भाष्य : माहिती साक्षरता, मूलभूत गरज!

बदलत्या परिस्थितीत मूलभूत गरजांइतकीच प्रत्येकाला माहिती अचूक मिळणे महत्त्वाचे आहे. विविध स्त्रोतातून येणाऱ्या माहितीची शहानिशा, ती वास्तवदर्शी असणे तितकेच महत्त्वाचे आहे.
Literacy
Literacysakal

- शुभदा नगरकर

बदलत्या परिस्थितीत मूलभूत गरजांइतकीच प्रत्येकाला माहिती अचूक मिळणे महत्त्वाचे आहे. विविध स्त्रोतातून येणाऱ्या माहितीची शहानिशा, ती वास्तवदर्शी असणे तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळेच समाजात माहिती साक्षरतेचा प्रसार अगत्याचा आहे.

आपल्या कोणत्याही निर्णयात माहितीची भूमिका महत्त्वाची असते. वरवर पाहता यातील खरा अर्थ कदाचित लक्षात येणार नाही. परंतु खोलवर तपासले असता लक्षात येईल की, माहितीची गरज आपल्याला पावलोपावली लागते. जसे उद्या पाणी येणार की नाही? आपल्याला ज्या बसने जायचे आहे ती वेळेत येणार की नाही? डॉक्टरांनी दिलेल्या औषधाचे दुष्परिणाम काय असतील? पैशांची गुंतवणूक कोठे करावी? इ. ही माहिती आपण कशी मिळवतो?

आपल्या समोर माध्यमे तर खूप आहेत, जसे सर्वांच्या जिव्हाळ्याचे व्हाट्सॲप, वर्तमानपत्रे, दूरचित्रवाणी वाहिन्या, नाहीतर मित्रमैत्रिणीं, नातेवाईक इ. या स्रोतातून आलेल्या माहितीचे आपण मूल्यमापन करतो का? ती किती खरी किती खोटी हे तपासतो का? माहिती चुकीच्या पद्धतीने वापरली तर मात्र त्याचे परिणाम भोगल्यानंतरच लक्षात येतात. म्हणजेच साक्षर असलेले अनेक जण माहितीसाक्षर असतीलच असे नाही. या लेखात माहितीचे आपल्या आयुष्यातील महत्त्व आणि माहिती साक्षरता याबाबत चर्चा केलेली आहे.

विचार केला असता असे लक्षात येते की, माहिती आपल्या आयुष्यात कळीचा मुद्दा आहे. संशोधकांना संशोधनासाठी, डॉक्टरांना उपचारासाठी, निर्वासितांना त्या प्रदेशाची, भाषेची व संस्कृतीची, आजारी व्यक्तीला आजार आणि त्याच्या नातेवाईकांना उपचारांची माहिती लागते. अशी माहिती योग्य वेळी, योग्य स्वरूपात मिळाली नाही तर आपल्याला असुरक्षित वाटते. कोरोनाच्या काळात आणि नंतरचे बरेच दिवस आपण सतत दडपणाखाली होतो. रोज नवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचत होती. माहितीची विश्वासार्हता न तपासता बरेच लोक खोट्या बातम्यांकडे आकर्षिले जात होते.

अनेक अफवा, अंधश्रद्धा पसरत होत्या. भीतीपोटी अनेक लोक स्वगृही परतण्यासाठी बरेच अंतर चालत गेले. अनेक स्रोतांतून मिळणाऱ्या माहितीमुळे ते विचलीत झालेले होते. माहितीच्या अनिश्चिततेमुळे मानवी जीवन असुरक्षित होते हे या महासाथीच्या काळात आपल्याला खूप उशीरा समजले. अनेकांची आयुष्ये धोक्यात आली आणि काहींना प्रसंगी जीवही गमवावा लागला. ‘युनेस्को’ने हा काळ ‘इन्फोडेमिक’ म्हणजेच ‘माहितीचा उद्रेक काळ’ असा घोषित केला आणि जनतेस खोट्या माहितीपासून सतर्क राहण्याचा इशारा दिला.

उपेक्षित आणि निरक्षर समुदाय यांना बरेचवेळा योग्य माहिती मिळत नाही. त्यामुळे ते भरकटले जातात. तसेच असलेली माहिती कशी वापरायची याचे ज्ञान नसते. यामुळे असे लोक असुरक्षित राहतात. मिलीसा वॉल्स, कॅलिफोर्निया स्टेट विद्यापीठातील पत्रकारितेतील प्राध्यापक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जॉर्डनमधील सीरियातील निर्वासित लोकांच्या शिबिरात जाऊन तेथील लोकांच्या मुलाखती घेतल्या. त्यांनी मोबाईल फोनचा या लोकांना किती उपयोग होतो, याचा अभ्यास केला. त्यांना दिसून आले की, हे लोक मोबाईल फोनशिवाय राहू शकत नाहीत. त्यांच्या मते अन्न आणि पाण्याइतका तो महत्त्वाचा आहे.

सीरियात मागे राहिलेल्या नातेवाईकांच्या आरोग्यापासून ते पिकांची स्थिती, गावांची आणि शहरांची परिस्थिती, अलीकडे झालेले गोळीबार याविषयीची माहिती ते दररोज त्यांच्या फोनवरून मिळवत असत. परंतू असेही लक्षात आले की, खूप अफवा व चुकीची माहिती त्यांना सोशल मीडियावरून मिळत असे. कधी त्यांचे नातेवाईक मारले गेले आहेत तर कधी जिवंत आहेत, असेही समजायचे. बरेचवेळा त्यांना टीव्ही आणि इंटरनेटवरून चुकीची माहिती मिळायची आणि हे लोक माहितीच्या अनिश्चिततेचे बळी ठरत.

या व्यतिरिक्त, जगभरातून असे दिसून येते की, दूरस्थ ठिकाणी, खेड्यापाड्यात असलेले शेतकरी आणि इतर समुदाय यांच्यापर्यंत माहिती बरेचवेळा पोहोचतच नाही आणि पोहोचली तरी ती त्यांना समजेल, अशा भाषेत असेलच असे नाही. म्हणजेच खऱ्या, विश्वासार्ह माहितीचे आपल्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे. अन्न, वस्त्र, निवारा आणि आता अचूक माहितीशिवाय मानवी जीवन कठीण आहे.

तंत्रज्ञानातल्या क्रांतीमुळे माहिती तयार करण्याची आणि दळणवळणाची साधने मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाली आहेत. खेड्यापाड्यात, दुर्गम ठिकाणी तंत्रज्ञान पोहोचले आहे. माहितीचे प्रसारण विविध माध्यमातून चटकन होते. रोज अनेक माध्यमातून मोठ्या प्रमाणात माहिती आपल्यापर्यंत पोहोचत असते. परंतु आपल्याला हवी असलेली अचूक माहिती शोधण्यासाठी माहिती साक्षरता प्रत्येकाकडे हवी, ज्यामुळे आयुष्य सुरक्षित करता येईल.

माहिती साक्षरता म्हणजे नक्की काय? ‘युनेस्को’ने माहिती साक्षरतेबाबत मार्गदर्शन केले आहे. माहिती साक्षरता मानवाला त्याचे वैयक्तिक, सामाजिक, व्यावसायिक आणि शैक्षणिक ध्येय साध्य करण्यासाठी लागणारी माहिती शोधण्यासाठी आणि तिचे मूल्यमापन करून ती वापरण्यासाठी सक्षम करते. अमेरिकन लायब्ररी असोसिएशनने माहिती साक्षरता सोप्या भाषेत सांगितली आहे. आपल्याला माहितीची आवश्यकता किंवा गरज आहे हे ओळखणे आणि आवश्यक माहिती शोधण्याची, मूल्यमापन करण्याची आणि प्रभावीपणे वापरण्याची क्षमता आपल्यात असणे.

असे व्हा माहिती साक्षर

माहिती साक्षर होण्यासाठी काय करावे? अनवधानाने पुरेसे ज्ञान नसल्याने चुकीची माहिती घेतली जाते. प्रथम आपल्याला माहितीची गरज आहे, हे समजून घेणे. तसेच आपण माहितीचे कोणते स्रोत वापरतो हेही तितकेच महत्त्वाचे. कारण आपल्याकडे माहिती दररोज प्रचंड प्रमाणात पोहोचत असते. आपण कोणत्या व्यक्तीने माहिती पाठवली आहे, याकडे लक्ष देणे महत्त्वाचे. ती व्यक्ती त्या विषयातील तज्ज्ञ आहे का?

ज्या माध्यमाचा वापर करायचा त्याचा अभ्यास करावा. सोशल मीडियावरून घेतलेली माहिती किती खरी, विश्वासार्ह तपासून मगच तिचा वापर महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी करावा. जी माहिती हवी असेल त्यासाठी दोन किंवा तीन माहितीचे स्त्रोत अभ्यासावेत. सर्व स्त्रोतातील माहिती एकसारखी आहे का ते तपासावे. त्यानंतरच माहितीचा वापर करावा.

थोडक्यात सांगायचे तर, माहिती साक्षर व्यक्ती योग्य माहिती शोधून तिचे मूल्यमापन करून माहितीचा वापर बिनचूक निर्णय घेणे, समस्या सोडवणे आणि नवीन ज्ञान संपादन करण्यासाठी सहज करू शकते. माहिती साक्षर होण्यासाठी माहितीस्रोतांचा अभ्यास तर हवाच परंतू विविध माध्यमे, साधने यांचाही अभ्यास हवा. जसे मोबाईल फोनची संपूर्ण माहिती हवी. इंटरनेटवरील माहितीस्रोत गुगलवरून कसे शोधायचे हे माहित पाहिजे.

माहितीची विश्वासार्हता तपासण्यासाठी माहितीचा जनक, त्याची शैक्षणिक पात्रता, पक्षपाती धोरण, माहितीचा स्रोत यांची माहिती पाहिजे. उदा. आरोग्यविषयक माहिती व्हाट्सॲपवरून आली असेल आणि जर एखाद्या डॉक्टरच्या नावाने पाठवली असेल तर असा डॉक्टर अस्तित्वात आहे का, हे तपासावे. जर अशा माहितीत विश्वासार्हता नसेल तर ती इतर कोणत्याही व्यक्तीला देऊ नये. कारण अशा माहितीचा जर वापर करण्यात आला तर आपण आपले आणि दुसऱ्या व्यक्तीचे आयुष्य धोक्यात घालू शकतो.

निरक्षर समुदायाची माहिती साक्षरता हासुद्धा एक अभ्यासाचा विषय. यांच्यासाठी दृकश्राव्य माध्यमांचा वापर अनिवार्य आहे. परंतु येथेही माहितीची विश्वासार्हता महत्त्वाची. शासकीय संकेतस्थळे, स्वयंसेवी संस्था दृकश्राव्य स्वरुपात माहिती पुरवतात. अशा स्रोतांची ओळख या लोकांना करून द्यावी नाहीतर असे लोक माहितीशिवाय असुरक्षित राहतील. माहिती साक्षरतेबरोबरच डिजिटल साक्षरता, आरोग्य साक्षरता, वित्त साक्षरता, माध्यम साक्षरता, सांस्कृतिक साक्षरता आणि भावनिक साक्षरतासुद्धा आपल्याला माहिती पाहिजेत. थोडक्यात सांगायचे तर, माहिती हे दुधारी शस्त्र आहे. चुकीची माहिती वापरली आणि विश्वासार्ह माहितीचा दुरुपयोग केला तर मात्र मानवी जीवन धोक्यात येऊ शकते. माहिती साक्षर होण्यासाठी खात्रीशीर उपाय म्हणजे ग्रंथपाल व ग्रंथालय.

(लेखिका सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ग्रंथालयशास्त्र विभाग आणि सेंटर फोर पब्लिकेशन एथिक्स येथे कार्यरत आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com