बुद्धिप्रामाण्यवादी शिवराय

श्रीमंत कोकाटे
Wednesday, 19 February 2020

छत्रपती शिवाजी महाराज समतेचा पुरस्कार करणारे, शेतकरी हितकर्ते, सर्वधर्मसहिष्णू, महिलांचा आदर करणारे होते. तसेच, ते बुद्धिप्रामाण्यवादीही होते. त्यांच्या प्रागतिक विचारांचा प्रत्यय त्यांच्या जीवनातून आणि कारभारातून येतो. आजच्या शिवजयंतीनिमित्त त्यांच्या या पैलूंवर दृष्टिक्षेप.

छत्रपती शिवाजी महाराज समतेचा पुरस्कार करणारे, शेतकरी हितकर्ते, सर्वधर्मसहिष्णू, महिलांचा आदर करणारे होते. तसेच, ते बुद्धिप्रामाण्यवादीही होते. त्यांच्या प्रागतिक विचारांचा प्रत्यय त्यांच्या जीवनातून आणि कारभारातून येतो. आजच्या शिवजयंतीनिमित्त त्यांच्या या पैलूंवर दृष्टिक्षेप.

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात कोणत्याही स्वरूपाचा भेदभाव न करता रयतेचे राज्य निर्माण केले. त्यांनी शेतकऱ्यांचे हित जोपासले, आपल्या राज्यातील कोणीही उपाशीपोटी झोपणार नाही, यासाठी अन्नधान्य उपलब्ध केले. त्यांच्या राज्यात गुलामांच्या खरेदी-विक्रीवर बंदी होती, असे दक्षिण दिग्विजय प्रसंगी ऑगस्ट १६७७ मध्ये डच व्यापाऱ्यांबरोबर झालेल्या करारावरून स्पष्ट होते. त्यांचा राजकीय लढा मानवतावादासाठी होता. त्यांनी धर्मग्रंथ, धर्मस्थळे, स्त्रिया आणि लहान मुले; मग ती शत्रूंची असली, तरी त्यांचा आदर, सन्मान आणि संरक्षण करण्याचे आदेश मावळ्यांना दिले होते. शत्रुमुलखातील पिकांचीदेखील तसनस (नासधूस) करू नये, अशा त्यांच्या सक्त सूचना होत्या. त्यांचे स्वराज्य लोककल्याणकारी होते. शिवाजीराजे जसे समतावादी, शेतकरी हितकर्ते, सर्वधर्मसहिष्णू, महिलांचा आदर करणारे होते. तसेच, ते बुद्धिप्रामाण्यवादीही होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शिवाजी महाराजांना आपल्या इष्ट परंपरांचा अभिमान होता. ‘हर हर महादेव’ हा त्यांचा जयघोष होता. शंभूमहादेवावर, तुळजापूरच्या तुळजाभवानीवर त्यांची नितांत श्रद्धा होती. त्या श्रद्धेतून त्यांनी प्रतापगडावर तुळजाभवानीची प्रतिष्ठापना केली. जोतिबा, खंडोबा, विठोबा इत्यादी लोकदैवतांवर त्यांची परम भक्ती होती. पण, ते देवभोळे नव्हते. याबाबत शिवचरित्राचे अभ्यासक, विशेषतः शिवरायांच्या पत्रांचे अभ्यासक डॉ. प्र. न. देशपांडे म्हणतात, ‘‘अनुष्ठान बळावर मनोरथ पूर्ण करण्याचा भाबडा दैववाद महाराजांजवळ निश्‍चितच नव्हता.’’ शिवाजी महाराजांना लोकदैवतांबद्दल आदर होता. परंतु, यश मिळवण्यासाठी रणांगण गाजवावे लागते, नियोजनबद्ध लढा द्यावा लागतो; अर्थात प्रयत्न करावे लागतात, तेव्हाच यश मिळते, हे वास्तव महाराजांना चांगले उमगलेले होते. स्वराज्य स्थापनेचे मनोरथ पूर्ण करण्यासाठी अनुष्ठानाला बसून यशप्राप्ती होणार नाही, याची जाणीव त्यांना होती. हाती घेतलेल्या कार्यात यश मिळविण्यासाठी चातुर्य पणाला लावावे लागते, संघर्ष करावा लागतो, ही वैचारिक प्रगल्भता महाराजांकडे होती. ते प्रवाहपतित, म्हणजेच प्रवाहाबरोबर वाहत जाणारे नव्हते. त्यांची काही ठाम मते होती. त्यांच्या काही पत्रांतून, विविध प्रसंगांतून ती स्पष्ट दिसतात.

शाहिस्तेखान स्वराज्यावर चालून येत असल्याची खबर शिवरायांना हेरांकडून समजली, तेव्हा त्यांनी कारी (ता. भोर) येथील आपले सहकारी सर्जेराव जेधे यांना २३ ऑक्‍टोबर १६६२ ला तातडीने कळविले, की ‘‘रयतेला लवकरात लवकर सुरक्षित ठिकाणी पाठवावे. लेकरेबाळे यांना सुरक्षित ठिकाणी पोहोच करा. या कामात हयगय कराल, तर रयतेला मोगलांकडून त्रास होईल आणि त्याचे पाप तुमच्या माथ्यावर बसेल.’’ महाराजांच्या या पत्रावरून स्पष्ट होते, की रयतेला मदत करणे, त्यांना अभय देणे, संकटसमयी त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविणे, हेच खरे पुण्य आहे. संकटसमयी त्यांना वाऱ्यावर सोडून देणे हे पाप आहे. ‘परोपकार ते पुण्य, परपीडा ते पाप,’’ अशी महाराजांची पाप-पुण्याची संकल्पना होती. रंजल्या, गांजलेल्या प्रजेला मदत करणे, त्यांना सुखी, सुरक्षित आणि आनंददायी ठेवणे, हेच लोकप्रतिनिधींचे पुण्यकर्म आहे, असे त्यांचे विचार होते. हे विचार बुद्धिप्रामाण्यवादी आहेत.

शहाजीराजांच्या खांद्याला खांदा लावून दक्षिणेत मदत करणारे कान्होजी जेधे हे रोहिडा येथे शिवरायांना मदत करण्यासाठी आले. ते आजारी असताना दोन सप्टेंबर १६६० रोजी शिवाजी महाराजांनी त्यांना पत्र पाठविले. त्या पत्रात आजारी कान्होजी जेधेंना दिलासा देताना ते लिहितात, ‘‘व्यथा बहुत म्हणून लिहिले तरी औसध घेऊन शरीरासी आरोग्य होई ते करणे, उपचारासे विशी आलस न करणे.’’ ‘तुम्ही खूप आजारी आहात, तुम्हाला खूप वेदना होतात, असे समजले. तरी तुम्ही नियमित औषध घ्यावे,’ असा सल्ला महाराज कान्होजींना देतात. मध्ययुगीन काळात अंगारा, धुपारा, जादूटोणा, देवऋषी, नवस, भूतबाधा इत्यादी अंधश्रद्धांचा समाजमनावर पगडा असताना शिवाजी महाराज कान्होजींना औषध घेण्याचा सल्ला देतात. म्हणजे, महाराजांचा विश्‍वास औषधोपचारांवर होता, हे स्पष्ट होते. औषध आणि उपचार हे दोन शब्द महाराजांनी वापरलेले आहेत. ज्याला आधुनिक वैद्यकशास्त्रात ‘मेडिकल ट्रीटमेंट’ म्हटले जाते. हा महाराजांचा वैज्ञानिक दृष्टिकोन होता.

समुद्र उल्लंघनाचे धाडस
मध्ययुगात सतीप्रथेला धार्मिक परंपरा मानले जात होते. ती अमानुष प्रथा होती. शहाजीराजांच्या मृत्यूनंतर सती न जाता जिजाऊमाँसाहेब शिवरायांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. सतीप्रथा जिजाऊमाँसाहेबांनी नाकारली. यासाठी निश्‍चितच शिवाजी महाराजांचे बुद्धिप्रामाण्यवादी, मानवतावादी विचार महत्त्वाचे ठरतात. शिवाजी महाराज ग्रंथप्रामाण्यवादी नव्हते, तर बुद्धिप्रामाण्यवादी होते. मध्ययुगीन कालखंडात, अगदी आधुनिक काळाच्या उंबरठ्यावरही समुद्र ओलांडून जाणे अधर्म मानले जात होते. समुद्र ओलांडणाऱ्या अनेक विद्वानांना प्रायश्‍चित्त घ्यावे लागले आहे. या पार्श्‍वभूमीवर शिवाजी महाराज अधिक क्रांतिकारक ठरतात. कारण, त्यांनी आरमार दलाची उभारणी केली. स्वराज्याला सर्वाधिक धोका समुद्रमार्गे आहे. ज्याची समुद्रावर सत्ता, त्याची भूमीवर सत्ता; म्हणून त्यांनी सागरी किल्ले उभारले. समुद्रात सिंधुदुर्ग किल्ला बांधला. त्यांनी दक्षिणेकडील समुद्रकिनाऱ्यावरील बेदनूर राज्यातील बसरूरवर समुद्रमार्गे स्वारी केली. आठ फेब्रुवारी १६६५ रोजी ते आपल्या सैन्यासह जहाजे, गलबतांवरून मालवण येथून निघाले आणि १३ फेब्रुवारी १६६५ रोजी बसरूर बंदरात पोहोचले. सहा दिवस समुद्रातून त्यांनी प्रवास केला; म्हणजे समुद्र ओलांडून त्यांनी ‘सिंधुबंदी’ तोडली. मध्ययुगीन काळातील ही धाडसी आणि क्रांतिकारक घटना होती. शिवाजी महाराज बुद्धिप्रामाण्यवादी होते म्हणूनच समुद्र उल्लंघनाचे धाडस ते करू शकले.

शौर्यावर, कष्टावर विश्‍वास 
महाराजांची तुळजाभवानीवर गाढ श्रद्धा होती. परंतु, भवानीदेवीने शिवाजी महाराजांना तलवार दिल्याचा संदर्भ नाही, तर ती तलवार शिवरायांना कोकणातील गोवले गावच्या सावंतांनी भेट दिली. तिचे नाव ‘भवानी’ असे ठेवण्यात आले. महाराजांचा विश्‍वास कर्तृत्वावर होता. त्यांच्या मावळ्यांनी सर्वस्व पणाला लावून स्वराज्य निर्माण केले. त्यांचा विश्‍वास मेंदू, मन, मनगटावर अर्थात शौर्यावर, चातुर्यावर, कष्टावर होता. त्यांनी कधी भविष्य, पंचांग, मुहूर्त पाहिले नाही. कोणत्याही व्यक्तीला अस्पृश्‍य समजले नाही. अनेक किल्ले बांधले. परंतु, वास्तुशास्त्र यासारख्या बाबींचे अवडंबर माजविले नाही.
चोवीस फेब्रुवारी १६७० रोजी शिवाजी महाराजांना सोयराबाईंच्या पोटी राजारामाचा जन्म झाला. तो पालथा जन्माला आला. मुलगा पालथा जन्मला म्हणजे अपशकुन झाला, अशी धारणा त्या काळी होती. त्या वेळेस शिवाजी महाराज म्हणाले, ‘‘हा दिल्लीची पातशाही पालथी घालील,’’ असे समकालीन कृष्णाजी अनंत सभासदाने नोंदवून ठेवले आहे. राजाराम महाराज पालथे जन्मले, या घटनेला अपशकुन न मानता ही घटना म्हणजे तो दिल्लीची पातशाही पालथी घालेल, असा सकारात्मक दृष्टिकोन महाराजांनी ठेवला. त्यांचा शुभ-अशुभ अशा गोष्टींवर विश्‍वास नव्हता. ते सर्जनशील, सकारात्मक, प्रयत्नवादी होते. महिलांचा आदर-सन्मान करणे, त्यांना घोड्यावर बसण्याचे, रणांगण गाजविण्याचे स्वातंत्र्य देणे, हे महाराजांच्या प्रगतिशील विचारांचे उदाहरण आहे.  त्र्यंबक शंकर शेजवलकर म्हणतात, ‘‘शिवाजी महाराज पुराणमतवादी नसून, प्रागतिक सुधारणावादी होते. ते श्रद्धाळू होते हे निर्विवाद; पण ते शहाणे आणि विवेकी होते, हे त्याहून सत्य आहे.’’

ते सुधारणावादी होते म्हणूनच, भेदभाव न बाळगता ते सर्व जातिधर्मीयांना सोबत घेऊ शकले. महिलांना स्वातंत्र्य देऊ शकले आणि कर्मठ, अंधश्रद्धाळू, अनिष्ट परंपरा नाकारू शकले. हे लक्षात घेऊन शिवचरित्रापासून प्रेरणा घेऊन वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणारी पिढी निर्माण व्हावी. संकटसमयी शिवाजी महाराज कधीच नाउमेद झाले नाहीत. मानवता, विवेक, समता, महिलांचा सन्मान, विकासाभिमुख शासनव्यवस्था या गोष्टी शिवाजी महाराजांच्या चरित्रातून आजच्या काळासाठीही प्रेरणा देणाऱ्या आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shrimant Kokate article shivaji maharaj