‘शेअरिंग’ तर हवंच! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Relationship case study

‘शेअरिंग’ तर हवंच!

एकमेकांना आयुष्यभर साथ द्यायची असंच मनोमन ठरवून स्त्री-पुरुष अगदी उत्साहानं, वाजतगाजत विवाहबद्ध होत असतात. मात्र साऱ्यांचं वैवाहिक आयुष्य सुखाचं असतंच असं नाही... काही तर काही वर्षांतच विभक्तही होतात. असं का होतं, या प्रश्‍नाचा वेध घेण्यासाठी मेंदूवैज्ञानिक व संशोधक मायकेल गुरियन यांनी अनेक वर्षं विवाहित स्त्री-पुरुषांच्या सहजीवनाचा, त्यातील टप्प्यांचा सखोल अभ्यास केला. त्यातून त्यांच्या हाती आलेला धक्कादायक निष्कर्ष असा होता- ‘बाय नेचर, मेन अँड विमेन आर नॉट मेड फॉर इच अदर!’

हे खरंय की स्त्री-पुरुषांमध्ये नैसर्गिक आकर्षण असतं, ते परस्परांच्या प्रेमातही पडू शकतात, पण मौज म्हणजे त्यांच्या जवळ येण्यातच त्यांच्या दूर होण्याची (क्वचित विभक्त होण्याची) बीजं पेरलेली असतात. याचं कारण निसर्गाला त्यांनी असं आयुष्यभर एकत्र राहणं मुळीच अभिप्रेत नसतं. उलट निसर्ग त्यात बाधाच आणत असतो. निसर्गतः स्त्री-पुरुषांचे मेंदू- सहजीवनाच्या विविध टप्प्यांवर परस्परांपेक्षा वेगळ्या प्रतिक्रिया देत राहतात. त्यामुळे दोघांमध्ये नैसर्गिकरित्या काही बदल होत असतात. एकमेकांमध्ये होणारे हे बदल समजून घेतले, त्यांच्याशी जुळवून घेत स्वतःमध्येही काही बदल घडवले तरच दोघे आयुष्यभर (तेही अगदी सुखासमाधानानं) एकत्र राहू शकतात... अन्यथा निसर्ग तर त्यांना दूर करण्यासाठी जणू टपलेलाच असतो.

हे टाळायचं कसं, हे स्पष्ट करताना गुरियन म्हणतात, ‘‘प्रारंभीच्या काळात दोघेही एकमेकांना बदलण्याचा प्रयत्न करीत असतात, पण हळूहळू त्यांना त्यातला व्यर्थपणा जाणवू लागतो. त्यातूनच ‘आपण दोघेही तसे बरोबरच आहोत,’ हा महत्त्वाचा शोध त्यांना लागतो. स्त्रियांचं म्हणणं योग्यच असतं. नात्यामध्ये पुरेशी जवळीक नसेल तर नातं तुटू शकतं. पण पुरुषांचंही म्हणणं योग्य असतं. परस्परांना पुरेशी मोकळीक नसेल तर नातं नकोसं होऊ शकतं. म्हणूनच जवळीक आणि मोकळीक यात समतोल साधावा लागतो.’’ या समतोलासाठी गुरियन यांनी अतिशय सुंदर शब्दप्रयोग केला आहे- इन्टिमेट सेपरेटनेस! ‘इन्टिमसी’ म्हणजे शेअरिंग आणि ‘सेपरेटनेस’ म्हणजे स्पेस! जवळीक आणि मोकळीक हेच सुखी संसाराचे दोन ‘फन्डाज्‌’ म्हणता येतील.

तसे तर पती-पत्नी वर्षानुवर्षं एकमेकांच्या सोबतीनं राहत असतात, खूप काही दोघं मिळूनच करीत असतात, तरीही त्यांच्यामध्ये आवश्‍यक ते ‘शेअरिंग’ होतंच असं नाही. किंबहुना शेअरिंग हे होत नसतं- ते करावं लागतं. परस्परांच्या अडचणी समजून घेणं, त्या सोडविण्यासाठी मदत करणं, एकमेकांच्या कामात शक्‍य तितका ‘सपोर्ट’ देणं- हे तर आवश्‍यक असतंच, पण याखेरीजही ‘शेअर’ करावं असं खूप काही असतं. दोघांच्याही व्यक्तिगत आयुष्यात- जोडीदाराच्या पश्‍चात खूप काही घडत असतं. त्यातलं महत्त्वाचं, वेगळं, इंटरेस्टिंग असं काही जोडीदाराला सांगणं म्हणजे शेअरिंग. तुमचे विचार, भावना, कल्पना... जोडीदारासमोर वेळोवेळी व्यक्त करणं म्हणजे शेअरिंग. ‘शेअरिंग’चा सर्वांत महत्त्वाचा लाभ म्हणजे तुमच्या जोडीदाराच्या मनात काय चाललंय, हे तुम्हाला सतत आणि वेळीच कळत राहतं. तुमचं सहजीवन ‘ट्रॅक’वर सुरू आहे की नाही, हे कळण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे शेअरिंग!

मात्र याचंही भान हवं की शेअरिंग म्हणजे तमाम साऱ्या छोट्या छोट्या चिंता, प्रॉब्लेम्स व कटकटी वाटून घेणं नव्हे. शेअरिंग हे उल्हसित करणारं, उमेद वाढवणारं हवं... तरच त्याची गोडी वाटेल. अर्थात ‘शेअरिंग’ हे फक्त शब्दांतून नव्हे, कृतीतूनही होत असतं. जोडीदाराला अगदी मनापासून आवडेल असं काही आवर्जून करीत राहणं, त्याच्यासाठी खास अशी ‘गिफ्ट’ शोधून घेऊन येणं, अधूनमधून काही प्लेझन्ट सरप्राइजेस देत राहणं या साऱ्यामुळे जवळीक तर वाढतेच, पण नात्यातली गंमतही टिकून राहते. हे सारं मुद्दाम ठरवून का करायचं, त्यात कृत्रिमता येत नाही का, हा जर प्रश्‍न तुम्हाला पडत असेल तर एका वास्तवाचं तुम्हाला पुनश्‍च स्मरण करून द्यायला हवं. कुठलंही लग्न हे आपोआप यशस्वी होत नसतं, ते यशस्वी करावं लागतं. यू हॅव टू मेक द मॅरेज वर्क! म्हणूनच ‘शेअरिंग’ तर हवंच.