sindhu sanskruti history of india living culture roman worm
sindhu sanskruti history of india living culture roman wormSakal

मातीवर चढणे एक नवा थर अंती...

इसवी सन पूर्व २५०० ते १७०० भारतीय उपखंडाच्या वायव्य प्रदेशात सिंधु संस्कृती नांदत होती. मेसोपोटेमिया, इजिप्त आणि सिंधू संस्कृती २८ ते ३३ अंश उत्तर अक्षांशात बहरल्या.

- डॉ. शंतनु अभ्यंकर

इसवी सन पूर्व २५०० ते १७०० भारतीय उपखंडाच्या वायव्य प्रदेशात सिंधु संस्कृती नांदत होती. मेसोपोटेमिया, इजिप्त आणि सिंधू संस्कृती २८ ते ३३ अंश उत्तर अक्षांशात बहरल्या. हा योगायोग नसून हवामानाची किमयाच. इ.स.पू. ६००० ते ४५०० आणि पुन्हा इ.स.पू. ३३०० ते २३०० हे सुयोग्य हवामानाचे काळ मानले जातात.

इ.स.पू. २१०० नंतर पुन्हा एल् निनोचा दुष्काळी फेरा सुरू झाला. अवर्षणाने इजिप्त, अक्काडियन, मायेसीने, क्रेटे आणि सिंधू अशा संस्कृती लयास गेल्या. पाऊस घटला, नद्या आटल्या, माणसं जगायला बाहेर पडली.

मोजक्या सुपीक प्रदेशात इतके निर्वासित आले की, तिथलीही सुबत्ता संपुष्टात आली. पर्यावरण ढासळले. कुष्ठरोग, क्षय आणि इतर आजार फोफावले, हिंसाचार वाढला. सिंधू संस्कृती इतिहासजमा झाली.

यूनान (ग्रीक), मिश्र (इजिप्त), रोमां (रोमन) सब मिट गये जहांसे, बाकी मगर है अबतक नामों निशां हमारा; हे देशभक्ती म्हणून ठीक आहे. प्रत्यक्षात दौर-ए-जमाँ दुश्मन झाल्यावर हस्ती मिटायला फार ‘सदीयां’ लागत नाहीत. ‘मातीवर चढणे एक नवा थर अंती’, हेच खरं.

अनुकूल काळांत बहर आणि प्रतिकूल परिस्थितीत विनाश हे चक्र सार्वत्रिक आहे. इ.स.पू. ३०० ते पुढे जवळपास ८०० वर्ष भूमध्य समुद्राच्या प्रदेशांत, नॉर्थ अटलांटिक ऑसीलेशनच्या (हे चक्र आईसलँडभोवती केंद्रीत कमी दाब आणि उत्तर अटलान्टिक जवळील अजरोसनजीकचा उच्च दाब यामुळे होते) कृपेने, हवामान अनुकूल होते.

याला म्हणतात ‘रोमन वॉर्म’. शेती पसरली, शहरे, व्यापार उदीम वेगाने वाढला. हिवाळी पाऊसमान, राबायला गुलाम; बघता बघता रोमन साम्राज्याचा उदय आणि विस्तार झाला. सारे रस्ते आता रोमला जाऊ लागले. त्याच वेळी मुलुखगिरीला बाहेर पडलेले सैनिक आणि चीन, भारत वगैरे दूरदेशी व्यापारासाठी गेलेले अनेक सैंय्या परतताना नवे नवे जंतूही आणत.

गावोगावी (अशा निदान दोनशे नोंदी आहेत) देवीच्या, जुलाबाच्या साथी नित्याच्या झाल्या. इ.स. १६६ ते १९०च्या दरम्यानचा ‘अॅंटोनियन प्लेग’ हा सम्राट मार्कस अॅंटोनियसचाच घास करून गेला (म्हणून अॅंटोनियन प्लेग).

रोमनांचे जणू चरकमुनी असे गेलेन यांनी सगळ्या भयावह परिस्थितीचं वर्णन केलं आहे. तरीही नेमका शोध लागतच नाही. इथे ‘प्लेग’ म्हणजे भयंकर महासाथ एवढाच अर्थ आहे. तुम्हां-आम्हांला परिचित असलेला हा उंदीर- रॅण्ड प्लेग तो हा नाही. गोवर किंवा देवीच्या या प्रचंड साथी असाव्यात.

पण असली, यर्सीनिया पेस्टीस नावाच्या जंतूने होणाऱ्या उंदीर-रॅण्ड प्लेगाने, म्हणजेच ब्युबोनिक प्लेगानेही रोमन साम्राज्याला गाठलंच आणि ग्रासलंच. इ.स. ५४२ मध्ये हा, राजधानी कॉन्स्टॅटिनोपलमध्ये पसरला.

हा आपल्याला माहीत असलेल्या यर्सीनिया पेस्टीसपेक्षा किंचित वेगळा होता. चार महिन्यात एक तृतीयांश लोक मेले. तेंव्हा जस्टीनियन राजा होता म्हणून हा ‘जस्टीनियन प्लेग’. काही उंदीर प्लेगने मेले म्हणून लगेच साथ येत नाही. ती बहुस्तरीय प्रक्रिया असते.

आधी हा आजार जंगली उंदीर वा अन्य कृदंत प्राण्यांतून माणसाजवळ बिळं करणाऱ्या उंदीर प्रजातीत (रॅटस रॅटस) यायला हवा. असले उंदीर पुरेशा प्रमाणात मेले की, त्यांच्या अंगावरच्या पिसवा माणसाकडे वळतात.

मग माणूस-माणूस किंवा उंदीर-माणूस-उंदीर असं लागण चक्र सुरू होतं, टिकून रहातं. रॅटस रॅटसचं हे बेणं भारतातून (किंवा पूर्व आफ्रिकेतून) व्यापारी बोटींतून तिकडे पोहोचलं म्हणे. व्यापार बराच काळ चालला, पण प्लेग इ.स. ५३६ नंतरच का पोहोचला, याचे उत्तरही रंजक आहे.

‘रोमन वॉर्म’चं पर्व होतं तेव्हा भारत रोम दरम्यानची बोटीतली गर्मी संपूर्ण मूषकसंहार घडवून आणे. पिसवाही मरून जात. इ.स. ५३६ ते ५३८च्या दरम्यान रोमच्या मार्गावर थंडी पडली. उंदीर, पिसवा आणि यर्सीनिया पेस्टीस सुखरूप रोमन साम्राज्याच्या बंदरांवर पायउतार झाले आणि बाकी इतिहास घडला.

एडवर्ड गिबनने रोमन साम्राज्याचा ऱ्हास आणि अंत कसा झाला, हे सांगताना नैतिक अध:पतन, प्रशासकीय दुराचार वगैरे कारणे गणली आहेत. पण इ.स. ३५०नंतर वारे पुन्हा फिरले हे सर्वात महत्त्वाचं कारण आहे. आता पाठोपाठ पीकं जाऊ लागली, खंगलेली प्रजा साथीच्या रोगांनी खाऊन टाकली. प्रचंड साम्राज्यावर सत्ता राखणं कठीण होत गेलं, सीमावर्ती प्रदेशांत उठाव झाले आणि रोमन साम्राज्याचा अस्त झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com