कुटुंब डॉट कॉम : एकटं का राहायचं?

आपण लग्नसंस्था आणि कुटुंबव्यवस्था नाकारणाऱ्या विचारप्रवाहांचा विचार करीत आहोत. ‘सोलो ट्रेन्ड’मध्ये लग्न आणि कुटुंबच नव्हे, तर स्त्री-पुरुष सहजीवनही नाकारलेलं आहे.
Marriage
Marriagesakal
Summary

आपण लग्नसंस्था आणि कुटुंबव्यवस्था नाकारणाऱ्या विचारप्रवाहांचा विचार करीत आहोत. ‘सोलो ट्रेन्ड’मध्ये लग्न आणि कुटुंबच नव्हे, तर स्त्री-पुरुष सहजीवनही नाकारलेलं आहे.

आपण लग्नसंस्था आणि कुटुंबव्यवस्था नाकारणाऱ्या विचारप्रवाहांचा विचार करीत आहोत. ‘सोलो ट्रेन्ड’मध्ये लग्न आणि कुटुंबच नव्हे, तर स्त्री-पुरुष सहजीवनही नाकारलेलं आहे. आपल्याकडे हे प्रमाण अगदी अल्प असलं तरी त्यासंदर्भात तरुणाईची मानसिकता बदलत आहे. शिक्षण व नोकरीच्या निमित्तानं एकटं राहणाऱ्या व करिअरला प्राधान्य देणाऱ्या तरुण-तरुणींच्या तोंडी आता, ‘लग्न करून आजवर कुणाचं भलं झालंय?’ ‘सुखाचा जीव कशाला संकटात घाला?’ असे प्रश्‍न येऊ लागले आहेत. ‘स्वातंत्र्या’ची चव चाखल्यामुळे अनेकांना लग्नामुळे येणारी बंधनं नकोशी वाटत आहेत. तशातच ‘सोशल मीडिया’मुळे आभासी विश्‍वातल्या नात्यांचं आकर्षण वाढतं आहे. अर्थात हे तर खरंच की लग्न करणं न करणं, हा तसा वैयक्तिक प्रश्‍न आहे. मुद्दा एवढाच आहे की लग्नाविषयीचा असो अथवा लग्न न करण्याचा असो- कुठलाही निर्णय हा विचारपूर्वकच घ्यावा लागतो, कारण तो आयुष्यभराचा प्रश्‍न असतो.

म्हणूनच त्यासाठीचं हे चिंतन मंथन! आजच्या तरुणाईला ते नक्कीच मार्गदर्शक ठरू शकेल... पालकही त्यांच्या मुला-मुलींशी त्या अनुषंगानं बोलू शकतील. प्रथम एकटं राहू इच्छिणाऱ्या तरुणांसंदर्भात बोलूयात.

मी या विषयावर अधिकारवाणीनं काही बोलू शकतो, कारण स्वतः ‘सिंगल’ असल्यानं एकटं जगण्याचा अनुभव (आणि आनंदही) मी पुरेपूर घेतला आहे. पण मौज अशी की माझा लग्नसंस्थेवर आणि कुटुंबव्यवस्थेवर पूर्ण विश्‍वास आहे. थोडा ‘लक्‌ फॅक्‍टर’ असतो, पण योग्य जोडीदाराची साथ लाभली तर तुम्ही सुंदर, अर्थपूर्ण जीवन आणि समृद्ध सहजीवन यांची नक्कीच सांगड घालू शकता. अशी अतिशय सुसंवादी सहजीवनाची अनेक उदाहरणं मी पाहिली आहेत. त्याचवेळी केवळ करिअरनं झपाटलेल्या ‘वर्कोहोलिक’ तरुणांचीही उदाहरणं पाहिली आहेत, लग्न कमिटमेंट हे त्यांना नकोसं असतं. त्यामुळे ‘कॅज्युअल रिलेशन्स, ऑनलाइन चॅटिंग, महागडं शॉपिंग, मद्यपान/धूम्रपान... असे तात्पुरते ‘रिलॅक्स‍’ होण्याचे मार्ग शोधले जातात. पण आतून ही मंडळी अस्वस्थच असतात. मैत्री, कुटुंब, जिव्हाळ्याचे नातेसंबंध, शेअरिंग, आंतरिक संवाद... हे सारंच नाकारल्यानं त्यांना इतकं यश कमावूनही पदरी काय पडलं, हा प्रश्‍न सतावत राहतो. खरा प्रश्‍न ‘करिअर की जीवनशैली?’ हा असतो!

काही कलावंत, संशोधक, समाजसेवक... आपल्या ध्येयासाठी आयुष्य समर्पित करता यावं म्हणून एकटं राहण्याचा निर्णय घेतात. अशा व्यक्ती समाजासाठी खूप मोठं योगदान देत असतात यात शंकाच नाही; पण ध्येयपूर्ती व वैवाहिक सहजीवन या दोन्हीची अतिशय सुरेख सांगड घालणारेही असतातच. एकटं राहण्यातल्या ‘स्वातंत्र्या’चा मोह अनेकांना पडतो, पण स्वातंत्र्यासोबत जबाबदारीही येते, याचा त्यांना विसर पडतो. हे खरंय की तुम्हाला ‘मैत्री’चं- अगदी अनिर्बंध मैत्रीचं स्वातंत्र्य असतं, पण मैत्री ही काही ठरवून करता येत नसते, ती जुळावी लागते. म्हणजे तिथेही ‘लक्‌ फॅक्‍टर’ येतोच! लग्नामुळे तुम्हाला तडजोडी कराव्या लागतात. अनेक बाबतीत जुळवून घ्यावं लागतं हेही खरंय, पण एकटं राहताना तर थेट एकटेपणाशीच जुळवून घ्यावं लागतं! एकटं राहणं... तेही आयुष्यभरासाठी... सोपं नसतंच. कधी कधी रिकामं घर खायला उठतं. थकून भागून तुम्ही घरी येता तेव्हा बंद दाराचं कुलूपच तुमचं स्वागत करतं.

घरकामाला, स्वयंपाकाला बाई लावता येते, हॉटेलात खाता येतं, हवं तेव्हा ऑनलाइन काहीही मागवता येतं. हे सगळं असलं तरी शेवटी सर्वच गोष्टींना मर्यादा असतात. वेळप्रसंगी सगळंच तुम्हाला करता यावं लागतं. ते तुम्हाला जमणार नसेल तर स्पष्टच सांगतो - एकटं राहू नका. कवितांमधून रंगवला जातो तसा आळशी, बेफिकीर, अजागळ, उदास, त्रासलेला बॅचलर म्हणून जगू नका. त्यापेक्षा लग्न करा आणि ‘मोकळे’ व्हा!

मी एकटं राहण्याची एकच बाजू रंगवतोय असं समजू नका. अनेकदा तिच्याकडे दुर्लक्ष होतं, म्हणून ती प्रकर्षानं मांडतोय एवढंच. एकटं राहण्याचे फायदेही आहेतच. पण तरीही एक निश्‍चित - उभं आयुष्य एकट्याच्या बळावर पेलण्याचा आत्मविश्‍वास असल्याशिवाय तसा निर्णय घेऊ नये!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com