esakal | भाष्य : शिक्षकी सर्जनशीलतेला हाक | School
sakal

बोलून बातमी शोधा

School Start
भाष्य : शिक्षकी सर्जनशीलतेला हाक

भाष्य : शिक्षकी सर्जनशीलतेला हाक

sakal_logo
By
डॉ. श्रुती पानसे

प्रत्येक संकट काही नवीन शिकवून जाते. कोविडचे संकटही त्याला अपवाद नाही. या महासाथीमुळे बंद ठेवाव्या लागलेल्या शाळा सुरू होत असताना शिकविण्यात नावीन्यपूर्ण बदल करावे लागतील. शिकविण्यातील सर्जनशीलतेला साद घालणारा प्राप्तकाळ आहे. म्हणूनच त्यासंदर्भात काही विचार.

मागचा दीड वर्षांचा कोविड काळ हा प्रत्येकासाठीच आव्हानात्मक होता. आता सर्व गोष्टी सुरू झाल्या आहेत. पूर्वीप्रमाणे सर्व व्यवहार सुरळीत होतील, अशी आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनात आशा आहे, अपेक्षा आहेत. पण या दोन वर्षांच्या काळात, बहुतांश मुलांच्या मानसिक स्थितीवर जो काही परिणाम झालेला आहे तो हिमनगाच्या टोकासारखा आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. या हिमनगाचं टोक म्हणजे मुलांच्या वागण्याचे दृश्य परिणाम. असे अनेक परिणाम सध्या दिसताहेत.

पहिला परिणाम : मुलं अभ्यास करत नाहीत, अभ्यासासाठी टाळाटाळ करतात. खूप कारणे देतात. कशाला अभ्यास करायचा? त्याने काय होणार आहे? परीक्षा कोठे घेतल्या जाणार आहेत आणि घेतल्या तरी आपण पास होणार आहोत, अशी बहुसंख्य मुलांची मानसिकता झालेली आहे. दुसरा परिणाम: गेल्या सहा महिन्यांच्या काळात मुलांच्या झोपण्या-उठण्याच्या सवयीत बदल झाला आहे. रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठायचं असतं. आवरून शाळेत जायचं असतं ही सवय तुटली आहे. ऑनलाईन लेक्चरही अंथरुणातून न उठताच करतात. मुलांना खूप सुस्ती आलेली आहे. याचा परिणाम त्यांच्या शारीरिक चलनवलनावर – आणि शारीरिक चलनवलनाचा परिणाम उर्जेवर झाला आहे. आपल्या शरीराचं घड्याळ स्थिरावलेलं असतं, पण आता ते पार बिघडलं आहे. तिसरा परिणाम: शिक्षणासाठी हातात आलेला मोबाईल मुलं आता सोडत नाहीत. कित्येक घरांमध्ये हेच चित्र आहे. ज्या मुलांचे विविध छंद होते त्यातही आता मन रमत नाही. अशी अनेकांची स्थिती आहे. चौथा परिणाम : मुलांची वाढलेली चिडचिड. विनाकारण चिडचिड वाढते त्यामागे अस्वस्थता हे कारण असतं. एकमेकांवर राग व्यक्त झाल्यामुळे घरातल्या सर्वांचं मानसिक स्वास्थ्य हरवल्यासारखी परिस्थिती झाली आहे.

याशिवायही अनेक लहानमोठे परिणाम वयानुसार झाले आहेत.विशेष गरजा असलेल्या (स्पेशल चाईल्ड) मुलांच्या बाबतीतही वेगळा विचार करण्याची आवश्यकता आहे. हिमनगाच हे टोक आहे हे लक्षात घेतलं तर अंतर्मनातील खळबळ समजून घ्यावी लागेल. समाज म्हणून प्रत्येकाला हे भान असणं आवश्यक आहे. ज्यांच्या घरात लहान मुलं आहेत, असे पालक आणि ज्यांना आता मुलांना शिकवायचं आहे, असे शिक्षक या दोघांनाही पुढील काळात खूप काम करावे लागणार आहे.

नव्या शैक्षणिक धोरणानुसार (२०१९) शिक्षण क्षेत्रात अनेक बदल होणार आहेत. पण त्यापूर्वीच काही महत्त्वाचे बदल करावे लागणार आहेत. त्यातली मुख्य बाब म्हणजे विद्यार्थ्यांची मानसिकता लक्षात घेऊन अध्यापनात अनुरूप बदल करणे. एका पत्रकात ‘युनिसेफ’ म्हणतं, की लेखन, वाचन आणि अंक शिकवण्याव्यतिरिक्त शिक्षकांची मोठी जबाबदारी आहे. ते योग्यच आहे. महासाथीनंतरच्या या जगात पुन्हा एकदा पाय रोवून उभं राहण्यासाठी मित्र, समुपदेशक अशा अनेक भूमिका शिक्षकांना कराव्या लागणार आहेत. शिक्षकांनी मुलांना दीड वर्षातले अनुभव विचारून त्यावर गप्पा माराव्यात. त्यातून मुलांचं मन मोकळं होईल. प्रत्येकाला बोलायला प्रवृत्त करावं. त्याचप्रमाणे पालकांशी बोलून त्यांच्याही प्रतिक्रिया समजावून घ्याव्यात.

गृहपाठातील नावीन्य

एरवी ज्या पद्धतीने गृहपाठ दिला जातो, ती पद्धत मुलांसाठी त्रासदायक ठरू शकते. त्याऐवजी मुलांमधलं कुतूहल वाढेल असे गृहपाठ द्यावेत. एखादी आसपासची समस्या, एखादा प्रश्न या विषयी मुलांची चर्चा करून ती समस्या सोडवण्यासाठी कल्पनांचा शोध घेण्याचं काम मुलांकडे सोपवावं. यामुळे मुलांची विचार करण्याची गती वाढेल. शिक्षकांना मुलांची ही मानसिकता समजून घेऊन त्यांच्याकडून अभ्यास करवून घ्यावा लागेल. मोबाईलच्या व्यसनाचे ‘विथड्रॉवल सिम्प्टम्स’ लक्षात घ्यावे लागणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे मुलं इयत्तेने दोन वर्ष पुढे गेल्यासारखी दिसली, तरीसुद्धा मुलांना आत्ता नक्की काय आठवत आहे, काय येत आहे, कुठे जास्त प्रयत्न करावे लागणार आहेत, याची एक पायाभूत चाचणी घ्यावी. या चाचणीबद्दल आधी मुलांना काही सांगू नये आणि त्याचा निकालदेखील मुलांना सांगू नये. मुलांच्या मनावर नकारात्मक परिणाम होईल, असं करू नये. केवळ मूल कोणत्या पायरीवर आहे हे समजून घ्यावे. अभ्यासक्रमाचे तीन भागात वर्गीकरण करायला हवं. १) वर्गातच मुलांना समजावून सांगावे लागतील असे आकलनासाठी अवघड विषय २.). मुलांना स्वयं अध्ययनातून समजावून घेता येतील असे तुलनेने सोपे विषय ३. एखाद्या विषयाच्या गाभ्याशी थेट संबंधित नसतील असे विषय – जे पुढच्या वर्षी शिकवले तरी चालतील. अशा पद्धतीने वर्गीकरण करून शाळा आणि शिक्षकांनी आपला शिकवण्याचा भाग ठरवावा.पण आधी मुलांच्या शरीराला आणि बुद्धीला चालना देण्याची सर्वप्रथम गरज आहे. अनेकदा शारीरिक चलनवलनावर बौद्धिक चलनवलन अवलंबून असतं. त्यामुळे दोन वर्ष घरात जखडून बसलेल्या मुलांचे हात-पाय आणि अंतर्गत स्नायू मोकळे होणं महत्त्वाचं आहे. त्यादृष्टीने वेगाने पळायला लावणं, उड्या मारणं, मोकळ्या हवेमध्ये प्राणायाम करून घेणं, या गोष्टी करून मुलांच्या मेंदूला अक्सिजन मिळेल. त्यांच्या शरीरात रक्‍ताभिसरण वाढेल. घाम गाळल्यामुळे भूक लागेल आणि जे समोर येईल ते खावसं वाटेल. हे मुलांच्या आरोग्यासाठी फार आवश्यक आहे. मुलांचा वयोगट कोणताही असो, मानसिक स्थिरता येण्यासाठी आणि अभ्यासातला रस वाढवण्यासाठी सुरुवातीच्या पंधरा दिवसात प्रत्यक्ष अभ्यास न घेता अभ्यासपूरक उपक्रम घ्यायला हवेत. हे उपक्रम पाठ्य पुस्तकात असतात. ते अभ्यासाशी जोडलेले असतात. फक्त त्याचं स्वरूप मुलांच्या मेंदूला चालना देणारं असतं.

  • कोडी, कूट प्रश्न, पझल सोडवायला देणं

  • ओरिगामीच्या माध्यमातून भूमितीकडे वळवणं

  • गणित - विज्ञानासारखे विषय प्रयोग, प्रकल्प किंवा उपक्रमांमधून करवून घेणे,

  • लहान मुलांसाठी शैक्षणिक साधनं वापरून आधी त्यांना खेळायला सांगणं. खेळातून विचार करायला लावणे हे करावं लागेल. गणित, भाषा, विज्ञान, परिसर या विषयावरची शैक्षणिक साधनं त्यांच्या मेंदूला ऊर्जादायी बनवतील.

  • कोणत्याही विषयाची क्विझ घेऊन अभ्यासातली रंगत वाढवता येईल.

  • भाषिक – गणिती- विज्ञान अशा विषयातले खेळ सढळ हातांनी वापरावे लागतील. शाळेत आल्या आल्या अभ्यास सुरू करणं, स्पर्धात्मक परीक्षा घेणं, जर त्यांना कमी गुण मिळाले तर त्यांच्या एकूण मानसिकतेवर दुष्परिणाम होणार, हे आपल्याला टाळायचं आहे.

थोडक्यात, पहिले काही महिने विद्यार्थ्यांना साखरेच्या आवरणातील गोळी द्यायची आहे.

(लेखिका शिक्षण क्षेत्राच्या अभ्यासक आहेत.)

loading image
go to top