
छप्पर फाड के...!
छप्पर फाड के...!
स्थळ : मातोश्री हाइट्स, वांद्रे. वेळ : निघून गेलेली!
उधोजीसाहेब : (विमनस्कपणे पलंगावर बसून) हरि हरि!!
चि. विक्रमादित्य : (दार ढकलून खोलीत येत) हाय देअर...बॅब्स! हरी अप!!
उधोजीसाहेब : (तंद्रीत) हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी!
विक्रमादित्य : (निरागसपणे) कधी आहे हो पुण्याची गणना?
उधोजीसाहेब : (सुस्कारा सोडत) कुणास ठाऊक! नियतीच्या मनात काय आहे, कुणी ओळखलंय?
विक्रमादित्य : (च्याट पडत) मी पुण्याच्या पोटनिवडणुकीचं काऊंटिंग कधी आहे, एवढंच विचारलं होतं!
उधोजीसाहेब : (हात झटकून) काय फरक पडतो आता? पाच तारीख, सोळा, अठ्ठावीस, पस्तीस, अडुसष्ट, नव्व्याण्णव...कुठलीही तारीख असेल! काळ वाहातच असतो!!
विक्रमादित्य : (चक्रावून) असं का म्हणता? ऑल इज नॉट लॉस्ट!!...वी स्टिल कॅन फाइट!! चला, लौकर! घाई करा!
उधोजीसाहेब : (हताश होत्साते) ज्यांना आपलं मानलं, त्यांनीच केसांनी गळा कापला! वाघाचं कातडं ओरबाडून, चोरुन लुटून नेलं, आणि लेकाचे आता वाघ म्हणून मिरवताहेत! कातडी पांघरुन वाघ होता येत नसतं, म्हणावं!
विक्रमादित्य : (विचारपूर्वक) हेच आता आपण लोकांना सांगू या!
उधोजीसाहेब : (विव्हल होत...) आता काय उरलंय? तेल गेलं, तूप गेलं, वाघ गेला, माणसं गेली, नाव गेलं, धनुष्यबाण गेला...सग्गळ्ळं गेलं!!
विक्रमादित्य : (स्फुरण चढून) आपण सगळं काही पुन्हा मिळवू! राखेतून झेप घेणाऱ्या फिनिक्स पक्ष्याप्रमाणे आभाळात उडू!! फिनिक्स हा बर्ड आहे ना ?
उधोजीसाहेब : (संयमाने खोल आवाजात) बर्ड म्हणजे पक्षी नाही का?
विक्रमादित्य : (टाळीसाठी हात पुढे करत) हात्तिच्या! नेहमी ऐकत होतो, फिनिक्स पक्ष्याप्रमाणे झेप घेऊ, वगैरे! मला वाटलं ते पार्टीचंच नाव आहे! हाहाहा!!
उधोजीसाहेब : (कळवळून) तुला काही कामं नाहीत का? ...नसतीलच! जाऊ दे!
विक्रमादित्य : (उत्साहात) आपण आपल्या नव्या पक्षाचं नाव फिनिक्ससेना असंच ठेवू या का? मस्त वाटेल!!
उधोजीसाहेब : (अध्यात्मिक तटस्थतेचा कडेलोट...) नावात काय आहे? माणूस मर्त्यलोकात का येतो? त्याच्या जगण्याचं प्रयोजन काय? या असार असलेल्या संसाराचं नेमकं सार काय आहे? तुमने क्या पाया? क्या खोया? तुमने क्या लाया था, जो तुमने खो दिया? तुमने क्या खोया, जो तुम्हारा था?...
विक्रमादित्य : (गंभीर होत) बॅब्स...आता आपण छप्पर फाड के एण्ट्री घ्यायला हवी!
उधोजीसाहेब : (उपदेश करत) अरे, आपण काहीच करत नसतो! नियती आपल्या हातून सारं काही घडवून आणत असते! आपण असतो फक्त कळसूत्री बाहुल्या...बरं का!
विक्रमादित्य : (काहीही टोटल न लागल्याने) ते जाऊ दे! मला असं वाटतं की तुम्ही आता अँग्री यंग मॅन व्हा!!
उधोजीसाहेब : (गोंधळून) अँग्री यंग मॅन? म्हणजे काय?
विक्रमादित्य : (कमरेवर एक हात ठेवून डावा हात नाचवत आवाज बदलून) इस वक्त मेरी जेब में पांच फूटी कौडियां भी नहीं, और मैं पांच लाख का सौदा करने आया हूं, मि. आऽर के गुप्ताऽऽ!...मैं आज भी फेंके हुए पैसे नहीं उठाता...एटसेटरा, एटसेटरा!!
उधोजीसाहेब : (जुन्या जमान्यात रंगून जात) मला तो देवळातला सीन आठवतोय, ‘खुश तो बहोत होंगे तुम...’वाला!!
विक्रमादित्य : (उत्साहात) बस, अब वही करना है! चला तर मग...! बाहेर उघडी मोटार तुमची वाट पाहात आहे! हर हर महादेव!