farmer
farmer

बेभरवशाचं पीक, हमीचा कलगीतुरा! (वुई द सोशल) 

महाराष्ट्राच्या विधिमंडळात अन्‌ बाहेरही शेतकरी आत्महत्या व त्यासाठी कारणीभूत असलेल्या कर्जबाजारीपणाचा मुद्दा तापलाय. नोंदलेली पहिली आत्महत्या अशा यवतमाळ जिल्ह्यातल्या साहेबराव पाटलांच्या एकतिसाव्या वर्षश्राद्धानिमित्त किसानपुत्रांनी "बळिराजासाठी एक दिवस उपवास' केला, तर कर्जमाफीच्या मुद्‌द्‌यावर रणकंदन सुरू आहे. उत्तर प्रदेशात अभूतपूर्व यश मिळविलेल्या भारतीय जनता पक्षानं सत्तेवर आल्यास तिथल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचं आश्‍वासन जाहीरनाम्यात दिलं होतं. त्याची देशभर चर्चा झाली. महाराष्ट्रात या मागणीनं जोर धरला. भाजपला स्वबळाच्या बेटकुळ्या दाखवताना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रचारसभांमध्ये, "शेतकऱ्यांना कर्जमुक्‍त करत असाल तर सरकारला बिनशर्त पाठिंबा देतो', असं जाहीरपणे सांगितलं. विरोधकांनी तो मुद्दा उचलला. विधिमंडळ अधिवेशनाची सुरवातच कर्जमाफीच्या मुद्यावर वादळी झाली. विरोधकांनी गदारोळ केला. उद्धव ठाकरे यांनीही म्हणे आमदारांना, "कर्जमुक्‍ती होत नसेल तर अधिवेशन चालू देऊ नका', अशी सूचना केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर दबाव वाढला. परवा, युतीच्या मंत्र्यांचं शिष्टमंडळ दिल्लीला जाऊन अरुण जेटली, राधामोहन सिंह यांना भेटून आलं. विधिमंडळातल्या धडाकेबाज भाषणात फडणवीसांनी एक नवाच मुद्दा काढला, हमीचा! "कर्जमाफी दिल्यामुळं शेतकरी आत्महत्या थांबतीलच याची हमी देता का', असा सवाल त्यांनी विरोधकांना विचारला. त्यावर "दुष्काळ पडणार नाही, अवकाळी पाऊस येणार नाही, पाणी-वीज मिळेल, याची हमी तुम्ही द्या. मग आम्हीही हमी देतो', असं विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ठणकावलं. विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी गाजरं दाखवली. सोशल मीडियावर "हमी'चं पीक तरारून आलंय. फेसबुक, ट्‌विटर व व्हॉटस्‌ऍपवर हमीवरून कलगीतुरा रंगलाय. 
गेल्या वेळच्या कर्जमाफीनंतरही शेतकरी आत्महत्या थांबल्या नाहीत, हा फडणवीसांचा मूळ मुद्दा आहे. तो खराही आहे. तर, "खरंतर लायक नसलेल्यांना शेतकरी कर्जमाफीचा फायदा मिळू नये याची हमी देण्याचं कर्तव्य सरकारचंच', अशी जाणीव त्यांना एकानं करून दिली. "कर्जमाफीनं आत्महत्या होणार नाहीत, याची हमी देणार का, असं विचारताय मग नोटाबंदी केल्यावर भ्रष्टाचार कमी होईल, याची हमी दिली होती का', असा सवाल विचारणारी पोस्ट व्हॉटस्‌ऍपवर व्हायरल आहे. "यूपी'मध्ये आश्‍वासन देताना अशी हमी मागितली होती का, उत्तर प्रदेशात करता मताची बेगमी अन्‌ महाराष्ट्रात मागता हमी, अशी टीका सुरू आहे. देवेंद्र फडणवीसांकडे गृह खातेही आहे. तेव्हा, राज्यात बलात्कार, खून, गुन्हे होणार नाहीत, याची हमी देता का, अशी विचारणा केली जात आहे. स्टेट बॅंकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी "कर्जमाफीमुळं आर्थिक शिस्त बिघडेल', असं वक्‍तव्य केल्यानं आगीत तेल ओतलं गेलंय. संतापून विचारणा होतेय, "देशाबाहेर पळून गेलेल्या विजय मल्ल्याला कोट्यवधींचे कर्ज कोणत्या हमीवर दिलं होतं?' 
"पावसाची हमी देता का देवेनभाऊ, निदान सिंचनाची हमी देता का भाऊ, "स्वामिनाथन'ची घोषणा करता का भाऊ, उत्पादनखर्चावर पन्नास टक्‍के भाव देता का भाऊ', असं विचारणाऱ्यांसह सगळ्यांनाच माहिती आहे, की शेतीचा धंदाच बेभरवशाचा. अस्मानी निसर्ग बेभरवशाचा, सुल्तानी बाजारही बेभरवशाचा. त्यामुळं हमीची चर्चा तशी वांझोटीच. सत्ताधारी, विरोधक दोघांना या चर्चेतला फोलपणा ठाऊक आहे. ही जाणीव शेतकऱ्यांच्या दु:खावर फुंकर घालण्यासाठी सोशल मीडियावर आक्रोश उभा करणाऱ्यांनाही आहे. अलीकडेच निधन पावलेले यवतमाळचे कवी शंकर बडे यांच्या "विक्रम व वेताळ' कवितेत, "शेतकरी हा राजा विक्रम व शेतमालाचा भाव म्हणजे वेताळ', अशी कल्पना आहे. तो वेताळ कधीच विक्रमाच्या हाती गवसत नाही, हे त्या कवितेचं सार. त्याचप्रमाणं विधिमंडळात व बाहेर राजा विक्रम कितीही जोशात असले तरी कर्जमाफीचा वेताळ काही कब्जात येण्याची चिन्हे नाहीत. 

शेतीतले "अप्पासाहेब बेलवलकर...!' 
वि. वा. शिरवाडकरांच्या "नटसम्राट'मधले अगतिक अप्पासाहेब बेलवलकर "कुणी घर देतं का घर?' असं विचारत फिरत राहतात. त्याच शैलीत सोशल मीडियावर शेतीतले अप्पासाहेब साद घालताहेत, 
कोणी हमी देतं का हमी? 
पेरलेलं बियाणे उगवेल याची हमी! 
निसर्ग कोपणार नाही याची हमी! 
पिकवला शेतमाल विकेल याची हमी! 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com