इतिहास घडविणाऱ्या नियतकालिकाची गोष्ट

मराठी भाषेत नियतकालिकांची परंपरा मोठी आहे. यात दीर्घकाळ तळपत राहिलेले एक नाव म्हणजे ‘जीवन शिक्षण’.
jeevan shikshan book
jeevan shikshan booksakal
Summary

मराठी भाषेत नियतकालिकांची परंपरा मोठी आहे. यात दीर्घकाळ तळपत राहिलेले एक नाव म्हणजे ‘जीवन शिक्षण’.

- श्रीकांत चौगुले

दीड शतकाहून अधिक काळ चाललेले मराठीतील शिक्षणविषयक नियतकालिक म्हणजे ‘जीवन शिक्षण’ हे मासिक. मे महिन्यात १८६१ मध्ये त्याची सुरुवात झाली. या नियतकालिकाला १६१ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त.

मराठी भाषेत नियतकालिकांची परंपरा मोठी आहे. यात दीर्घकाळ तळपत राहिलेले एक नाव म्हणजे ‘जीवन शिक्षण’. मराठीमध्ये सलग १३२ वर्षे प्रकाशित होणारे व १६१ वर्षांची परंपरा असलेले हे एकमेव मासिक. महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण विभागाचे मुखपत्र अशी त्याची ओळख आहे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) या राज्यस्तरीय संस्थेच्या वतीने प्रकाशित केले जाते.

ब्रिटिशांनी पुण्यात संस्कृत शिक्षण देणारे कॉलेज १८२१मध्ये सुरू केले पुढे त्याचे ‘शिक्षक प्रशिक्षण केंद्रा’त रूपांतर झाले. त्याच कॉलेजने १८६१मध्ये ‘पाठशाळा पत्रक’ असे नियतकालिक सुरू केले. ते १८७५मध्ये काही कारणास्तव बंद पडले. साधारण पंधरा वर्षाच्या खंडानंतर १८९०मध्ये ते पुन्हा सुरू करण्यात आले. ‘चित्रशाळा प्रेस’ या संस्थेने त्याची जबाबदारी घेतली. ते ‘मराठी शाळापत्रक’ या नावाने सुरू झाले. त्याला शाळा खात्याचे सहकार्य होते. १९११मध्ये पुन्हा ते मासिक ‘ट्रेनिंग कॉलेज’कडे आले. ‘मराठी शिक्षक’ या नावाने ते सुरू झाले. १९२८ मध्ये त्याचे नाव ‘प्राथमिक शिक्षण’ असे झाले. ग. ह. पाटील प्राचार्य असताना या मासिकाचे नाव ‘जीवन शिक्षण’ असे ठेवले.

सुरुवातीला कॉलेजचे प्राचार्य नंतर संस्थेचे संचालक यांच्याकडे संपादकाची जबाबदारी आली. आजवर अनेक शिक्षणतज्ज्ञ आणि साहित्यिकांनी ही परंपरा सांभाळली आहे. सध्याचे संचालक एम. डी. सिंह तर विभागाच्या प्रमुख डॉ. किरण धांडे हे ती परंपरा पुढे नेत आहेत. या मासिकाचे विविधांगी महत्त्व आहे. मासिकाच्यारूपाने गेल्या दीड-दोनशे वर्षांचा शैक्षणिक, सामाजिक इतिहासच जतन केला गेला आहे. मासिकातून अध्यापनपद्धती, भाषा, गणित, इतिहास, भूगोल आदी विषयाचे ज्ञान दिले जाते. तत्कालीन काळातील अनेक घडामोडींची नोंद अंकात सापडते.

आचार्य प्र.के.अत्रे टीचर डिप्लोमा करण्यासाठी लंडनला गेले होते. तिकडून परत आल्यावर त्यांचा सत्कार आणि त्यांचे भाषण संस्थेत झाले होते. शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या घटना, प्रसंग, सरकारी आदेश, सरकारी जाहिराती तसेच रंजक माहिती या अंकामध्ये पाहायला मिळते.शिक्षणतज्ज्ञांचे मार्गदर्शन, शिक्षकांचे लेख, विविध वृत्त, घडामोडीही वाचायला मिळतात. विशेष म्हणजे गेल्या शंभर वर्षातील अंक संस्थेत उपलब्ध आहेत. हा एक ऐतिहासिक, सांस्कृतिक ठेवा आहे. तो जतन करण्यासाठी उपयुक्त माहितीचे खंड प्रकाशित करून, त्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे. शिक्षणशास्त्राच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा दस्तावेज आहे. राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘जीवन शिक्षण’ अंक जात होता. कोरोना काळात त्यामध्ये खंड पडला तरी या काळात डिजिटल अंक देण्याचा प्रयत्न करण्यात आला. नवीन ज्ञान, माहिती, शैक्षणिक अनुभवांचे आदान-प्रदान यासाठी हा अंक शिक्षकांना उपयुक्त ठरतो आहे.

फळा कसा रंगवावा?

गेल्या शतकात शाळेतील अन्य कामेही शिक्षकांनाच करावी लागत, त्यामुळे ‘शिक्षकांनी फळा कसा रंगवावा’ याची कृती सांगणारा लेखही मासिकात आहे. ध्वनिवर्धक नसलेल्या काळात कार्यक्रम कसे होत, त्यासाठी व्यासपीठाची व्यवस्था कशी असे, अशी रंजक माहिती अंकात दिली जात असे. अंक चाळताना अशा अनेक गोष्टी कळतात.

(लेखक ‘जीवन शिक्षण’च्या संपादक मंडळाचे सदस्य आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com