कुटुंब डॉट कॉम : कुटुंब नावाचा आधारवड... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

family

आपण ‘कुटुंब’ संस्थेच्या भवितव्याविषयी विचार करीत आहोत. त्यासाठी थोडं भूतकाळातही डोकवावं लागतं. काळाच्या ओघात जे काही बदल झाले ते नेमके कशामुळे झाले..

कुटुंब डॉट कॉम : कुटुंब नावाचा आधारवड...

आपण ‘कुटुंब’ संस्थेच्या भवितव्याविषयी विचार करीत आहोत. त्यासाठी थोडं भूतकाळातही डोकवावं लागतं. काळाच्या ओघात जे काही बदल झाले ते नेमके कशामुळे झाले.. आपण काय गमावलं, काय मिळवलं याचा लेखाजोखा घेतल्यानंतरच पुढची दिशा निश्‍चित करता येते. पूर्वीचा काळ एकत्र कुटुंबांचा होता. आज विश्‍वासही बसत नाही, पण एकेकाळी शंभर, दोनशेंचं कुटुंब असायचं. नवरा बायको मुलांखेरीज मुलांचे दोन्ही आजी, आजोबा, काका, काकू, मामा, मावशी.. शिवाय चुलत, मामे, आतेभावंडंही एकत्र राहत. नंतर मात्र हा गोतावळा नकोसा वाटू लागला. प्रथम सख्खी नसलेली भावंडं ‘परकी’ वाटू लागली. परिणामी काका, काकू, मामा, मावशी आपापल्या अपत्यांसह बाहेर पडले. काही काळ नवरा- बायको, मुले आणि आई-वडील अशी कुटुंबं झाली. नंतर मग ‘पालक’ही परिवारात मावेनासे झाले. नवराबायको आणि मुलं अशी ‘विभक्त’ कुटुंबं अस्तित्वात आली. काही प्रमाणात हे अपरिहार्य होतं. प्रारंभीचं शहरीकरण, यांत्रिकीकरण, नोकरी व्यवसायाचं बदलतं स्वरूप, बदलते अर्थकारण- पुढे मग स्त्रियांचं शिक्षण व अर्थार्जन, बदलती जीवनशैली व राहणीमान.. अशा अनेकविध कारणांमुळे एकत्र कुटुंबपद्धती ‘अव्यवहार्य’ होत गेली. होय, तशी अनेक कारणं आहेत, पण एकत्र कुटुंबव्यवस्थेचा नेमका ‘आधार’ कोणता होता व तिचं जे विघटन झालं ते नेमकं कशामुळे, यासंदर्भात मतमतांतरे आहेत.

असं म्हटलं जातं, की एकत्र कुटुंबपद्धती मुख्यतः स्त्रियांच्या त्यागावर आधारित होती. स्त्रियांचा पूर्ण वेळ कुटुंबासाठीच खर्च होत असे. पुन्हा सणवार, उत्सव, परंपरा होत्याच. स्त्रिया त्यात उत्साहानं सहभागी होत असत, कारण अधिकचं राबणं किंवा उस्तवारी होती. तशीच काही हौसमौजही होती.. विरंगुळा होता. यात काही तथ्य निश्‍चित आहे, पण या संदर्भात आध्यात्मिक आणि समाजशास्त्रीय असे दोन दृष्टिकोन आहेत, तेही समजून घेऊ या. ईशा फाउंडेशनचे सद्‌गुरू म्हणतात त्याप्रमाणे ‘योग’ हाच एकत्र कुटुंबपद्धतीचा मूळ आधार होता. योग म्हणजे सर्वसमावेशकता. तुम्ही सर्वसमावेशक असाल तरच नातेसंबंध जोडू शकता. योग शब्दाचा अर्थच मुळी जोडलं जाणं, ऐक्‍य होणं असा आहे. सृष्टीतील एकूणएक सर्वांशी ऐक्‍य साधणं म्हणजे योग. पूर्वीच्या एकत्र कुटुंबात फक्त चुलत, मामे, आतेभावंडांशी नव्हे तर गुरंवासरं, पाळीव प्राणी, परसातील वृक्षवेली.. या साऱ्यांशी जिव्हाळ्याचं नातं जोडलेलं असायचं. पण जसजसे आपण सुशिक्षित, आधुनिक होत गेलो, तसतसे स्वकेंद्रित होत गेलो.

सद्‌गुरू म्हणतात त्याप्रमाणे आता तर नवरा-बायकोसुद्धा एकत्र राहणं अवघड झालं आहे. काहींना तर फक्त ‘वीकेंड विवाहित आयुष्य’ पुरेसं वाटतं! पण हेही तितकंच खरं की अत्याधुनिक सुविधा सुखसोयी असूनही आज लोक तणावग्रस्त आहेत.. ‘एकटे’ आहेत. स्वकेंद्रितपणाच त्यांना या तणावात, एकटेपणात, नैराश्‍यात लोटतो आहे. याच संदर्भातला समाजशास्त्रीय दृष्टिकोन मांडताना डॉ. शुभांगी पारकर म्हणतात, ‘ज्या एकत्र कुटुंबात स्त्रिया अखंड राबत, दुय्यम जिणं जगत असं म्हटलं जाते, त्या ‘एकत्र कुटुंबा’कडं ‘संरचना’ म्हणून पुन्हा एकदा खुल्या मनानं पाहायला हवं. अशा कुटुंबपद्धतीचं, व्यक्तीच्या आणि समाजाच्या जडणघडणीत मोठं योगदान असतं. अशा कुटुंबात प्रत्येकाच्या गरजा, सगळ्यांना मिळणारे फायदे, जबाबदाऱ्यांची वाटणी, प्रत्येकाचं कमी अधिक दुःख, शहाणपण या सगळ्या गोष्टींचा एकमेकांशी मेळ जुळून यायला मुळात ‘कॅनव्हास’ मोठा असतो. त्यातल्या व्यावहारिक फायद्यांसह ती व्यवस्था चालत राहावी, याचं वंगण आतूनच पुरवलं जातं. धक्के, आव्हानं, ताण सहन करण्याची एकत्र कुटुंबाची क्षमता जास्त असते.

त्यात एकेकट्या, भरकटलेल्या व्यक्तींनाही सामावून घेणं शक्‍य असतं.. त्या पलीकडे त्या अख्ख्या कुटुंबाची म्हणून विशिष्ट मूल्यं असतात, शिस्त असते. कुटुंबाचं अस्तित्व टिकणं हे भान मुख्य असतं, त्यामुळे व्यक्तिगत सुखदुःखं कमी टोकदार करून बघायची सवय लागते.. आज जे ताण दिसताहेत, ते कुटुंबव्यवस्थेचे दुष्परिणाम नव्हेत.. उलट कुटुंब नावाचा भला मोठा ‘आधारवड’तुटत जाण्याचे परिणाम आहेत. लग्न, संसार, कुटुंब.. या व्यवस्थेत दोष नाहीत.. तोकडी पडते ती आपली समजूत. पूर्वी एकत्र कुटुंबामध्ये, एकमेकांबरोबर जगण्याचे धडे आपोआप मिळत. आता मात्र ते धडे आधी शिकायचे राहिल्यानं लग्नानंतरच शिकावे लागतात.. त्यात नेमके दोघांचेही ‘इगो’ आडवे येतात.’’ घटस्फोटांचं मुख्य कारण ‘इगो’ हेच तर असतं. एकत्र कुटुंबं लयाला गेलीच आहेत, पण आज विभक्त कुटुंबंही अस्थिर होत आहेत. स्वकेंद्रित वृत्ती आणि इगो - हेच सुसंवादी सहजीवनातले मुख्य अडसर आहेत. खरं तर व्यक्तिगत विकासात आणि आंतरिक समाधानातही ते अडसरच ठरत असतात!

टॅग्स :familyEditorial Article