भांडा ‘सख्य’ भरे! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shivraj Gorle writes about family dispute rule for good family relationship

‘घ र म्हटलं की भांड्याला भांडं लागणारच,’ हा आपल्याकडील एक लाडका वाक्‍प्रचार आहे. नवरा-बायकोची भांडणं होणारच हा त्याचा मथितार्थ!

भांडा ‘सख्य’ भरे!

‘घ र म्हटलं की भांड्याला भांडं लागणारच,’ हा आपल्याकडील एक लाडका वाक्‍प्रचार आहे. नवरा-बायकोची भांडणं होणारच हा त्याचा मथितार्थ! तसे तर कुठल्याही दोन व्यक्तींमध्ये मतभेद, वाद होऊ शकतात. नवरा-बायको त्याला अपवाद कसे असतील? मुळात आस्था असते, अपेक्षा असतात, ‘आपलं’ मानलेलं असतं म्हणून तर भांडणं होत असतात. जोडीदाराशी हक्कानं भांडता येतं, हा विवाहाचा एक मोठा लाभही म्हणता येईल. खरं तर छोटी छोटी भांडणं ही एका अर्थी सहजीवनातली गोडी वाढवतच असतात. फक्त एवढंच की ती छोटीच राहतील, मोठी झालीच तरी विकोपाला जाणार नाहीत याची काळजी घ्यावी लागते. ‘डाव मांडून, भांडून मोडू नको...’ हे स्वतःला बजावावं लागतं! अपघात टाळण्यासाठी जसे वाहतुकीचे नियम पाळावे लागतात, तसेच अतिरेक टाळण्यासाठी असतात भांडणाचेही काही नियम.

ते असे आहेत -

१) ज्या विषयावर वाद असतो, त्याच विषयावर बोला. शोभा डे यांच्या शब्दात सांगायचं तर भांडणाचा ‘चिवडा’ करू नका! पैशांवरून वाद असेल तर अकारण सासू-सासऱ्यांपासून घरच्या कुत्र्या-मांजरांपर्यंत वाट्टेल ते मुद्दे घुसडू नका! भांडण भरकटू देऊ नका.

२) रागाच्या भरातही समोरची व्यक्ती दुखावेल किंवा नंतर तुम्हाला स्वतःलाही पश्‍चात्ताप होईल, असे शब्द वापरू नका. शब्दाने शब्द वाढवू नका.

३) स्वतःवर ताबा राहील, तोल सुटणार नाही याची दक्षता घ्या.

४) आपापसातच भांडा. चारचौघांसमोर विशेषतः मुलांसमोर वाद घालू नका.

५) भूतकाळ उकरून काढू नका. तू असाच आहेस, तू नेहमीच असं वागतेस, असं म्हणण्याचा मोह टाळा. फक्त त्यावेळच्या वागण्यावर बोला.

६) ‘कुणाचं चुकलं’ यावर वाद घालण्यापेक्षा ‘काय चुकलं’ हे शोधण्यावर भर द्या.

७) भांडण म्हणजे काही ‘लढाई’ नसते. वादात ‘जिंकणं’ हा ‘प्रेस्टिज इश्‍यू’ करू नका. जोडीदाराचं पटलं/स्वतःचं चुकलं असं जाणवलं तर उमदेपणानं तसं सांगून टाळा. पती-पत्नीच्या नात्यात ‘हार जीत’ आणू नका.

८) ‘प्रत्येक वेळी मीच का माघार घ्यायची’ या ‘बाणेदार’ विचारापेक्षा ‘मीच का घेऊ नये’ असा समंजस विचारही करता येतो. वाद जरूर घाला पण कुठल्याही परिस्थितीत तुटेल इतकं ताणू नका.

९) ज्या दिवसाचं भांडण असेल ते त्या दिवशीच मिटवणं उत्तम. तेव्हा मनात असेल ते बोलून टाका. धुसफुसत दिवस दिवस घालवू नका.

१०) भांडणासाठी एक ‘टाइम लिमिट’ ठरवा. ती झाली की दोघांनी गप्प बसायचं. त्या वेळेत तोडगा निघतोच असं नाही, पण परस्परांच्या भावना कळतात. दोघेही व्यक्त झाल्यानं विरेचन होतं, निचरा होतो. एकमेकांच्या मुद्द्यांवर विचार करायला दोघांनाही नंतर वेळ मिळतो.

११) दोघेही ‘नॉर्मल’ झाल्यावर शांतपणे चर्चा करा. मतैक्‍य होतंच नसेल तरी ‘मतभेदांसह पुढे जाऊ - लेट अस ॲग्री टू डिफर’ असाही समंजस पवित्रा घेता येतो. अर्थात केवळ जोडीदाराच्या समाधानासाठी, मनात नसताना ‘सॉरी’ म्हणून वेळ मारून नेऊ नका. अशा वरवरच्या क्षमायाचनेनं काहीच साधत नसतं.

१२) मतभेद असूनही सलोखा (तह!) करता येतोच. एकदा असा सलोखा झाला की वादाचा ‘तो’ विषय पुन्हा उकरून काढू नका.

१३) भांडणाचा ‘हॅंगओव्हर’ टाळा. पुन्हा जवळ येण्यासाठी कोण पुढाकार घेतंय, याची वाट पाहू नका.

१४) भांडणाची तीव्रता खूपच असेल तर दोघांना मान्य होईल अशा मध्यस्थाची मदत घ्यायलाही हरकत नाही.

१५) मनावर भांडणाचे ओरखडे राहणार नाहीत, याची काळजी घ्या. जोडीदाराशी तुटक वागून, प्रेम कमी करून ‘सूड’ घेत बसू नका.

सगळेच नियम एकदम पाळता येतील असं नाही...

पण जमतील तेवढे पाळा. भांडणं तर होणारच. भांडणं हा दोघांचा ‘हक्क’ असतो, हेही मान्य करता येईल. फक्त एवढंच की हा हक्क- सहजीवनाच्या आनंदावर कुरघोडी करणार नाही याची दक्षता घ्या. त्यासाठीचा खरा मंत्र हाच आहे - भांडा ‘सख्य’ भरे... नांदा सौख्य भरे!