संवर्धनाच्या प्रतीक्षेत पुष्कर तलाव

शिखर शिंगणापूर येथील ऐतिहासिक पुष्कर तलाव गाळमुक्त करणे, त्याचे सुशोभीकरण करून तो यात्रेकरूंच्या आकर्षणाचा बिंदू व्हावा, यासाठी पावले उचलली जात आहेत.
Pushkar Lake
Pushkar LakeSakal
Summary

शिखर शिंगणापूर येथील ऐतिहासिक पुष्कर तलाव गाळमुक्त करणे, त्याचे सुशोभीकरण करून तो यात्रेकरूंच्या आकर्षणाचा बिंदू व्हावा, यासाठी पावले उचलली जात आहेत.

- एस. के. कुलकर्णी

शिखर शिंगणापूर येथील ऐतिहासिक पुष्कर तलाव गाळमुक्त करणे, त्याचे सुशोभीकरण करून तो यात्रेकरूंच्या आकर्षणाचा बिंदू व्हावा, यासाठी पावले उचलली जात आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा श्रीमालोजीराजे यांनी त्याची निर्मिती केली आहे.

लोकसहभागातील ‘हरित वसुंधरा कार्यक्रमा’च्या माध्यमातून शंभू-महादेवाच्या शिखर-शिंगणापूर येथील प्राचीन तलावाचे सुशोभीकरण आणि दुरुस्ती करण्याचा उपक्रम अभिमानास्पद आहे. तो छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा श्रीमालोजीराजे यांच्या कार्याचे उचित महत्त्व स्पष्ट करणारा ठरणार आहे. श्रीमालोजीराजे आणि त्यांचे बंधू श्रीविठोजीराजे आपल्या वेरुळजवळील त्या काळातील निवासस्थानापासून शिवभक्तीच्या ओढीने शिखर-शिंगणापूरला (ता. माण, जि. सातारा) प्रतिवर्षी ४०० किलोमीटर दूर यात्रेसाठी येत. शिंगणापूरच्या पायथ्याशी गावातील शांतलिंगप्पा मठाजवळ वस्तीस थांबत. ही हकीकत जवळपास ४५० वर्षांपूर्वीची. शंभूची यात्रा चैत्रमासातील. त्या वेळी तेथे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशातून हजारो यात्रेकरू येत. पाण्याअभावी त्यांचे हाल होत. माण परिसर नित्य कमी पावसाचा. त्यांचे ते हाल दूर करण्यासाठी श्रीमालोजीराजे यांनी तलाव बांधण्याचा निर्णय घेतला. हा तलाव तीन एकरांमध्ये आहे. कडेचे बांधकाम दगडी आणि भिंती बैलगाडी जाण्याएवढ्या रूंद ही त्यातील योजना आजही पाहता येते. ज्या भागात पाणी साचते, तेथील दगडी भिंतीची उंची एखाद्या धरणाइतकी आहे.

गाळ, राडारोडा काढणार

‘हरित वसुंधरा’ उपक्रम व अन्य बाबींची चर्चा करण्यासाठी माण तालुक्याचे प्रमुख गाव- दहिवडी येथे काही दिवसांपूर्वी गावकरी, कार्यकर्ते, ग्रामपंचायतीचे सदस्य यांच्याशी योजनेचे पुरस्कर्ते या भागाचे प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी एकत्रितपणे चर्चा केली. सूर्यवंशी यांनी मान्यवरांना यापूर्वी उपक्रम समजावून सांगितला. हा उपक्रम म्हणजे कित्येक वर्षांपासून (तलाव ४२५ वर्षांपूर्वीचा) जो गाळ, दगडगोटे, राडारोडा साचत आला, यात्रेकरूंच्या येण्या-जाण्याने, वा अन्य कारणांनी जो कचरा स्वाभाविकपणे (पावसाने) तलावात येतो, तो काढून पाण्याचा साठा वाढेल, यासाठी प्रयत्न करणे हा आहे. शिंगणापूरला प्रतिदिनी शेकडो भाविक येतात. शिवाय सोमवार, अमावास्या, श्रावण महिना, महाशिवरात्रीस यात्रा असतेच. त्या पलीकडे चैत्रयात्रेत महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा-आंध्र प्रदेश इत्यादी भागातून लाखो भाविक येतात. ही यात्रा चैत्र पंचमी ते पौर्णिमा असते. हे स्थान मराठवाड्याच्या गावागावाचे कुलदैवत होय. पाणीसाठ्याबरोबर तलावाच्या सभोवार पर्यटक व भाविक यांच्यासाठी सहा ते आठ फूट (दोन ते अडीच मीटरचा) वॉकिंग ट्रॅक करण्याचा विचार आहे. त्यामुळे तलावाकडे नित्य सर्वांचे लक्ष राहील. स्वच्छता राहील. या गावची यात्रा अक्षरश: गेल्या १५०० वर्षात राष्ट्रकूट, चालुक्य व यादव घराणी आणि गेल्या साडेचारशे वर्षांपूर्वीच्या मालोजीराजे यांनी बांधलेल्या तलावामुळे सतत वाढत राहिली.

चारशे एकरांत यात्रा

छत्रपती शिवाजी महाराज यांचे नातू छत्रपती (थोरले) शाहूमहाराज यांनी मंदिराचा तळापासून जीर्णोद्धार केल्याने भाविकांची उपस्थिती वाढत आहे. ही यात्रा तलावाच्या समोरील व जवळचा परिसर, त्याप्रमाणे अन्य ४०० एकराच्या क्षेत्रात परंपरेने भरते. त्या क्षेत्राला पूर्वी उमाबन म्हणत. या साऱ्या क्षेत्राची व्यवस्थित आखणी करण्याचीही गरज आहे. त्यात सध्याच्या भक्तनिवासापाशी तलावाकाठी जे क्षेत्र आहे, तेथे व तलावाच्या वॉकिंग ट्रॅकपलीकडच्या भागात झाडी व हिरवळीची (लॉन) सुविधा करणे आवश्यक आहे.

श्रीमालोजीराजे यांनी त्या काळी विपुल पैसा (एक काहील धन) खर्चून हा तलाव बांधल्यावर त्यांची कीर्ती सर्वदूर पसरली. ती सध्याच्या उपक्रमामुळे द्विगुणीत होईलच, शिवाय श्रीमालोजीराजांच्या लोकोपयोगी कार्याचा तो गौरवही ठरेल. आजच्या समाजाने ती त्यांच्याबद्दल व्यक्त केलेली कृतज्ञता ठरणार आहे. छत्रपतींच्या घराण्याचे शंभू हे कुलदैवत आहे, तद्वत ते शिखराबद्दल प्रसिद्ध आहे. शिखर-शिंगणापूरच्या पावलापावलावर इतिहासाच्या पाऊलखुणा आहेत. अर्थात तो विषय विस्ताराने लिहिण्याचा. तंजावरच्या (तमीळनाडू) वैजनाथशास्त्री यांनी संपादित केलेल्या ‘साहित्य-मकरंद’ या ग्रंथात श्रीमालोजीराजांनी तळे बांधल्याचा उल्लेख आहे -

सुशीलभक्तस्य च भक्तितुष्ट:,

तत्राधिवास: कृत:, महादयालु:।

न तत्र नीर, न तरुप्रचार:,

न कोऽपि लोकं वसतिं करोति।।१।।

तथापि शंभुर्निजभक्तलोभात्

कैलासवासं मनुते करोति।

तस्मिन् स्थळे सूर्यकुलावतंसो

मालोजीनामा कृतवान् तटाकम्।।२।।

उष्ण वैराण, शुष्क माण भारी,

जनांची भक्ती अलोट शंभूवरी।।

भक्तांचा भुकेला असा शंभूदेव,

महाराष्ट्राचा साजिरा कुलदेव।।

जलस्थिति पालटे राजा मालोजीनामा,

निर्मितसे जलपूर्ण तडागा विशाला।।

शंभूवरी भक्ती तयाची विशेष।

वेरुळाहून येती नित्य चैत्रास।।

शांतलिंगस्वामीचे मठाजवळी।

निवास त्यांचा तेथे वृक्षातळी।।

शिखर शिंगणापूरचे पुष्कर तलाव हा महाराष्ट्राचा अभिमानास्पद वारसा आहे. त्याच्या संवर्धनाला, सुशोभीकरणाला लोकसहभागाने बळच मिळणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com