esakal | स्मरण बहुजनांच्या नायकाचे

बोलून बातमी शोधा

Keshavrao Jedhe
स्मरण बहुजनांच्या नायकाचे
sakal_logo
By
श्रीराम पवार, shriram.pawar@esakal.com

महाराष्ट्रातील आजच्या समाजकारण, राजकारणाची पायाभरणी करणाऱ्या अनेक घटना, निर्णयांचे केशवराव जेधे नायक होते. जिथे जिथे कोणत्याही प्रकारच्या वर्चस्ववादातून इतर समूह-समाजांना दडपण्याचा प्रयत्न होईल, तिथे त्यांचे विचार व कार्य वर्चस्ववादाविरोधातला ‘अँटिथिसिस’ म्हणून प्रेरणा देत राहील. जेधे यांच्या सव्वाशेव्या जयंतीनिमित्त...

केशवराव जेधे यांचं हे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्ष. महाराष्ट्राचं राजकारण, समाजकारणाला वळण देणाऱ्या मोजक्‍या नेत्यांमध्ये केशवराव जेधे यांचा समावेश करावा लागेल. सुमारे अर्धशतक ते राजकारण आणि समाजकारणात तळपत होते. पुण्यात सत्यशोधक समाजाची बांधणी करण्यात त्यांचा वाटा सिंहाचा. जेधे - जवळकर या जोडीनं प्रबोधनकार ठाकरे, श्रीपतराव शिंदे, खंडेराव बागल आदींसह महाराष्ट्राला एक पर्यायी विचारव्यूहही दिला, ज्याचे परिणाम पुढं प्रदीर्घ काळ राज्याच्या सामजिक जीवनावर होत राहिले. हा विचार महात्मा फुले, राजर्षी शाहूंच्या कार्यातून प्रेरणा घेणारा होता.

केवळ ब्राह्मणेतर गटाचं राजकारण एवढ्यापुरतं जेधे यांच्या कामगिरीकडं पाहणं त्यांच्यावर अन्याय करणारं ठरेल. जेधे यांना राज्यातील बहुजन समाजाच्या हिताचं पक्कं भान होतं. वैचारिकदृष्टया ते राजर्षी शाहू आणि फुलेंच्या तालमीत तयार झाले होते. विठ्ठल रामजी शिंदेंचा त्यांच्यावर प्रभाव होता. साहाजिकच सामजिक विषमेतच्या, वर्णवर्चस्वाच्या विरोधात एल्गार करणाऱ्या तत्कालिन धुरिणांत त्यांनी स्थान मिळवलं. शिवरायांच्या स्वराज्यात अजोड कामगिरी बजावणाऱ्या कान्होजी जेधे यांच्या घराण्याचे केशवराव वारसदार. ही पुण्याई बुहजनांचं नेतृत्व समर्थपणे करत त्यांनी पुढं नेली. ते कॉंग्रेसमध्ये होते तोवर पुण्यातील कॉंग्रेस ‘जेधे मॅन्शन’मधूनच चालत असे. त्यांनी सत्यशोधक समाजाचं काम केलं, तसंच ब्राह्मणेतर चळवळीत लक्षणीय योगदान दिलं. वर्णगंडातून होणाऱ्या मांडणीला शह देणाऱ्या प्रबोधनकार ठाकरे, खंडेराव आणि माधवराव बागल, दिनकरराव जवळकर, श्रीपतराव शिंदे या मंडळींच्या बरोबरीनं जेधे यानी बुहजनांच्या जागृतीचं काम केलं. स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर असताना महाराष्ट्रातील कॉंग्रेसचे जेधे हे निर्विवाद नेते होते.

आता कदाचित न पटणारे असेल; पण पुण्यात महात्मा फुले यांचा पुतळा उभारावा यासाठी महापालिकेत ठराव आला, तेव्हा फुलेंचं स्मारक उभं करायचं तर कोल्हापूरला करा; पुण्यात कशाला? असा सवाल विचारला जात असताना ठामपणे फुलेंच्या स्मारकाच्या बाजूनं उभे राहणारे, त्यासाठी सर्व ताकद लावणारे जेधेच होते. दिनकराव जवळकरांच्या `देशाचे दुष्मन’ या ज्वलज्जहाल पुस्तकाचे जेधे प्रकाशक होते. या पुस्तकाचा परिचय करुन देणाऱ्या टिपणात जेधे यांच्या फुले विचारांप्रती बांधिलकीचे प्रतिबिंब पडले आहे. या पुस्तकासाठी त्यांच्यावर खटला भरण्यात आला, त्यात त्यांना शिक्षाही झाली, तेव्हा त्याविरोधात डॉ. आंबेडकर यांनी जेधे- जवळकरांची बाजू मांडली होती. जेधे तेव्हा पुण्याच्या महापलिकेत नगरसेवक होते. तिथं बहुमत पुराणमतवाद्यांचं होतं. फुले यांच्या पुतळ्याचा ठराव जेधेंनी मांडला, तसाच पुण्यातील हौद सर्वांसाठी खुले करावेत, यासारख्या ठरावातून ते फेटाळले तरी सनातनी वृत्ती उघड करणारे अनेक प्रयोग त्यांनी तिथं केले. साधं नगरसेवकपदही सामाजिक चळवळीत कसं हत्यारासारखं वापरता येऊ शकतं, याचं दर्शन त्यांनी त्या काळात घडवलं.

सनातन्यांचा `करेक्ट कार्यक्रम’

जेधे - जवळकरांनी लोकप्रिय केलेली ब्राह्मणेतर चळवळ विषमतेवर आधारलेल्या एककल्ली व्यवस्थेवरचा लगुड प्रहार होता. राजकारण, अर्थकारण आणि ज्ञानसत्ता या तीनही प्रांतांत वर्णवर्चस्ववादाचं खूळ टोकाला गेल्यानंतरची ही तितकीच जहाल प्रतिक्रिया होती. मुळात महाराष्ट्रातील राजकारणात जहाल आणि नेमस्त हे पंथ होते ते आधी सामाजिक की आधी राजकीय सुधारणा यावरुन ताणलेले होते. यातील नेमस्तांची यथेच्छ टवाळी करत शक्तिप्रदर्शन करणाऱ्या जहालांचं लोकमान्य टिळकांच्या पश्‍चात प्रतिनिधित्व करणाऱ्यांना त्याच आयुधांचा वापर करुन शह देणाऱ्यांचे केशवराव नेते होते. ‘छत्रपती मेळ्या’सारख्या उपक्रमांतून त्यांनी जहाल सनातन्यांना त्यांचंच औषध दिलं. आजच्या भाषेत त्यांचा ‘करेक्‍ट कार्यक्रम’ करणाराच हा उपक्रम होता. यातून महाराष्ट्रात जातीय रंग असलेला संघर्ष उभा राहिला हे खरंच. मात्र केशवरांवाचा त्यातील सहभाग हा प्रामुख्यानं विषमतेच्या विरोधातला होता. म्हणूनच ते आणि त्यांची चळवळ मराठा वर्चस्ववादाच्या दिशेन गेली नाही. त्यांनी पर्वती मंदिरात प्रवेशाचा मार्ग स्वीकारला. महाडच्या सत्याग्रहाला पाठिंबा दिला. अस्पृश्‍यता निवारणाच्या कामात लक्ष घातलं. सामजिक गुलामगिरीविरोधात बंड करणाऱ्या बहुजन नेत्यांत केशवरावांचं नाव अग्रक्रमानं घ्यावं लागेल. केशवराव जेधे यांचं सर्वात महत्त्वाचं योगदान कोणतं असेल तर त्यांनी महाराष्ट्रातील बहुजन समाजाला राष्ट्रीय चळवळीत आणलं. पर्यायानं कॉंग्रेसमध्ये आणलं. तीसच्या दशकात त्यांनी ब्राह्मणेतर पक्ष कॉंग्रेसमध्ये आणला. गांधीजींचं नेतृत्व स्वीकारलं.

ही महाराष्ट्रातील राजकीय बदलाची नांदी होती. पुढं यशवंतराव चव्हाण यांनी बहुजन नेतृत्व राजकारणात प्रस्थापित केलं. त्याची पायाभरणी केशवरावांच्या या कृतीतून आणि त्यानंतर त्यांनी केलेल्या बांधणीतून झाली होती. त्यांना कॉंग्रेसशी जोडण्यात काकासाहेब गाडगीळांचा महत्त्वाचा वाटा होता. त्यांनतर जेधे-गाडगीळ जोडी राजकारणात गाजू लागली. केशवराव कॉंग्रेसचे निर्विवाद नेते बनले, तरी स्वातंत्र्याच्या आसपास कॉंग्रेसवर भांडवलदारांचंच वर्चस्व होतं. ते त्यांना खटकणारं होतं. जे पटत नाही, त्याविरोधात पक्षशिस्त वगैरेची भीड न बाळगता स्पष्ट भूमिका घेणं हे त्यांचं वैशिष्ट्य.सत्यशोधक समाज, ब्राह्मणेतर चळवळ, कॉंग्रेस, शे.का.पक्ष, पुन्हा कॉग्रेस आणि गोवा मुक्ती, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ अशा सर्व वळणांवर त्यांच्यातील हा गुण झळाळून उठल्याचं दिसेल. रयत शिक्षण संस्थेचं अनुदान बंद करण्याच्या खेर -मोरारजीभाईंच्या निर्णयाविरोधात आपलंच सरकार असूनही केशवरावांनी आवाज उठवला. सरकारला अखेर नमतं घ्यावं लागलं. त्यांचा जनमानसावरील प्रभाव, कुशल संघटनकौशल्यामुळेच ‘जेधे मॅन्शन’ हे चळवळीचं केंद्र झालं. तिथं शाहू महाराज, महात्मा गांधी, पंडित नेहरु, सुभाषचंद्र बोस यांच्यापासून अनेक नेत्यांनी हजेरी लावली. स्वातंत्र्याआधी गोलमेज परिषेदेला विरोध करणारा ठराव मांडला, म्हणून त्यांना तुरुंगवास झाला. ४२च्या चळवळीतही ते तुरुंगात गेले. देशभक्त जेधे अशी त्याची ओळख जनमानसात ठसली ती कायमची. त्यांनी गोवामुक्ती आंदोलनात सहभाग घेतला. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील पहिल्या सभेच्या अध्यक्षस्थानी तेच होते. ते कॉग्रेसमध्ये असले तरी त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या बाजूनं स्पष्ट भूमिका घेतली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळींशीही ते जोडले होते. घटना समितीत डॉ. आंबेडकर असलेच पाहिजेत, यासाठी आग्रह धरणाऱ्यांत जेधे होते. महाराष्ट्रातील आजच्या समाजकारण, राजकारणाची पायाभरणी करणाऱ्या अनेक घटना, निर्णयांचे केशवराव नायक होते. जिथे जिथे कोणत्याही प्रकारच्या वर्चस्ववादातून इतर समूह, समाजांना दडपण्याचा प्रयत्न होईल, तिथं केशवरावांचे विचार आणि कार्य वर्चस्ववादाविरोधातला ‘अँटिथिसिस’ म्हणून प्रेरणा देत राहील. या बहुजन नायकाचं स्मरण करायचं ते याचसाठी!