यूथटॉक : ‘सेफ झोन’मधून बाहेर पडताना...

siddharth mhatre
siddharth mhatre

परवा आम्ही मित्र-मैत्रिणी भेटलो होतो. कश्‍मिरा म्हणाली, ‘‘ऐका, माझी बदली बंगळूरला झालीय. पुढच्या आठवड्यात निघतेय. म्हणून आजची ही पार्टी.’’ त्यावर वैष्णवी लगेच म्हणाली, ‘‘कश्‍मिरा, आता पुन्हा नवं शहर, वेगळे वातावरण, अपरिचित माणसं... कसं जमवणार आहेस तू?’’ आधी सिंगापूर आणि नंतर दिल्लीत नोकरीनिमित्त राहिल्यामुळे कश्‍मिराला फार काही वाटलं नाही. मला तर ती छान उत्साहात दिसली. तिला जीवनातील बदल ही कटकट नव्हे तर संधी वाटत होती. तसंही हल्ली कुठल्या एका शहराचे नसतोच मुळी आपण. शिक्षणानिमित्त किंवा नोकरीनिमित्त आपण सगळेच जगभर फिरत असतो. त्यामुळे अमुक एक शहराचा टॅग आपल्यावर राहत नाहीच. ‘फेसबुक’चं चेक इन वापरत आपण सारखं होमटाउन बदलत असतो. कश्‍मिराला जसं वाटलं, तसं हल्ली बऱ्याच जणांना वाटतं. पूर्वीसारखं ‘अरे यार, ट्रान्स्फर झाली!’ असं म्हणत कपाळावर हात मारताना फारसं कुणी दिसत नाही. नवीन असलेल्या शहरात किंवा फॉरेनमध्ये राहिलं की आपल्याला नव्या संस्कृतीची ओळख होते. नवी माणसं, नवा परिसर आणि नोकरीच्या ठिकाणचं वातावरण आपण पाहत जातो, त्यातून शिकत जातो आणि हे करत असताना आपण कल्चरलीसुद्धा पुढे जातो. नवीन गोष्टी स्वीकारायला वेळ हा जातोच, कारण तोही एक बदलच असतो. पण बदलाचा हा प्रवास एन्जॉय केला, की मग छान वाटतं.
थोडं चुकत, थोडं समजून घेत, थोडं जुनं मागं टाकत आपण विस्तारत जातो. आजच्या काळात अमुक एक कल्चर असं राहिलं आहे का, असंही कधीकधी मनात येतं. इंटरनेट आणि सोशल मीडियानं जग जवळ आलं आहे आणि त्यामुळे एक नवीनच ‘फॅसिलिटेट’ किंवा ‘सुलभीकरण’ झालेलं कल्चर अस्तित्वात येऊ पाहतं आहे. नव्या वातावरणाशी जुळवून घ्यायला जशा पूर्वी अडचणी येत होत्या, तशा आता येत नाहीत. कारण एखाद्या नव्या शहरात किंवा परदेशात जाण्याअगोदर आपण इंटरनेटवर त्याविषयी उपलब्ध असलेलं साहित्य, ब्लॉग आणि ट्रॅव्हल ब्लॉग पाहत असतो. त्यातून बरीच माहिती मिळत असते. प्रत्यक्ष तिथला आपला अनुभव निराळा किंवा अधिक सुंदर असू शकतो. नवं कल्चर, तिथली माणसं, भाषा, याविषयी कुतूहल असलं, की हे सगळं समजून घेण्यात एक मजा असते. अर्थात नव्या शहरात आपल्याला अडचणीसुद्धा येतात आणि बऱ्याचदा त्यातून गोंधळही निर्माण होतात. पण आपण त्या अनुभवातून घडत जातो आणि मग पूर्वीपेक्षा थोडं अलर्ट राहणंही शिकत जातो.

सध्याचं जग वेगात जाणारं आहे आणि ते आपल्याला बदलवणारं आहे. अनेकांना भीती वाटते की आपली बदली होऊन एकदम नवं शहर आपल्या वाटेला आलं तर काय करायचं? अशीच भीती माझ्या मैत्रिणीला मितालीला अमेरिकेत जायच्या आधी वाटली होती. ती मूळची वसईची. सध्या अमेरिकेत असते. तिथे नवीन नवीन गेली होती, तर सारखं म्हणायची, ‘कसं ॲडजस्ट करू यार! घरी यावं असं वाटतंय.’ आता चार वर्षांनंतर विचारल्यावर म्हणाली, ‘‘सुरवातीला इथं आले तेव्हा सगळं जुळवून घ्यायला फार अवघड वाटायचं. काहीही झालं की आपल्या भारतात असं नसतं, असंच मी म्हणायचे. पण आता चार वर्षांनंतर इथल्या सगळ्या वातावरणाशी छान मैत्री झाली आहे. घरची आठवण आली तरीही अमेरिका सोडून जावं असं वाटत नाही.’’ आपल्याला परदेशात गेल्यावरच असं वाटेल असं नाही, तर एका राज्यातल्या राज्यात किंवा देशातसुद्धा असं वाटू शकतं. औरंगाबादमधून शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या आनंदला सुरवातीला वेगळं वाटायचं. मग मात्र पुण्यातलं वातावरण, फिरणं, खादाडी करणं आणि नव्या माणसांना भेटणं या सगळ्यांत त्याला मज्जा वाटू लागली. नवीन शहरात आल्यामुळे अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या, असंही तो म्हणतो.

आपल्या कल्चरविषयी आपल्याला अभिमान असतोच. पण तो असताना आपण इतर कल्चरमध्ये जे चांगलं आहे, ते घेण्याचा प्रयत्न कायम केला पाहिजे. कारण त्यातूनच आपलं व्यक्तिमत्त्व घडत जातं. आपण एका ‘सेफ झोन’मधून बाहेर पडून नव्या जागी गेलो की आपण अधिक स्वतंत्र, स्वावलंबी होत जातो. डिसिजन मेकिंगसुद्धा या नव्या वातावरणात शिकत जातो. सो फ्रेंड्‌स, जस्ट एक्‍स्प्लोर अँड एन्जॉय!
(लेखक पत्रकारिता अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com