esakal | विशेष : भारतीय सिनेमाचं अस्सल माणिक!

बोलून बातमी शोधा

Satyajit Ray
विशेष : भारतीय सिनेमाचं अस्सल माणिक!
sakal_logo
By
श्रीराम पवार shriram.pawar@esakal.com

प्रख्यात दिग्दर्शक अकिरा कुरोसावा यांनी ‘सत्यजित रे यांचे चित्रपट न पाहणं म्हणजे चंद्र-सूर्याच्या दर्शनाशिवाय जगणं’ असं म्हटलं होतं. भवतालचं वास्तव संयतपणे तितकंच गांभीर्यानं हाताळणाऱ्या या प्रतिभाशाली कलावंताच्या (दोन मे) जन्मशताब्दीनिमित्त.

भारतीय सिनेमानं अनेक स्टार, सुपरस्टार, मेगास्टार जन्माला घातले. अनेक संवाद अजरामर केले. किचकवधामधील बाबूराव पेंटरांच्या ब्रिटिश सरकारलाही घोर लावणाऱ्या ट्रिक सीनपासून ते ‘बाहुबली’तील अमाप पैसा नि तंत्रज्ञानाच्या आविष्कारातून साकारलेल्या भव्यतेपर्यंत सारं दिलं. हमखास पैसा वसूल मसाला फिल्मपासून ते गहनगूढ सर्‌रिॲलिझमची पखरण असणारी मांडणी करणाऱ्या दिग्दर्शकांची एक प्रचंड रेंज रुपेरी पडद्यानं दिली. या साऱ्या नभांगणात जगभरातील सिनेअभ्यासकांना वेड लावणारं, आपल्या करिष्म्यानं अखंड तळपत राहिलेलं नाव म्हणजे सत्यजित रे. सिनेमाला जमिनीशी जोडणारी, मानवी भावभावना व जगण्याची नितांतसुंदर नक्षी रुपेरी पडद्यावर चितारणारा असा किमयागार दुसरा नाही. ज्याच्या बाजूनं आणि विरोधात प्रचंड लिहून-बोलून झालं आहे, अनेक बाजूंनी ज्याच्या कामाची समीक्षा झाली आहे, अशा या कलावंताचं काम, त्यानं दिलेला आशय एवढं सारं मांडूनही दशांगुळं उरणारं, म्हणूनच पिढ्या आणि तंत्रज्ञान बदललं तरी दखलपात्र. त्यांचे चित्रपट आवडो वा न आवडो, त्यांच्या चित्रपटांची दखल घेतल्याशिवाय भारतीय सिनेमाचा विचार पूर्ण होत नाही, हे त्यांचं मोठेपण.

हा माणूस निःसंशय असामान्य प्रतिभेचा धनी होता. संवेदनशील कलावंत होता. या कलासक्ततेच्या बुडाशी पक्कं वैचारिक भान होतं. सिनेमा कशासाठी, याची ठोस जाणीवही होती. सिनेमा हे संवाद,संज्ञापनाचं सशक्त माध्यम. संज्ञापनाचा मूळ हेतूच परिणाम घडवण्याचा असतो. रे परिणामकारक संवादासाठी सिनेमा खुबीनं वापरतात. आपल्याकडं सिनेमाचा विचार बव्हंशी मनोरंजनाच्या अंगानं होतो. त्यात काही गैर नाही. समाजाला रंजनाची गरज असतेच; मात्र रंजनाच्या अतिहव्यासापोटी वास्तवापासून पुरती तुटलेली कचकड्याची दुनिया समोर ठेवण्यानं या माध्यमाचा वापर भरकटू शकतो. जो कंटेंट मांडायचा आहे, तो कितपत पोचतो, यावर एखाद्या शॉटचं महत्त्व ठरतं. सौंदर्यशास्त्राच्या झापडबंद कल्पनांवर नाही, हे रे यांचे चित्रपट सिद्ध करत होते. म्हणून ते समकालीन वास्तवाच्या समीप होते.

त्यांनी देशातलं समकालीन सामाजिक वास्तव नितळपणे मांडलं. त्यांच्या चित्रपट निर्मितीच्या प्रेरणा गल्लाभरू सिनेमाच्या वाटचालीहून वेगळ्या होत्या. ‘मी सिनेमा का काढतो’ हे त्यांनी लिहून ठेवलंय. ते मुळातून वाचण्यासारखं त्याचं एक संचित. रे खरंतर एका जाहिरात कंपनीत काम करीत होते. एप्रिल १९५० मध्ये त्यांना कंपनीनं लंडनला पाठवलं. तेथील वास्तव्यात त्यांनी इटालियन नववास्तववादाचा खणखणीत आविष्कार असलेला ‘बायसिकल थीव्ह्‌ज’‌ पाहिला. डी सिकासारख्या जगप्रसिद्ध दिग्दर्शकाच्या अजरामर कलाकृतीनं रेंच्या कलासक्त मनावर परिणाम घडवला नसता तरच नवल. मात्र हा परिणाम त्यांना सिनेमाच्या दुनियेतच घेऊन येण्याइतका गहिरा ठरला. ‘बायसिकल थीव्ह्‌ज’ हा सिनेमाच्या मूलतत्त्वाचा शोध असल्याचं त्यांनी नोंदवून ठेवलं आहे. त्यापासून प्रेरणा घेऊन भारतीय निर्मात्यांनी जगणं आणि वास्तवाकडं वळावं, असा सल्ला त्यांनी दिला होता. स्वतःही त्यांनी तो पुढं अमलात आणला. लंडनमधून परतत असतानाच त्यांनी ‘पथेर पांचाली’चं मूळ टिपण तयारही केलं होतं.

बहुविध प्रतिभा

विभूतिभूषण बंडोपाध्याय यांची मूळ ‘पथेर पांचाली’ची कथा रे यांच्या डोक्‍यात घोळत होतीच. हा सिनेमा भारतीय सिनेसृष्टीतला मैलाचा दगड ठरणार होता. त्याची दखल घेतल्याशिवाय भारतीय सिनेमाच्या प्रवासाचा आढावाच अशक्‍य इतकं माहात्म्य या सिनेमानं मिळवलं. नंतर ‘अपराजितो’ आणि ‘अपूर संसार’सह अपू ट्रायलॉजी म्हणून गाजलेल्या मालिकेतील ‘पथेर पांचाली’ पहिला. या सिनेमानं एका दमदार दिग्दर्शकाचा जन्म झाला होता. साऱ्या जगानं त्याची दखल घेतली.

जगभरातील समीक्षकांनी कौतुक केलं. रे यांच्यावर टीकाही झाली. रे अस्सल भारतीय कथानक त्यांच्या संयत शैलीतून मांडत होते. मात्र हे भारतातील गरिबीचं महिमामंडन आहे, अशी टीकाही झाली. दारिद्र्यदर्शन आणि कमालीचा संथपणा हे आक्षेप त्यांच्या अनेक चित्रपटांवर घेतले गेले. भारतातील गरिबीची निर्यात केल्याचा झणझणीत आक्षेप आणि आधुनिक भारताचं दर्शन घडवणारे चित्रपट काढा, असा सल्लाही त्यांना दिला गेला. (बरंच म्हणायचं त्यांचे सिनेमे २०१४ नंतर आले नाहीत, नाहीतर आणखी कसले कसले आक्षेप घेतले असते.) दुसरीकडं गरिबीचं दर्शन तर रे घडवतात; पण त्यावर काही उपाय सांगत नाहीत आणि या पिचलेल्या वर्गाविषयी पुरेसे संवेदनशीलही नाहीत, असा आक्षेप पिचलेल्यांच्या चळवळी चालवणाऱ्या डाव्यांकडून घेतला गेला. रे यांना बुर्झ्वा ठरवलं गेलं.

६० च्या दशकात राजकीय विचारसरणीच्या निकषांवर रेंच्या मांडणीतील अपुरेपणावर चर्चा झडत राहिली. वास्तव कलात्मक रीतीनं मांडण्याचा ध्यास घेतलेल्या रे यांच्यावर यातील कशाचा फारसा परिणाम झाला नाही. ‘अपराजिता’वरील कठोर टीकेला दिलेलं उत्तर वगळता त्यांनी आपल्या सिनेमावरील टीकेला उत्तरं देण्याचा कधी प्रयत्न केला नाही. आपल्या देशातील काहीही नकारात्मक दिसणं म्हणजे देशाची बदनामी असला ठोकळेबाजपणा त्या काळातही होताच. याला अपवाद होते ते पंडित नेहरू. ‘हा देश गरीब आहे. मुद्दा आपण गरिबांविषयी संवेदनशील आहोत की नाही, हाच असला पाहिजे आणि रे यांच्या सिनेमात संवेदनशीलता दिसते’, असं सांगत नेहरूंनी त्यांची पाठराखण केली होती. आपल्याला हवं तेच करण्यावर रे ठाम होते. नेहरूंनी सांगितल्यावर त्यांनी रवींद्रनाथ टागोरांवर फिल्म बनवली. मात्र इंदिरा गांधींनी नेहरूंवर फिल्म बनवायची गळ घातली किंवा त्यांच्या कुटुंब कल्याणाच्या कार्यक्रमावर बनवायला सांगितली, तेव्हा ‘मला यात रस नाही’, असं थेटपणे सांगणारे रे कणा असलेले कलावंत होते. सत्ताधाऱ्यांच्या सोयीचं नॅरेटिव्ह मांडणाऱ्या सिनेमांची चळत लावणाऱ्या काळात हेही रेंचं खास वेगळेपण.

केवळ अपू त्रिबंध बनवला असता तरी रे महान दिग्दर्शकांत गणले गेले असते. सुमारे चार दशकं ते रसिकांना आशयघन मेजवानी देत राहिले. साधी सरळ कथा, त्यातल्या माणसांचं नैसर्गिक जगणं, तितक्‍याच सादगीनिशी रे मांडत. सिनेमा संथ वाटला तरी ते कुरोसावाच्या शब्दात सांगायचं तर मोठं नदीपात्र संथपणे वाहतं तसंच असतं. संथपणा हा ते ज्या लोकांची कथा सांगत होते, त्याच्या जगण्याचा भाग होता. स्टोरी टेलिंगचं आगळं तंत्र त्यांनी रूढ केलं, ज्याचा प्रभाव जगातील अनेक सिनेकृतींवर झालेला दिसेल.

अनेक पैलूंनी नटलेलं हे व्यक्तिमत्त्व. दिग्दर्शक म्हणून ते ख्यातनाम झाले, तरी ते बहुविध प्रतिभचे धनी होते. त्यांनी सिनेमाची अनेक अंगं ताकदीनं स्वतः हाताळली. कथा व संवादलेखन, संकलन, संगीत. वेशभूषा ते सिनेमाच्या जाहिराती बनवण्यापर्यंत सारं काही त्यांनी निगुतीनं केलं. त्यांच्या सुरवातीच्या चित्रपटांत रवी शंकर, विलायत खाँ, अली अकबर खाँ यांच्यासारख्या शास्त्रीय संगीतातील मान्यवरांनी संगीत दिलं, मात्र नंतर चित्रपटाला या शास्त्रीय बाजाशिवायही आणखी काही हवं असतं, म्हणून त्यांनी स्वतःच संगीत देणं सुरू केलं. चित्रपटाची बुहतांश अंगं समर्थपणे सांभाळणाऱ्या चार्ली चॅप्लीननंतर रे हेच समांतर सिनेमातील खणखणीत नाव. म्हणूनच कदाचित ऑक्‍सफर्डनं चार्ली आणि रे यांनाच सन्मानित केलं. रे सिद्धहस्त लेखक होते. केवळ सिनेमासाठीच नाही, तर उत्तम समीक्षापर लिखाणही त्यांनी केलं. डी सिका, अकिरा कुरोसावा, रॉबर्ट रुसोलिनी, रेनेटो कास्टलिनी अशांच्या सिनेमाची समीक्षा त्यांनी केली होती. डी सिकाचा सिनेमा म्हणजे सिनेमाच्या मूलभत तत्त्वांचा जल्लोषी पुनर्शोध आहे, असं सांगून त्यापासून भारतीय सिनेमानं प्रेरणा घेतली पाहिजे, असं ते सांगत होते. ‘अवर फिल्म अँड देअर फिल्म’ या पुस्तकातील त्यांची मांडणी सिनेमाचा गांभीर्यानं विचार करणाऱ्यांसाठी महत्त्वाची. चार्लीचा ‘गोल्डन रश’ आणि कुरोसावाच्या ‘राशोमान’वरचं त्यांचं लिखाण निरीक्षण आणि वेचकतेचे नमुने. त्यांनी इतरही बरंच लिहिलं. ‘संदेश’ हे त्यांच्या आजोबांचं मासिक त्यांनी ऊर्जितावस्थेत आणलं. बंगाली साहित्यातही मोलाची भर घातली. मुलांसाठीचा त्यांचा गुप्तहेर फेलूदा आणि सायन्स फिक्‍शन मधील प्रा. शोंकू गाजत राहिले. त्यांच्या गूढकथाही अशाच भन्नाट. ‘माय इयर्स विथ अपू’ या आठवणी त्यांनी लिहिल्या. ते चांगले सुलेखनकारही होते. अनेक पुस्तकांची मुखपृष्ठं रे यांनी सजवली. त्यांनी ‘रे रोमन’ नावाचा फॉन्ट विकसित केला. साहित्य अकादमीचा लोगो, ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’चं मूळ कव्हर ही रे यांची निर्मिती.

‘पथेर पांचाली’नं सुरू झालेला रे यांचा चित्रप्रवास प्रदीर्घ होता. जलसाघर, देवी, तीन कन्या, चारुलता, सीमाबद्ध, गोपी गायें बाघा बायें, प्रतिद्वंदी, कापुरुष, अरण्येर दिन रात्री, ते गणशत्रु आणि आगंतुक, शतरंज के खिलाडी असा हा प्रदीर्घ पट. प्रत्येक कलाकृती काही संपन्न पदरात टाकणारी. अशा या मोठ्या कलावंताला ‘माणिकदा’ नावानं ओळखलं जायचं. भारतीय सिनेमातल्या या अमूल्य माणिकाची छाप अमीट आहे. तंत्रज्ञान स्वार होत असल्याच्या काळात रे यांनी दिलेला इशारा लाखमोलाचा, ‘सिनेमाची प्रेरणा जगण्यातून आणि त्याच्या मुळातूनच यायला हवी. कथेतली कृत्रिमता आणि हाताळणीतला अप्रामाणिकपणा तंत्राचं पॉलिश कितीही केलं तरी झाकता येत नाही,’ असं त्यांचं सांगणं. म्हणूनच रे आणि त्यांचे चित्रपट कायम लक्षात राहतात. ते अस्सल भारतीय जगणं आणि त्यातून समोर येणाऱ्या चौकटबद्ध प्रतिमांपलीकडच्या सूत्रांसाठी.

shriram.pawar@esakal.com