डाव मोडू नको!

आ जच्या तरुणाईचं नोकरी, व्यवसाय, करिअरला कुटुंबापेक्षा प्राधान्य
Shivraj Gorle writes about the human family life and youth priority
Shivraj Gorle writes about the human family life and youth priority sakal
Summary

आ जच्या तरुणाईचं नोकरी, व्यवसाय, करिअरला कुटुंबापेक्षा प्राधान्य

आ जच्या तरुणाईचं नोकरी, व्यवसाय, करिअरला कुटुंबापेक्षा प्राधान्य आहे. त्यांचा अग्रक्रम निश्चितच बदलला आहे. तरीही तरुण पिढी कुटुंब आणि लग्नाला पूर्णपणे नकार देत नाहीय. त्यातून मिळणारं स्थैर्य आणि सौख्य हेही त्यांना हवंच आहे. दोन्हींची सांगड कशी घालायची हा मात्र त्यांच्यापुढे मोठाच प्रश्न आहे. आजच्या गतिमान जीवनशैलीमुळे लग्नातील विसंवादाचं प्रमाण वाढतं आहे. ‘लव्ह ॲट फर्स्ट साइट ॲन्ड डिवोर्स ॲट फर्स्ट फाईट’ अशीच आजची परिस्थिती आहे. खरं तर लग्न हा घरातले सगळे, नातेवाईक, मित्रपरिवार साऱ्यांसाठीच एक आनंदसोहळा असतो. शिवाय आजकाल लग्न मोठ्या दिमाखानं साजरं केलं जात असतं. प्री वेडिंग शूट, संगीत, ब्राईडल अटायर आणि मेकअप, लॉन रिसेप्शन असा अवघा ‘उत्सव’ असतो.

लग्नाचे पारंपारिक विधीही साग्रसंगीत पार पाडले जातात. मुख्य म्हणजे वधू- वर दोघांच्याही मनात पुढील सहजीवनाविषयी एक विलक्षण उत्सुकता, हुरहूर असते. पण शोभा डेंच्या शब्दांत सांगायचं तर ‘नातिचरामी’ची शपथ घेऊन सहजीवनाची सुरुवात करणाऱ्या प्रत्येक नवपरिणित जोडप्याच्या नजरेसमोर एक सुंदर स्वप्न असतं... जन्मजन्मांतरीच्या अखंड सहवासाचं एकमेकांच्या कुशीतच जगण्यामरण्याचं! अखेरच्या श्वासापर्यंत साथ निभावण्याची वचनं घेत स्त्री-पुरुष एकत्र येतात.. नव्या उमेदीने नवा संसार थाटतात.. पण दुर्दैव! ही उमेद पुढे टिकत नाही. बंध काचतात, श्वास घुसमटतो.. नव्या नात्याची नवलाई बघता बघता ओसरते आणि नुकता मांडलेला अर्धा मुर्धा डाव उधळून जो तो आपापल्या वाटेने निसटून जायला पाहतो. हे टाळता येईल का? असे उधळणारे डाव वेळीच सावरता येतील का? ‘होय’ असंच सर्व विवाह/ कुटुंब समुपदेशक अगदी एकमुखानं सांगत असतात. सगळेच जरी नाही तरी बहुसंख्य मोडू पाहणारे संसार सावरले जाऊ शकतात. हा केवळ आशावाद नव्हे, हे त्यांचे अनुभवाचे बोल आहेत. स्मिता प्रकाश जोशी ‘अर्थ नात्यांचा’मध्ये म्हणतात, ‘पती-पत्नीच्या नात्यामध्ये काही वाद किरकोळ स्वरूपाचे असतात, तर काही वाद गंभीर स्वरूप धारण करतात.

नात्याला तडे जाण्यापर्यंतही वाद जातात पण वादाचं मूळ कारण शोधून काढलं, संयम दाखवला तर ते मिटवण्यासाठी प्रयत्न करता येतात. संसारामध्ये सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडत नाहीतच, त्यामुळे तडजोड करावी लागते. खरं तर अशा अनेक तडजोडी आपण करत असतो, परंतु लग्नामध्ये मात्र या तडजोडी करण्याकडे कल कमी असतो. थोडंसं मनाविरुद्ध झालं की थेट लग्न मोडण्यापर्यंत मजल जाते. पण लग्न मोडणं हा पर्याय योग्य असतोच असं नाही. कारण त्यानंतरही आयुष्यात अनेक तडजोडी कराव्या लागतात. त्यामुळे लग्न टिकवून ठेवत तडजोड करणं योग्य की लग्न मोडून तडजोड करणं योग्य, हे ज्याला त्यालाच ठरवावं लागतं.’

कुटुंब समुपदेशक शीला वैद्य म्हणतात, ‘‘हल्ली घटस्फोटाकरता न्यायालयात जाणारी किती तरी मुले मुली क्षुल्लक कारणांवरून भांडताना दिसतात. मुलीचं म्हणणं, ‘माझा नवरा त्याच्या आईचं ऐकतो. नेहमी तिचीच बाजू घेतो. मी का हे सहन करू?’ हे झालं एकत्र कुटुंबातील. पण जे घरात दोघेच राहतात तेही भांडतात. ‘तू हे काम करत नाहीस, तू ते करत नाहीस,’ असे एकमेकांवर आरोप करीत असतात. सर्व कामांना मशीन असते तरी ते लावायचे कुणी यावरूनही भांडणे होतात. मूल आजारी पडले तर सुटी कोण घेणार, रात्री रडले तर कोण बघणार, यावरूनही भांडणं होतात. संसार आपला आहे, तो पेलण्याची जबाबदारी दोघांची आहे, हे वास्तव स्वीकारलं तर डाव मोडणार नाहीत. ‘वेगळं नाही व्हायचंय मला..’ असा निर्धार केला तर ती गोष्ट अशक्य नाही. विवाहपूर्व आणि विवाहोत्तर समुपदेशनातून अशा निर्धाराला बळकटी येऊ शकते. करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी आजची तरुण मुलं इतकी झगडत असतात, तीच जिद्द सहजीवन यशस्वी करण्यासाठी का दिसू नये?’ अहंकाराला आळा, संयम व सामंजस्य आणि तडजोडीची तयारी असेल तर ‘अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी’, असं म्हणण्याची वेळ नक्कीच येणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com