
तुटपुंजे ज्ञान, संवादाची पोकळी, झाकापाकीचा व्यवहार आणि शास्त्रशुद्ध ज्ञानाचा अभाव... अशा अनेक कारणांमुळे स्त्री-पुरुष नात्यांत समस्या निर्माण होतात. तसे होऊ नये, यासाठी सर्वांगीण प्रयत्नांची गरज आहे.
तुटपुंजे ज्ञान, संवादाची पोकळी, झाकापाकीचा व्यवहार आणि शास्त्रशुद्ध ज्ञानाचा अभाव... अशा अनेक कारणांमुळे स्त्री-पुरुष नात्यांत समस्या निर्माण होतात. तसे होऊ नये, यासाठी सर्वांगीण प्रयत्नांची गरज आहे. त्यामुळे याबाबत संथपणे पण परिणामकारक पायाभूत कार्य करण्याची गरज आहे. नव्या मूल्यांचा स्वीकारही महत्त्वाचा.
महिला अत्याचाराच्या प्रश्नाची मांडणी करणारा मिलिंद चव्हाण यांचा लेख ‘सकाळ’मध्ये (२० जाने.) वाचला. तो वाचून प्रश्न भयंकर आहे, पीडितांना मदत करणारे गट मजबूत असायला हवेत हे कोणालाही पटेल. त्यांची ताकद प्रश्नांच्या तुलनेत कमी आहे हेही सर्वश्रुतच आहे. या निमित्ताने या प्रश्नासंबंधीचे काही मूलभूत मुद्दे विचारांसाठी येथे मांडत आहे. अगदी डॉ. र. धों. कर्व्यांच्या काळापासून निकोप लैंगिक जीवन आणि समाजस्वास्थ्य याकडे लक्ष देण्याची गरज मांडून त्यासाठी प्रयत्न चालू असले तरी प्रश्नाची गाठ भक्कम आहे. त्याविषयी वारंवार विचार आणि बदलत्या वास्तवानुसार पुनर्विचार चालू ठेवण्याची आवश्यकता आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
माणसाची स्वत:विषयीची जाणीव परिपक्व होण्यासाठी विकासाची प्रक्रिया दीर्घकाळ चालते. लैंगिक परिपक्वता येत असतांना अनिश्चितीचा आणि अडखळण्याचा काळ अनुभवाला येतो. यातून वाट काढतांना जो/तो आणि जी/ती परंपरेची शिकवण आणि स्वत:चा अनुभव यातून मार्ग काढतात. (हा काळ LGBT गटाला अत्यंत कठीण जातो, हे लक्षात घ्यावे.) परंतु या प्रयत्नात मन:स्वास्थ्य सांभाळले जातेच असे नाही. दोनतीन पिढ्या मागे गेले तर मुलीने काही प्रश्न विचारल्यास ‘तुला नवरा सांगेल’ इतकेच तिच्या पदरी पडायचे. मुकाट्याने दिवस -आणि लग्न झाल्यानंतर अनेकदा रात्रीही- काढायच्या आणि जमवून घेत राहायचे इतकेच तुटपुंजे ‘ज्ञान’ आणि सांभाळून घेण्याचा ‘संस्कार’ एवढ्या शिदोरीवर मुली प्रौढ होत! कधी सुखात, तर कधी घुसमटत. एकूण लैंगिक विषयावर सभ्यपणे बोलण्याची भाषाच उपलब्ध नसे! आज शाळा विज्ञानाचा विषय म्हणून हा भाग उरकतात, असे अनेक ठिकाणी दिसते.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
काही वर्षापूर्वी ‘शरीरशास्त्रातील पुनरुत्पादनाचा भाग घरी करा,’ असे सांगितले जाई. वैज्ञानिक दृष्टिकोनातून लिहिलेली पुस्तके मिळवून वाचणे हा व्यवहारही झाकापाकीचा असे. आज मुले प्रत्यक्ष अनुभव घेऊ पाहतात, सर्रास गर्भनिरोधकांचा वापर करतात असे आपण ऐकतो. पण समाज या बाबतीत वेगवेगळ्या वर्तुळात विभागलेला दिसेल. पुरेशी माहिती नसणे, चुकीची माहिती आणि अनेक गैरसमजुती असणे हा तर दर पिढीतला भाग आहे. स्वत:च्या शारीरिक उर्मी कशा व्यक्त करायच्या किंवा त्यावर नियंत्रण ठेवून कसे नाते राखायचे हे पुष्कळशा गोंधळात आणि अनावर वर्तनात पसरलेले दिसते. लैंगिकता ही गरज भुकेसारखी नाही. तिच्यात नात्याचा जीव आहे. त्यामुळे नाते बनले की विस्कटले हेही प्रत्येकाच्या समाधानाचा भाग असते.
अंतर्विरोधातून मानसिक ताण
एकीकडे, ‘लग्न झाल्याशिवाय काही नाही’ असा दंडक तर दुसरीकडे अज्ञान यात हिंदकळत कुमारवयापासून तारुण्याकडे मुले जातात. अनेकदा काही गंड तसेच राखून आयुष्य काढतात. मानसिक आरोग्याचे वाढते प्रश्न हा त्याचा परिपाक. यंदा कोरोनाच्या काळात घरगुती हिंसाचार तीव्रपणे समोर आला. एरवी त्रास टाळण्यासाठी दूर राहण्याचे, संपर्क टाळण्याचे मार्ग बंद झाल्याचा हा परिणाम म्हणता येईल. पण या वास्तवाच्या निर्मितीलाच आवर घालायचा असेल तर लैंगिक शिक्षण आणि जोडीदार स्त्रीपुरुष नात्याची जडणघडण याविषयीचा व्यक्तिगत विचार यांची जोपासना गरजेची आहे. हे काम दीर्घकालीन आणि विधायक स्वरूपाचे आहे, तसेच ते सभ्यतेच्या वाटेवर नेणारे आहे. मुलामुलींचे वेगवेगळ्या उपक्रमांसाठी एकत्र येणारे गट आणि त्यांच्यामार्फत नात्यातील खुलेपणाचा अनुभव ही मोठी गरज आहे.
माध्यमातील प्रतिमा आणि त्यांचे उद्दीपक वळण बाजाराच्या तर्कशास्त्राने चालते. सौंदर्य प्रसाधने आणि कपडे, दागिने यांचे बाजार आज प्रचंड उलाढालीचे असल्याचे दिसते. त्यांच्या जाहिराती फक्त मालच नव्हे तर जीवनशैलीही विकतात. त्याविषयी विचारपूर्वक निर्णय घेण्याचा अवसर दिवसेंदिवस आक्रसत आहे. एकीकडे दमन सांगणारी पारंपारिक नैतिकता आणि दुसरीकडे ही बाजाराची खेच हा अंतर्विरोध मानसिक ताण निर्माण करतो. अनिश्चिती, चिंता, नाकारले जाण्याची भीती, नाकारल्यामुळे खिन्नता अशा कितीतरी भावनांच्या गराड्यात हा काळ रेटला जातो. कधी बेफिकिरी तर कधी विन्मुखता असे त्रास या वयात मुलेमुली सहन करतात. घरात तणाव, मित्रांच्या-समवयस्कांच्या गटात नकाराची भीती, समाजात अपेक्षांचे ओझे अशा कितीतरी प्रकारे मन:स्वास्थ्य बिघडते, नाती विकसनशील राहत नाहीत.
नात्याचे स्वरूप LGBTगटातील असो की समाजमान्य गटातील, व्यक्तींमधल्या नात्याचा प्रवास प्राथमिक आकर्षण ते दीर्घकालीन सामंजस्य असा पल्ला गाठू शकते. त्यासाठी संमती, संवाद आणि समन्वय अशा गुणांची जोपासना नाते निर्माण होण्यापासून गरजेची असते. नाते हा काही भोज्जा गाठण्याचा खेळ नाही. लग्नाबाबतही अनेकदा तसेच होते. लग्नाचे नाते कसे याविषयी प्रचलित पठडी मानायची की आपली आपण ठरवायची? अनेक वैवाहिक नाती यांच्या दरम्यानची अनेक उत्तरे मिळवण्याच्या प्रयत्नात व्यस्त असलेली दिसतील. नाते निर्माण करावेसे वाटणे, त्याला प्रतिसाद आणि ते फुलत जाणे यासाठी आपण जागरूक राहून कसे प्रयत्न करतो, हा दीर्घकालीन प्रक्रियेचा मार्ग आहे. त्यात चुका होतील, क्षमा मागावी-करावी लागेल, नवीन कल्पना लढवता येतील. पण हे सारे मूळ मानसिक स्थिरता असल्यासच शक्य होते. यासाठी समूहात आणि व्यक्तिगत विचारामध्ये सतत जागरूक राहण्याचा मुद्दा महत्त्वाचा आहे.
‘Eternal vigilance is the price of Liberty` हे नात्यांच्या बाबतीतदेखील खरे आहे. त्यामुळे पुरुषांनी नुसत्या ‘मर्दानगी’च्या कल्पना किंवा स्त्रियांनी आकर्षकतेच्या मात्रा उगाळून आपले जीवन संकुचित किंवा हिंसक, भय आणि चिंता यांनी ग्रासलेले होऊ न देता आयुष्याच्या सफलतेची वाट चालायला शिकावे. या सर्व प्रक्रियेत आपले शरीर आणि मन याबद्दल ‘स्व’जाणीव कशा प्रकारे काम करते. अनुभव आपण कसे ‘घेतो’ हा परीशीलनाच्या सवयीचा भाग महत्त्वाचा आहे. दुसऱ्या व्यक्तीचे निरीक्षण आणि तिच्याविषयीचे मत कसे बनवले, याचेही भान विकसित करणे आवश्यक आहे. कारण, ‘प्रथम दर्शनी’ प्रेम, भाळणे, दुसरे काही न सुचणे अशा अनुभवांची ‘ओळख’ आपली आपल्यालाच ठेवायची असते. वेगळ्या प्रकारच्या अशा विधायक कामासाठी प्रौढ विरुद्ध तरुण हे द्वंद्व मोडून संवाद साधावा लागतो. अनुभवाचा फायदा, सबुरी आणि धाडस यांचे अनोखे रसायन या क्षेत्रात आपल्या कामाचा भाग होते. त्यासाठी प्रयत्न केले तर समाजातील भ्रांत कल्पना, आत्मश्रेष्ठत्वाचा भ्रम किंवा लैंगिकतेबाबत कठोर दृष्टीकोन अशा प्रचलित पण अनैसर्गिक धारणांचा सामना करावा लागतो. तेथे विचार आणि निकष, परिवर्तन आणि पुढची वाट यांचा ‘सामना’ करावा लागतो. यात जाती, धर्म, वर्ग आणि त्यावर आधारित राजकीय व्यवहार हे सगळे अडसर बनू शकतात. त्यामुळे हे खोल आणि संथ काम परिवर्तनाचे पायाभूत आधार निर्माण करणारे आणि नव्या मूल्यांना स्थान देणारे असेल.
(लेखिका मानसशास्त्राच्या अभ्यासक आहेत.)
Edited By - Prashant Patil