवर बसले; म्हणाले, “हम एकबार पूना होके आये है. बढिया शहेर. अच्छे लोग. लेकीन वहांकी एक चीज कभी नही भूलेंगे. कागजके कपमें आधी घूट चाय! वाहे गुरू, दुनियामें इतना बड्डा कप देखा नही.”

गोष्ट इथे संपत नाही. आम्ही उठताउठता विचारले, “कितने पैसे देने जी?” “काहेके पैसे, सरजी. हमणे पीनीही थी. दोचार कप और बणादी. आप तो मशहूर पूनाके गेस्ट ठहरे. किस बातके पैसे!” तेव्हा मोबाईल नव्हते म्हणून आमच्या चेहऱ्यांचे फोटो उपलब्ध नाहीत!

loading image
go to top