‘ग्रांथिक विचार’ पुरेसा नाही! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shivraj Gorle write Textual thinking is not enough for family life

‘ग्रांथिक विचार’ पुरेसा नाही!

भारतीयांच्या भावविश्‍वात ‘कुटुंबा’ला, कौटुंबिक जीवनाला मोलाचं स्थान आहे. या ‘कुटुंब’ संस्थेची पाळेमुळे इथल्या संस्कृतीत रुजलेली आहेत. पौराणिक आख्याने, पूजाविधी, सार्वजनिक सोहळे, सण, उत्सव... हे सारे कुटुंबव्यवस्थेचं महत्त्वच अधोरेखित करत असल्याचं दिसून येतं. आज जगभरात विवाहसंस्था व पर्यायानं कुटुंबव्यवस्थेला जे हादरे बसताना दिसताहेत, त्या पार्श्‍वभूमीवर भारतीय कुटुंबव्यवस्था मात्र (काही आव्हाने असली, काही समस्या असल्या तरी) टिकून आहे. यात इथल्या संस्कृतीचा, इथल्या सामाजिक व कौटुंबिक आदर्शांचा प्रभाव हा मान्यच करावा लागतो.

मागच्या लेखात आपण पाहिलंच, की काही टीकाकारांच्या मते धर्म, संस्कृती, परंपरा या पुरुषप्रधान व्यवस्था असल्यामुळे त्यांच्या आधारे स्त्रियांवर दुय्यमत्व लादण्याचा प्रयत्न होत असतो. त्याचवेळी आपण हेही पाहिलं, की आपल्याकडे अनेक धर्मग्रंथ आहेत. काळानुसार त्यांचं स्वरूपही बदलताना आढळतं. यासंदर्भातली मुख्य अडचण अशी, की आपण स्वतः काही धर्मग्रंथ वाचलेले नसतात. त्यामुळे त्याबद्दल आपण जे काही ऐकत/वाचत असतो त्यावरून आपण आपली ढोबळ मतं बनवत असतो. त्यातलीही दुसरी अडचण अशी, की अभ्यासकांमध्येही मतभेद असतात. उदाहरणच द्यायचं झालं तर ‘मनुस्मृती’विषयी बोलताना काही जण मनूच्या ‘न स्त्री स्वातंत्र्यम् र्हति’ या वचनाकडे लक्ष वेधतात तर काही अभ्यासक ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः।’ हेही मनूचंच वचन असल्याचं निदर्शनास आणतात.

आणखीही एक महत्त्वाचा मुद्दा आहे. पोथ्या-पुराणांमध्ये खऱ्या रमतात त्या स्त्रियाच. पतिव्रता असणाऱ्या स्त्रियांच्या अक्षरशः शेकडो कथांनी पुराण भरलेलं आहे. पती व कुटुंब यांच्या स्वास्थ्य व सुखासाठी स्त्रियांनी करावेत असे असंख्य विधी, व्रतं, उपासतापास - पुराणकारांनी सांगितले आहेत. पण पतिव्रता स्त्रियांचा अपवाद वगळता, पुराणग्रंथकारांचे एकूणच स्त्रीस्वभावाविषयी फारसं चांगलं मत दिसत नाही, असेही दाखले आहेतच. ‘महाभारत’ या ग्रंथाचा तर भारतीय जीवनसंस्कृतीवर फार मोठा प्रभाव आहे याविषयी दुमत असूच शकत नाही. पण महाभारतातही ‘स्त्रीनं पुरुषाला पूरक असंच वागलं पाहिजे’ असेच संस्कार आहेत. स्त्रीचा विचार ‘माता’ व ‘पत्नी’ म्हणूनच केला आहे. तिनं स्त्रीधर्माचं पालन केलं तरच ती पूजनीय ठरते... असेही अनेक मुद्दे उपस्थित केले जातात. आपल्याला फार खोलात जाण्याची गरज नाही, तरीही एक प्रश्‍न नक्कीच मनात येतो - भारतीय संस्कृतीत, इथल्या धर्मग्रंथांत स्त्रियांचं दुय्यमत्व अधोरेखित केलं गेलं आहे - या मुख्य आक्षेपात काही तथ्य आहे की नाही? या संदर्भात दोन ज्येष्ठ विचारवंतांचे विचार मला इथे आवर्जून उद्‌धृत करावेसे वाटतात जे निश्‍चितच मार्गदर्शक ठरू शकतील. डॉ. राम मनोहर लोहिया यांनी म्हटलं आहे - ‘‘भारताच्या इतिहासात एकच एक परंपरा नाहीये. मातृहन्ता परशुरामापासून सनातन पंथीयांची एक वसिष्ठ परंपरा चालत आली आहे; पण त्याचबरोबर विश्‍वामित्रापासून एक उदारपंथी ‘वाल्मिकी परंपरा’देखील आहेच. हे वैविध्य तर ध्यानात घ्यावंच लागतं.

दुसरं महत्त्वाचं प्रतिपादन आहे ते विचारवंत नरहर कुरुंदकर यांचे. त्यांच्या मते या संदर्भात केवळ ग्रांथिक विचार पुरेसा नाही. स्त्रियांचं दुय्यमत्व हे केवळ ग्रंथात होतं की प्रत्यक्ष दैनंदिन जीवनातही, याचा विचार करायला हवा. आपला मुद्दा स्पष्ट करताना प्रा. कुरुंदकर ‘अभयारण्य’मध्ये म्हणतात, ‘‘हे खरं आहे की आपल्या धार्मिक ग्रंथांमध्ये पुरुष-श्रेष्ठत्वाची भाषा येते. ही भाषा वंशपरंपरेनं घडलेली असते. परंतु ‘‘स्त्री ही पुरुषाच्या (मोक्ष मार्गातील) धोंड आहे,’’ अशी भाषा बोलणारेही प्रत्यक्षात स्त्री-सहवास नाकारत नव्हते. हेही तितकेच खरे, की धार्मिक बाबींमध्ये स्त्रियांनाच अधिक रस असतो. पुराणांचा श्रोतृवर्ग स्त्रियाच असतो. गुरूचरित्राचं पारायण - श्रवण नित्यनेमानं स्त्रियाच करीत असतात. त्यात स्त्रियांच्या संदर्भात जी भाषा येते ती एक ‘सामाजिक संकेत’ म्हणून मान्य होती. मोक्षाला जाताना येणारे हे प्रश्‍न गृहस्थाश्रमींना केवळ तत्त्वज्ञान म्हणून मान्य होते; पण त्यावरून स्त्री ही पूर्वीपासून घरातली दासीच होती असे निष्कर्ष काढणं चूक ठरेल.’

‘‘सीता-सावित्रींच्या पुण्यक्षेत्र भारतात स्त्रियांचं जे चारित्र्य आढळलं, ते मला पृथ्वीच्या पाठीवर कुठंही दिसलं नाही,’’ असं अभिमानानं म्हणणारे स्वामी विवेकानंद हेसुद्धा या संदर्भात किती आधुनिक व खुला विचार मांडतात तेही पाहूया पुढच्या लेखात.

- शिवराज गोर्ले

Web Title: Shivraj Gorle Write Textual Thinking Is Not Enough For Family Life

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top