ट्रोल्सची बिल्ली, राजनाथसिंहांवर म्यॉंव...! 

सोमवार, 17 जुलै 2017

राजनाथसिंह यांच्यावरील या "व्हर्च्युअल' हल्ल्यामुळं अनेकांना काही वर्षांपूर्वी लालकृष्ण अडवानी यांनी पाकिस्तानचा दौऱ्यात बॅरिस्टर महंमद अली जिनांवर उधळलेली स्तुतिसुमने आठवली. अडवानींचं राजकीय करिअर जणू त्या जिनांच्या स्तुतीनं संपवलं. कारण, कुठल्याही मार्गानं हिंदू-मुसलमान यांच्यातली दरी कमी होऊ द्यायची नाही, असा चंगच जणू दोन्हीकडच्या काही मंडळींनी बांधलाय.

दहशतवादाला थेट खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानला उद्देशून अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्‍लिंटन यांनी काढलेले उद्‌गार आठवताहेत का? त्या म्हणाल्या होत्या, "परसदारात साप बाळगल्यानंतर ते दर वेळी शेजाऱ्यांनाच दंश करतील असे नाही, ते कधीतरी तुमच्यासाठीही धोकादायक बनू शकतात'. ते आठवायचं कारण, एरव्ही सोशल मीडियावरच्या ट्रोल्समुळे विरोधक घायाळ होतात, भाजपवाल्यांना मनातल्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटतात. त्या टवाळखोरांचं लक्ष्य आता खुद्द देशाचे गृहमंत्री राजनाथसिंह ठरलेत.

अमरनाथ यात्रेवरून परतीच्या वाटेवर गुजरातमधल्या भाविकांवर अतिरेक्‍यांनी भ्याड हल्ला केला. त्यात सात भाविकांचा बळी गेला. देशाच्या कानाकोपऱ्यातून त्या हल्ल्याबद्दल प्रचंड संताप व्यक्‍त होतोय. काश्‍मीरचा एकदा काय हो सोक्षमोक्ष लावून टाका, असाच त्या संतापाचा रोख आहे. अशा वेळी दहशतवादी हल्ल्याच्या घटनेचे भांडवल होऊ नये, धार्मिक द्वेष वाढू नये म्हणून गृहमंत्र्यांनी काश्‍मीरमधूनही हल्ल्याचा निषेध होत असल्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. "जम्मू-काश्‍मीरच्या मुख्यमंत्र्यांसह तिकडचे सगळे या हल्ल्याचा निषेध करताहेत, सगळे काश्‍मिरी अतिरेकी नाहीत', असं सांगाताना त्यांनी "काश्‍मीरियत'चं कौतुक केलं. त्यांचा तो "ट्‌विट' पडला अन्‌ "ट्रोल्स'चं आग्यामोहोळ त्यांच्यावर तुटून पडलं. अत्यंत शिवराळ भाषेत त्यांची टर उडवली जातेय. "कडी निंदा' शब्दांच्या आधारे खिल्ली उडवताहेत. "देशाचे सर्वांत दुबळे गृहमंत्री', अशी टीका होतेय. "तुम्ही आधी यात्रेकरूंच्या सुरक्षेचं पाहा! मगच "काश्‍मिरियत' वगैरेच्या गप्पा मारा', असं सुनावलं जातंय. 

राजनाथसिंह यांच्यावरील या "व्हर्च्युअल' हल्ल्यामुळं अनेकांना काही वर्षांपूर्वी लालकृष्ण अडवानी यांनी पाकिस्तानचा दौऱ्यात बॅरिस्टर महंमद अली जिनांवर उधळलेली स्तुतिसुमने आठवली. अडवानींचं राजकीय करिअर जणू त्या जिनांच्या स्तुतीनं संपवलं. कारण, कुठल्याही मार्गानं हिंदू-मुसलमान यांच्यातली दरी कमी होऊ द्यायची नाही, असा चंगच जणू दोन्हीकडच्या काही मंडळींनी बांधलाय. त्यात आता सोशल मीडियावरच्या ट्रोल्सची भर पडलीय. देशातला धार्मिक द्वेष कमी करणारी कोणतीही घटना या मंडळींना रुचतच नाही मुळी. मग, ते गृहमंत्र्यांचं काश्‍मिरियतसंदर्भातलं विधान असो की सलीम शेख नावाच्या चालकानं अतिरेकी हल्ल्यात अनेक भाविकांचा जीव वाचवण्यासाठी दाखवलेलं धाडस असो. अतिरेक्‍यांच्या हल्ल्यात सापडलेली ती बस सलीम शेख यानं गोळ्यांचा वर्षाव होत असताना दोनेक किलोमीटर चालवली व भाविकांचे जीव वाचवले.

संपूर्ण देशाच्या नजरेत तो नायक बनला. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी, तर सलीमची शिफारस शौर्य पुरस्कारासाठी केली जाईल, असं जाहीर केलं. हेदेखील अनेकांना रुचलं नाही. बस नेमकी कोण चालवत होतं, सलीम शेख की बसमालकाचा मुलगा हर्ष देसाई, हा बिनकामाचा वाद गुजरातमधल्याच कुठल्या तरी बातमीच्या आधारे पेटवला गेला. सलीम शेख नायक की खलनायक, यावर अकलेचे तारे तोडणारेही कमी नाहीत. काही वृत्तवाहिन्यांनीदेखील "रिऍलिटी चेक'च्या नावानं त्या वादात तेल ओतलं. एखादा सलीम शेख अमरनाथ यात्रेकरूंचे जीव वाचवूच कसा शकतो, ही या प्रतिक्रियांमागची भावना धार्मिक सद्‌भाव व शांतता हवी असणाऱ्या देशवासीयांसाठी अत्यंत वेदनादायी आहे. 

वाघोबा, तू एफेमशी गोड बोल.... 
यूट्यूबवर, "सोनू तुला माझ्यावर भरवसा नाय काय'', असं विचारणाऱ्या अजय क्षीरसागर, भाग्यशाली क्षीरसागर व चंदन कांबळे यांच्या भन्नाट हिट गाण्यानं तसं शिवसेनेचं घोडं अजिबात मारलेलं नाही. पण, रेडिओ "रेड एफएम'ची आरजे मलिष्का हिच्यावर मात्र शिवसेनेचा वाघ गुरगुरतोय. कारण, तिनं क्षीरसागरच्या या गाण्याचं विडंबन केलं, ""मुंबई, तुला बीएमसीवर भरवसा नाय का?'' त्यात मलिष्का व तिच्या टीमनं बेहाल मुंबईकरांच्या वेदनांवर फुंकर घातली. तसं पाहिलं तर त्या गाण्यात "बीएमसी' व रस्त्यातले खड्डे वगळता सिग्नल, ट्राफिक जाम वगैरे सगळंच आहे. केवळ शिवसेनेच्या ताब्यातल्या महापालिकेच्या कारभारावरच टीका आहे, असं नाही. पण, ते गाणं यूट्यूबवर व्हायरल झालं अन्‌ ते शिवसेनेला प्रचंड झोंबलं. त्याला सेनेकडून गाण्यातच उत्तर देण्याचा प्रयत्न झाला खरा. पण, त्यात फारसा दम नाही. असलं एखादं गाणं इतकं गंभीरपणे घ्यायचं नसतं, हे कुणीतरी शिवसैनिकांना सांगायची गरज आहे. या वादापलीकडं आनंदाची गोष्ट म्हणजे, अजय क्षीरसागरच्या गाण्यानं भाषेच्या व प्रांतांच्या सीमा ओलांडल्या आहेत. त्याची पंजाबी, कोकणी, गुजराती, भोजपुरी व्हर्जन्स त्या त्या भाषेत तुफान गाजताहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shrimant Mane writes about Social media