ब्रह्मांडी ते पिंडी : एक वैश्विक गोफ!

अपोलो-११ यान जेव्हा चंद्रावर उतरलं तेव्हा चंद्राची छायाचित्रे वर्तमानपत्रांमधून झळकली.
similarity between Milky Way and neurons in human brain
similarity between Milky Way and neurons in human brainsakal
Updated on

- राजेन्द्र खेर

ब्रह्मांडातील आकाशगंगा आणि मानवी मेंदू यांचे आकारमान (Scale) जरी भिन्न असले, तरी आकाशगंगेतील ग्रह-तारे यांच्यामधील अंतर आणि मानवी मेंदूतल्या न्यूरॉन्समधील अंतर यांमध्ये उल्लेखनीय समानता आहे, असे प्रयोगांती दिसून आले आहे.

लहानपणापासून मला आकाशाची विलक्षण ओढ! आमच्या वाड्यातून जे काही ग्रह-ताऱ्यांनी सजलेलं आकाश दिसायचं त्याकडे मी अनेकदा टक लावून बघत बसे. आनंदनगरमध्ये राहायला आल्यानंतर आकाश मोकळंच होतं! डोंगरांआडून उगवता चंद्र पाहायला मिळायचा.

अनंत अवकाश आणि असंख्य ताऱ्यांकडे बघताना माझ्या मनात तारुण्यसुलभ प्रश्न उठत, हे सारं कुणी बनवलं असेल? दूरच्या ग्रहांवर खरोखरच अतिमानवांची वस्ती असेल का? उडत्या तबकड्या (UFO) खरंच असतात का?

अपोलो-११ यान जेव्हा चंद्रावर उतरलं तेव्हा चंद्राची छायाचित्रे वर्तमानपत्रांमधून झळकली. ते पाहून मन अक्षरश: हरखून गेलं. त्याकाळी ‘स्टार ट्रेक’ ही मालिका दूरदर्शनवरून दाखवली जायची. मि. स्पॉक ही त्यातली व्यक्तिरेखा आमच्या फार आवडीची!

लहानपणी ‘जॅक आणि पावट्याचा वेल’ (Jack and the Beanstalk) या गोष्टीची तर असंख्य पारायणं झालीच होती. जॅक वेलावर चढून ढगावर जातो, तिथे राक्षसाचा मोठा वाडा असतो वगैरे वर्णनं वाचताना बालमन हरखून जायचे.

पुढे जेव्हा प्रकाशाचा वेग, वेळ आणि अंतराळ आदींविषयी वाचन झालं तेव्हा प्रत्यक्ष जाण्यासाठी काहीशे प्रकाशवर्षे अंतरावरचे ग्रहसुद्धा आपल्या आवाक्यात नाहीत, याविषयी खात्री पटत गेली. मग अब्जावधी प्रकाशवर्षे दूर असणाऱ्या ग्रह-ताऱ्यांचा विचारच नको! म्हणजे फोटॉन रॉकेटसह प्रकाशाच्या वेगानं जाणाऱ्या भावी काळातील संभाव्य भौतिक साधनांचा जरी विचार केला तरी ब्रह्मांडाला कवेत घेणं सहज शक्य नाही, हे उमजलं.

ऐन तारुण्यात भारतीय तात्त्विक विचारधारेतले ‘पिंडी ते ब्रह्मांडी’सारखे विचार नेहमी कानी पडत. तात्त्विकदृष्ट्या जे ब्रह्म सर्वव्यापी आहे तेच आपल्या अंतरंगात वसून असतं किंवा परमात्म्याचा ‘प्रत्यगामा’ स्वरूप अंश आपल्यामध्ये वसून असतो, असे विचार ‘पिंडी ते ब्रह्मांडी’ संदर्भात वाचायला मिळत. पण प्राकृतिक दृष्टीनं ‘पिंडी ते ब्रह्मांडी’चा शोध लागण्यासाठी मात्र सन २०२०पर्यंत थांबावं लागलं!

आकाशगंगा व मानवी मेंदू

‘सायन्स न्यूज’मध्ये २०२०मध्ये एक अहवाल प्रकाशित झाला : बोलोग्ना विद्यापीठातील खगोलभौतिक शास्त्रज्ञ आणि व्हेरोना विद्यापीठातील न्यूरोसर्जन यांनी मानवी मेंदूतील न्यूरोनल पेशींच्या नेटवर्कची तुलना ब्रह्मांडातील आकाशगंगांच्या वैश्विक नेटवर्कशी केली आणि त्यांमध्ये त्यांना आश्चर्यकारक समानता दिसून आली!

हे विश्व म्हणजे जणू विशाल मानवी मेंदूच आहे, असं शास्त्रज्ञांना आढळून आलं. ‘द इंडिपेन्डंट’मध्ये ही वार्ता झळकली आणि सारं वैज्ञानिक जगत थक्क झालं. ब्रह्मांडातील आकाशगंगा आणि मानवी मेंदू यांचे आकारमान (Scale) जरी भिन्न असले तरी आकाशगंगेतील ग्रह-तारे यांच्यामधील अंतर आणि मानवी मेंदूतल्या न्यूरॉन्समधील अंतर यांमध्ये उल्लेखनीय समानता आहे, असं प्रयोगांती दिसून आलं.

या दोन्ही प्रणालींमधले (आकाशगंगा आणि मानवी मेंदू) तारे आणि न्यूरॉन्स् एका जटील नेटवर्कमध्ये एकत्र केले जातात. अव्यक्त तंतूंनी त्यांना नोड्समध्ये जोडलेलं आहे. म्हणजे त्यांची गाठ मारली आहे! ते नोड्स् ब्रह्मांड आणि मानवी मेंदू या दोहोंच्या समानतेलाही कारणीभूत आहेत, असंही आढळून आलं.

थोडक्यात, ब्रह्मांडातील ग्रह-ताऱ्यांची मधल्या अवकाशासह जशी संरचना आहे तशीच संरचना छोट्या स्वरूपात मनुष्याच्या मेंदूतील न्यूरॉन्सची आणि त्यामधल्या अवकाशाची आहे, हा अतिशय महत्त्वाचा शोध २०२० मध्ये लागला!

या दृष्टीनं ब्रह्मांड म्हणजे एक विशाल पिंड आहे, तर मानवी मेंदू ही छोटी पिंड. म्हणून मेंदूच्याच सहाय्यानं म्हणजे मानवी पिंडीच्या माध्यमातूनच सर्व ब्रह्मांड इथल्या इथे जाणता येऊ शकतं, असं म्हणायला हरकत नसावी! कारण या दोन घटकांमध्ये सुप्त बंध म्हणजे कनेक्शन आहे.

‘योगवासिष्ठा’त अशी उदाहरणं वाचायला मिळतील. हेच ज्ञान शेकडो वर्षांपूर्वी ऋषी-संतांनी ‘पिंडी ते ब्रह्मांडी’ या साध्या-सोप्या शब्दांत सांगितलं होतं. या शोधामुळे संतविचारांना प्राकृतिक स्वरूपातही नक्कीच बळकटी मिळली आहे, असं आपण म्हणू शकतो.

निकोला टेस्ला हा एडिसनचा समकालीन शास्त्रज्ञ म्हणतो, ‘‘My brain is only a receiver, in the universe, there is a core from which we obtain knowledge, strength, and inspiration. I have not penetrated into the secrets of this core, but I know that it exists.’’ (ज्ञानगर्भातून ज्ञान, बल आणि प्रेरणा स्वीकारणारा माझा मेंदू हा विश्वातील एक रिसिव्हर आहे. मला त्या गर्भातलं सर्व ज्ञान झालं आहे, असा माझा दावा नसला तरी त्याच्या अस्तित्वाची मला पूर्ण खात्री आहे.)

अंत:करणांचंही एक नातं

मानवी मेंदू हा ब्रह्मांडातील प्रकृतीलाच जोडलेला आहे; आणि म्हणूनच तो केवळ प्रकृतीचंच ज्ञान मिळवू शकतो, ही गोष्टही इथे सिद्ध होते. त्यामुळे, मानवी मेंदू आणि ब्रह्मांडातील ग्रह-ताऱ्यांचं वैश्विक नेटवर्क, ज्या प्रकृतीपलीकडील तत्त्वामुळे निर्माण झालं त्या तत्त्वाचा शोध प्री-प्रोग्रॅम केलेल्या मेंदूद्वारे आपण घेऊ शकत नाही, हेही सिद्ध होतं.

अर्थातच या वैश्विक पिंडीच्या पलीकडे ते सर्वव्यापी चिरंतन तत्त्व आहे! पण तेच तत्त्व प्रत्यगामा स्वरूपात प्रत्येक जीवामध्ये असतं, असं भारतीय तत्त्वज्ञान सांगतं. म्हणून अंतर्मुख होऊन भावभक्तीनंच (आत्मज्ञानानं) आपण त्या तत्त्वापर्यंत पोहोचू शकतो.

थोडक्यात, वैश्विक नेटवर्क आणि मानवी मेंदूतील न्यूरॉन्स यांना एकत्र बांधून टाकल्यामुळे ब्रह्मांडाचा शोधही तेवढ्या सीमेपुरताच मर्यादित असणार, हे उघड आहे. हा झाला मेंदूतील न्यूरॉन्सचा विषय. मनुष्याच्या पचनक्रियेमध्ये (गटस्) आणि हृदयामध्येही (heart nervous system) न्यूरॉन्स असतात, हे अलीकडचे आणखी मोठे शोध.

हृदयातल्या न्यूरॉन्सची संख्या जवळपास चाळीस हजार आहे, असा शोध डॉ. आर्मर यांनी १९९१मध्ये लावला. प्रत्येक जीवाच्या हृदयामधील न्यूरॉन्सचं इतर जीवांमधल्या हृदयातील न्यूरॉन्सशी कनेक्शनही असतं, हे डॉ. ग्रेग ब्रँडन यांनीही साधार मांडलं आहे.

यालाच प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानात ‘प्रजातंतू’ म्हटलेलं आहे! ब्रह्मांडाचं आणि मानवी मेंदूतील न्यूरॉन्सचं असलेलं हे वैश्विक नेटवर्क आणि हा प्रजातंतू मिळून एक विशालकाय सृष्टीव्यापार अस्तित्वात आला आहे. म्हणूनच ब्रह्मांड जाणण्याची ओढ मानवी मेंदूला असते. कारण त्यांचं अव्यक्त नातं आहे. त्याचप्रमाणे अंत:करणांचंही एक नातं असतं.

म्हणूनच दुसऱ्या व्यक्तीची, जीवाची किंवा आराध्य तत्त्वाची भावपूर्ण ओढ मानवी अंत:करणाला असते. आता लागलेल्या या नवीन शोधांच्या आधारानं तर्कदृष्ट्या विचार करायचा झाल्यास, बुद्धीचं नातं प्रकृतीशी असतं, अंत:करणाचं नातं जीवांशी असतं आणि आत्म्याचं नातं परमतत्त्वाशी असतं. हे आत्मिक नातं प्रस्थापित झाल्यानंतर जाणायचं काही उरत नाही!

(लेखक साहित्यिक/कादंबरीकार आहेत.)rkher1961@gmail.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com