विचारांचे अभियांत्रिकीकरण हेच तत्त्वज्ञान

झोपडीपासून राजमहालापर्यंत घरासाठी प्रत्येकजण प्रचंड मेहनत घेतो. घरातील प्रत्येकाला त्याचा भौतिक आणि मानसिक अवकाश मिळेल अन् प्रत्येक वस्तूला जागा मिळेल यासाठी धडपड करतो.
socrates
socratessakal

तत्त्ववेत्ता सॉक्रेटीसला (इ. स. पूर्व ४७०-३९९) आदरांजली वाहण्यासाठी २००२ पासून दरवर्षी जगभर नोव्हेंबरचा तिसरा गुरूवार हा दिवस जागतिक तत्त्वज्ञान दिन (यावर्षी ता.१६) म्हणून साजरा होतो. या निमित्ताने विचारांचे अभियांत्रिकीकरण हेच तत्त्वज्ञान या दृष्टिकोनाविषयी.

झोपडीपासून राजमहालापर्यंत घरासाठी प्रत्येकजण प्रचंड मेहनत घेतो. घरातील प्रत्येकाला त्याचा भौतिक आणि मानसिक अवकाश मिळेल अन् प्रत्येक वस्तूला जागा मिळेल यासाठी धडपड करतो. घर बांधणे हेच जगण्यातील मुख्य उद्दिष्ट बनते. घराला शिस्तबद्ध, सुंदर, स्वच्छ, आरामदायी, मोकळे ठेवण्यासाठी ओला-सुका कचरा, अडगळीच्या वस्तू, दुर्गंधीदायक टाकाऊ वस्तू रोज फेकून दिल्या जातात.

वस्तूंची सातत्याने नव्याने रचनाही केली जाते. एवढेच नव्हे तर बाहेरून कचरा येईल म्हणून परिसरही स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न होतो. घर बांधण्यासाठी दगड, विटा, सिमेंट, लाकूड, लोखंड, यंत्रांची पूरकता, मानवी श्रम इत्यादी शेकडो प्रकारच्या बांधकाम साहित्याचा अभ्यास इंजिनिअर करतो. त्यांचा समग्र विचार करून शांत, सुरक्षित, मजबूत घराची रचना करतो.

या भौतिक घराप्रमाणे आपल्या प्रत्येकाचे स्वतंत्र एक मानसिक घर असते. या मनाच्या घरात प्रचंड सामान येऊन पडले, सर्वत्र कचरा झाला तर काय होईल? तर अराजक माजते. मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य बिघडते. अखेरीस अंतही होऊ शकतो.

मनात स्वैरपणे उद्‌भवणाऱ्या मानसिक घरात गर्दी करणाऱ्या शेकडो विचारांचा समग्र अभ्यास करून शांत, सुरक्षित जीवन आणि वैचारिक आरोग्यासाठी मनातील सगळा वैचारिक कचरा, दुर्गंधी फेकून देणे, शिल्लक विचारांची पुनर्रचना करणे, त्यांना मनात, मेंदूत योग्य जागा निर्माण करणे इत्यादी कामे करणे, अर्थात विचारांचे अभियांत्रिकीकरण करणे गरजेचे ठरते. हे काम करणारी व्यक्ती ती ‘वैचारिक अभियंता’. त्यालाच आधुनिक काळात तत्त्ववेत्ता म्हटले जाते. त्याच्या कामाचे शिक्षण तेच तत्त्वज्ञान.

म्हणजे विचारांचे अभियांत्रिकीकरण

‘तत्त्वज्ञान’ हा शब्द भीतीदायक वाटण्याचे आता काही कारण नाही. आपल्या आवाक्याबाहेरची ती गोष्ट आहे, हा गैरसमज दूर केला पाहिजे. गणित किंवा विज्ञान, वैद्यक विज्ञान, अभियांत्रिकी, जैव तंत्रज्ञान यासारखे विषय कठीण असतात, त्यांचा रोजच्या जगण्याशी संबंध येतोच असे नाही. तत्त्वज्ञान मात्र आयुष्य कसे असावे, काय मिळवावे, हे निश्चित करते.

जन्म-मृत्यू, पुनर्जन्म, कर्म, कर्मफल, स्वातंत्र्य, ज्ञान, विवेकशक्ती, मन, सत्य, चांगुलपणा, न्याय, राजकीय-सामाजिक अस्मिता, व्यक्तीचा आत्मपरिचय, लोकशाही, पक्षशाही, संघटनाशाही, जात-जमातवाद, आत्मा, ईश्वर अशा शेकडो संकल्पना आपल्या व्यक्तिमत्वात वस्तीला असतात. त्यांचा अभ्यास करून त्यांच्यातील गैरलागू विचारांना मनाबाहेर काढणे, योग्य विचारांची सुव्यस्थित रचना करणे, त्यांची तत्त्वज्ञानाच्या परिभाषेत नव्याने रचना करणे (मनाच्या संगणकात त्यांच्या फोल्डर्स, फायली तयार करणे) म्हणजेच विचारांचे अभियांत्रिकीकरण करणे.

विचारांचे अभियांत्रिकीकरण केल्यास असे लक्षात येईल की, आपण सातत्याने ज्ञान, सत्य, तार्किकता, नैतिकता आणि सौंदर्य या पाच संकल्पनांची चर्चा करतो. या तत्त्वज्ञानातील संकल्पना आहेत. उदाहरणार्थ राज्य म्हणजे काय? हा ‘ज्ञान’ संकल्पनेबद्दलचा प्रश्न आहे. आदर्श राज्य म्हणजे नेमके कोणते राज्य? हा नैतिकतेचा प्रश्न आहे. (रामराज्य की लोकराज्य) मग आदर्श राज्याचे रस्ते चांगले की खड्डेमय असावेत? वाहतुकीचे नियम का पाळावेत? हे अन्य नैतिक प्रश्न उपस्थित होतात.

तात्त्विक दृष्टिकोन गरजेचा

या पाच या मूलभूत तात्त्विक संकल्पना नीटपणे समजावून घेणे आणि त्यांचे अभियांत्रिकीकरण करणे यासाठी समाजात काहीएक निश्चित तात्त्विक दृष्टिकोन निर्माण होणे गरजेचे असते. ते केवळ सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेमार्फतच पूर्ण होऊ शकते. विख्यात जागतिक ब्रिटीश तत्त्ववेत्ते आल्फ्रेड नॉर्थ व्हाईटहेड (१८६१-१९४७) त्याच्या ‘ॲडव्हेंचर्स ऑफ आयडीयाज’मध्ये म्हणतो, ‘कोणत्याही भावनिक प्रक्षोभात चांगले काही होण्यापेक्षा नुकसानच अधिक होते.

त्यामुळे शिक्षण ही भावनिक गोष्ट बनवून उपयोगाचे नाही. सार्वजनिक शिक्षण नेहमीच भावनांवर नियंत्रण ठेवणारे, सत्य व तार्किक विचार पद्धती शिकवणारे, नीती आणि सौंदर्य यांची आराधना करणारे असले पाहिजे. सर्वसामान्य लोकांमध्ये तात्त्विक दृष्टिकोन निर्माण करण्याची मोठी जबाबदारी या सार्वजनिक शिक्षणव्यवस्थेवरच असते. विद्यार्थी दशेत त्यांचे तात्त्विकदृष्ट्या विचार करण्याचे शिक्षण पूर्ण होत असते. जोपर्यंत ती पार पाडली जात नाही, तोपर्यंत अस्सल लोकशाही समाज निर्माण होऊ शकत नाही.’

व्हाईटहेडच्या प्रतिपादनानुसार तत्त्वज्ञान एकाचवेळी दोन कार्ये करते. पहिले, ते मानवी प्रतिभेचे परिशीलन करते आणि या प्रतिभेची समीक्षा करते. याचा अर्थ असा की, तत्त्वज्ञान आजूबाजूची भौतिक वस्तुस्थिती अस्तित्वात असणारे वैचारिक सिद्धांत, त्यांचे व भौतिक परिस्थितीचे अधिक योग्य पर्याय आणि आदर्श यांना एकाच पारड्यात समान रितीने तोलते, मोजमाप करते.

दुसरे कार्य तत्त्वज्ञान सर्वांना उपयोगात आणता येईल, असे आशयघन व सामान्य स्वरूपाचे वैचारिक साधन बनते (या पाच संकल्पना हीच तात्त्विक विचारांची साधने बनतात). त्याचीच लोकशाहीसाठी नितांत आवश्यकता असते. अर्थात तात्त्विक प्रशिक्षण घेणे हे वैचारिक साहस आहे.

भूतकाळाकडे पाठ आणि भविष्यकाळाकडे दृष्टी, ही साहसाची मुख्य लक्षणे आहेत, असे व्हाईटहेड म्हणतो. सार्वजनिक शिक्षणव्यवस्थेतून तात्त्विक विचारांच्या अभियांत्रिकीकरणाचे शिक्षण मिळू शकते, म्हणूनच केंब्रिजचे तत्त्ववेत्ते सायमन ब्लॅकबर्न यांच्या मते, सामान्य लोकांसाठी तत्त्वज्ञान जाणीवपूर्वक उपलब्ध झाले पाहिजे. त्याचा अर्थ तत्त्वज्ञानाचे सुलभीकरण करणे, खोटे भावुक तत्त्वज्ञान निर्माण करणे असे नव्हे; तर तत्त्वज्ञान ज्या शैलीच्या आणि ज्या वैचारिक साधनांच्या साह्याने विचार करते, त्यांचा व तत्त्वज्ञानाच्या परिभाषेचा परिचय करून देणे, असा केला पाहिजे.

लोकांना तत्त्वज्ञानाच्या रितीने विचार करण्यास उत्तेजन देणे, हा त्याचा हेतू असेल. त्याचा फायदा असा होईल की, जगाचे स्पष्टीकरण कसे करावे, ही समस्या न बनता जगाचे जे काही स्पष्टीकरण देण्यात आले आहे, देण्यात येते ते समजावून घेण्याची क्षमता विकसित करणे हे आपले लक्ष्य राहील.

(लेखक तत्त्वज्ञानाचे निवृत्त प्राध्यापक आणि सल्लागार आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com