कुटुंब डॉट कॉम : परिचयोत्तर विवाह

यशस्वी ‘लग्ना’साठी सर्वांत कळीची ठरते ती जोडीदाराची निवड आणि जोडीदाराच्या निवडीत सर्वांत महत्त्वाचे ठरतात ते परस्परांचे विचार, स्वभाव, सवयी आणि आवडीनिवडी.
Marriage
Marriagesakal
Summary

यशस्वी ‘लग्ना’साठी सर्वांत कळीची ठरते ती जोडीदाराची निवड आणि जोडीदाराच्या निवडीत सर्वांत महत्त्वाचे ठरतात ते परस्परांचे विचार, स्वभाव, सवयी आणि आवडीनिवडी.

यशस्वी ‘लग्ना’साठी सर्वांत कळीची ठरते ती जोडीदाराची निवड आणि जोडीदाराच्या निवडीत सर्वांत महत्त्वाचे ठरतात ते परस्परांचे विचार, स्वभाव, सवयी आणि आवडीनिवडी. हे सारं समजून घेण्यासाठी निर्णय घेण्यापूर्वी दोघांच्या भेटीगाठी व्हायला हव्यात. परस्परांशी प्रामाणिक व मनमोकळा संवाद व्हायला हवा. दोघांचे स्वभाव जुळणारे असतील, काही समान गुण असतील तर उत्तमच; पण नसतील तेव्हा परस्परपूरक गुणांचा विचार करावा. एकजण मितभाषी असेल तर दुसरा मोकळा, बोलका असणं किंवा एकजण जरा स्वप्नाळू असेल तर दुसरा व्यवहारी असणं, हे पथ्यावरच पडत असतं. एकमेकांच्या आवडीनिवडीही समजून घ्याव्यात. त्याही समान असतील तर उत्तमच; पण नसतील तिथेही सहभाग, प्रोत्साहन देण्याची भूमिका असावी. एकीला वाचनाची आवड असेल आणि जोडीदार मात्र ‘वाचत लोळणं म्हणजे वेळ वाया घालवणं’ अशा मताचा असेल तर अंतर राखणंच शहाणपणाचं. एकमेकांच्या सवयीही जाणून घ्याव्यात. न पटणाऱ्या सवयींबाबत विशेष चर्चा व्हावी. जोडीदाराची फक्त आर्थिक स्थिती नव्हे तर त्याची अभिरुची, मूल्यंही महत्त्वाची असतात. शिक्षण महत्त्वाचं असतंच पण त्याची सुसंस्कृतता, प्रगल्भता, गुणग्राहकता, संवेदनशीलता... याही गोष्टी महत्त्वाच्या असतात. कोणताही जोडीदार निवडला तरी शेवटी जुळवून घ्यावंच लागतं; पण कोणत्या बाबतीत जुळवून घ्यायचं आहे ते आधीच कळून, स्वीकारून मग निर्णय घ्यायला हवा. एक तर निश्चित केवळ आकर्षक बाह्यरुपाला भाळून आंतरिक ‘गुणां’कडे दुर्लक्ष करू नये. परस्पर अनुरुप दिसलं तर उत्तमच; पण मुख्यतः परस्परपूरक असायला हवं.

चार दोन भेटींत हे सारं पारखणं सोपं नसतं; पण त्यासाठी आता ‘पर्सनॅलिटी टेस्ट्स’, ‘कम्पॅटिबिलिटी टेस्ट्स’ उपलब्ध आहेत. त्यांतून नक्कीच काही मदत मिळू शकते. विशेषतः काही नकारात्मक बाबी समोर आल्या तर सावध होता येतं. अर्थात हेही तितकंच खरं की या चाचण्या म्हणजे तशा चाचपण्याच असतात. थोडंबहुत मार्गदर्शन मिळालं तरी शेवटी त्यांच्या निष्कर्षापेक्षा दोघांचं व्यक्तिगत ‘जजमेन्ट’ हेच महत्त्वाचं असतं. त्यासाठीच पुण्याच्या ‘साथ साथ विवाह अभ्यास मंडळा’तर्फे ‘परिचयोत्तर विवाह’ ही संकल्पना राबविली जाते. प्रेमाचे अनेक प्रकार असतात... अगदी प्रथमदर्शनी प्रेमही असतं; पण शेवटी ‘सहवासोत्तर प्रेम’ हेच सर्वांत विश्वासार्ह व टिकाऊ ठरतं. ‘परिचयोत्तर विवाह’ हाही तसाच एक विश्वासार्ह पर्याय म्हणता येईल. काय आहे ही संकल्पना? ती स्पष्ट करताना वंदना सुधीर कुलकर्णी म्हणतात, ‘परिचयोत्तर विवाह हे खरं तर ‘ॲरेन्ज्ड मॅरेज’चंच एक्स्टेन्शन आहे, ज्यात अधिक विचाराला, परस्परांच्या अधिक ओळखीला वाव आहे. याला ‘सुपरवाईज्ड डेटिंग’ असंही म्हणता येईल. इथे मुलंमुली एकत्र येतात. समुपदेशन, चर्चा, रोल प्लेइंग, खेळ, शिबिरं, सहली, पुस्तकांवर/नाटक, चित्रपटांवर चर्चा, काही खास जोडप्यांशी गप्पा... अशा विविध उपक्रमांत सहभागी होताना मुलामुलींची ओळख व मैत्री होते.

स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास होतो, उकल होते. दुसऱ्याच्या दृष्टीतून स्वतःकडे बघण्याच्या संधीमुळे स्वतःची ओळख अधिकाधिक वास्तव व परिपूर्ण होत जाते. जोडीदाराबद्दलच्या अपेक्षा व वैवाहिक आयुष्याविषयीचे विचार व कल्पना पुरेशा स्पष्ट होतात. त्यामुळे जोडीदाराची योग्य पारख व निवड करणं शक्य होतं. यानंतरच्या टप्प्यात मुलामुलींच्या मैत्रीपूर्ण भेटी सुरू होतात. अशा भेटींच्या कोणत्याही टप्प्यावर एखाद्या बाबतीत ‘तडजोड अशक्य’ असं जाणवलं तर थांबता येतं. लग्न जमलं नाही तरी मैत्री टिकून राहते आणि महत्त्वाचं म्हणजे हे सारं मोकळ्या अनौपचारिक वातावरणात घडत असतं. समोरच्याला छान जोडीदार मिळावा, असा मैत्रीपूर्ण सदिच्छाभावच दोघांच्या मनात असतो. अशा या ‘परिचया’नंतर आवडीनिवडी, छंद, स्वभाव, अपेक्षा बऱ्यापैकी मिळत्याजुळत्या असतील तर (माहिती झालेल्या) गुणदोषांसह स्वीकारणं -हे एखाद्या अगदी अपरिचिताच्या गळ्यात माळ घालण्यापेक्षा नक्कीच श्रेयस्कर! ‘रिस्क’ तर असतेच पण ही ‘नोन रिस्क’ केव्हाही परवडते.’ ‘परिचयोत्तर विवाह’ ही संकल्पना आता व्यापक स्वरूपात राबवली जायला हवी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com