स्मार्ट वॉच करणार तुमच्या आरोग्याची तपासणी

सनील गाडेकर
Friday, 27 November 2020

आजाराचे वेळेत निदान झाले व रुग्णाची मेडिकल हिस्टरी असल्यास त्यावर त्वरित योग्य उपचार करता येतात. मात्र, रुग्ण शहरी असो किंवा ग्रामीण भागातील, त्याच्या आजाराची किंवा कोणतीही शस्त्रक्रिया करण्यापूर्वी आवश्‍यक असलेली वैद्यकीय माहिती त्याच्याकडे असेलच असे नाही. न्युक्लिस्पेस या स्टार्टअपने तयार केलेल्या स्मार्ट वॉचमुळे या सर्वांची ही वैद्यकीय अडचण आता दूर होणार आहे.

आजाराचे वेळेत निदान झाले व रुग्णाची मेडिकल हिस्टरी असल्यास त्यावर त्वरित योग्य उपचार करता येतात. मात्र, रुग्ण शहरी असो किंवा ग्रामीण भागातील, त्याच्या आजाराची किंवा कोणतीही शस्त्रक्रिया करण्यापूर्वी आवश्‍यक असलेली वैद्यकीय माहिती त्याच्याकडे असेलच असे नाही. न्युक्लिस्पेस या स्टार्टअपने तयार केलेल्या स्मार्ट वॉचमुळे या सर्वांची ही वैद्यकीय अडचण आता दूर होणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ईसीजी, रक्तदाब (बीपी), रक्तातील ऑक्‍सिजन (एसपीओ २), हृदयाचे ठोके (हार्ट रेट), एका मिनिटात किती वेळा श्‍वास घेता (रेस्पिरेशन रेट) आणि शरीराचे तापमान (बॉडी टेंपरेचर) आदी बाबी अगदी सहजपणे स्मार्ट वॉचद्वारे मोजता येणार आहे. एवढेच नाही, तर ही सर्व माहिती वॉच वापरत असलेल्या व्यक्तीला सात वर्षे स्टोअर करता येणार आहे. स्मार्ट वॉचने जमा केलेल्या माहितीचे विश्‍लेषण करून त्या आधारे वैद्यकीय सल्ला देणे किंवा उपचार करणे सोपे होणार आहे. न्युक्‍लिस्पेस (Nuclespace) या स्टार्टअपने हे वॉच तयार केले आहे. करण सावंत यांनी नोव्हेंबर २०१९ मध्ये ठाण्यात या स्टार्टअपची सुरुवात केली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘ईसीजी’सारख्या चाचण्या छोट्या रुग्णालयांत उपलब्ध असतातच, असे नाही. ग्रामीण भागातील रुग्णालयांत तर याचे प्रमाण फारच कमी असते. त्यामुळे आजाराचे निदान न झाल्याने रुग्णांवर किरकोळ उपचार केले जातात. त्यातून रुग्णांचा आजार बळावू शकतो, तसेच या टेस्ट उपलब्ध असलेल्या ठिकाणी रुग्णालयानुसार दिवसाला हजारो रुपये प्रत्येक वेळी मोजावे लागतात. त्यातून आलेल्या अहवालाची नोंदणी डिजिटल पद्धतीने ठेवली जात नाही. त्यामुळे पुन्हा टेस्ट केल्यास आधीचे रिपोर्ट न मिळण्यासारखे प्रकार होतात व केस हिस्टरी ठेवणे अवघड होते. मात्र, हे वॉच या सर्व अडचणी दूर करेल, तसेच सर्व माहिती डिजिटल पद्धतीने सात वर्षांपर्यंत जमा करून ठेवेल. त्याचे अहवाल डॉक्‍टर आणि आपण काम करीत असलेल्या व्यवस्थापनाला पाठविता येतात. त्यामुळे आपल्यावर काय उपचार करायचे, हे डॉक्‍टरांना समजते, तसेच कंपनी व्यवस्थापन आपला फिटनेस तपासू शकते.

वडिलांची अडचण सोडवली 
करण यांना ‘एमबीबीएस’ला ॲडमिशन घ्यायचे होते. मात्र, केवळ एक मार्क कमी पडल्याने त्यांनी इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. कॉलेजला असतानाच त्यांनी सायबर सिक्‍युरिटी आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्समध्ये प्रत्येकी एक पेटंट मिळविले. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्यांच्या वडिलांना रुग्णालयात दाखल केले होते. त्यांचे रिपोर्ट आल्यानंतर ते सर्व त्यांच्या डॉक्‍टर मित्रांना पाठवत व त्यांचा सल्ला घेत. हे सर्व कागदपत्र स्वरूपात होते. त्यामुळे ते रुग्णालयाकडून मिळणे, ते डॉक्‍टरांना पाठविणे व त्यांचा प्रतिसाद येणे, या सर्व प्रक्रियेत मोठा वेळ जाई. ही अडचण माझ्याप्रमाणे अनेकांना जाणवत होती. वडील रुग्णालयात असताना त्यांची प्रकृती कशी आहे, याचा रिअल टाइम डेटा मला मिळत नव्हता. या समस्येवर कसा मार्ग काढायचा, याबाबत करण यांनी मित्रांशी चर्चा केली. त्यातून या स्टार्टअपची सुरुवात झाली व करण यांनी ‘रिमोट पेशंट मॉनिटरिंग कंट्रोल युनिट’ सुरू केले. त्यामुळे सर्वांना रुग्णाची माहिती मिळणे सोपे झाले. 

चांगल्या आरोग्यासाठी इतरही उत्पादने 
रिमोट कंट्रोल युनिट हॉस्पिटलला त्यांच्या यंत्रणेमध्ये इन्स्टॉल करावे लागते. त्याचे अॅप डाउनलोड केल्यावर डॉक्‍टर व रुग्णांच्या नातेवाइकांना रुग्णाची लाइव्ह माहिती मिळू शकते. रुग्ण ॲडमिट असताना त्याचे ईसीजी किंवा व्हेंटिलेटरचे रेकॉर्ड स्टोअर करून ठेवले जात नाहीत, त्यामुळे तो डेटा ना डॉक्‍टरांकडे असतो ना रुग्णांकडे. मात्र, या स्टार्टअपची उत्पादने वापरल्यास ही सर्व माहिती रेकॉर्ड करून शेअर करता येते. 

दर आठवड्याला रिपोर्ट तयार होणार 
वॉच घेतल्यानंतर ग्राहकांना Nuclefit हे ॲप डाउनलोड करावे लागेल. त्यानंतर घड्याळ आणि मोबाईल एकमेकांना जोडले जाईल. वॉचमधील माहिती ॲपमध्ये स्टोअर होईल. ॲपमध्ये असलेले ‘एआय’ तंत्रज्ञान या माहितीचे पृथक्करण करून त्याचा अहवाल तयार करेल. हा अहवाल दर आठवड्याला तयार होईल, तसेच पूर्ण महिन्याचादेखील आढावा घेतला जाईल. या काळात शरीरात काही काही वेगळे जाणवल्यास त्याचे नोटिफिकेशन एसएमएस, ई-मेल, व्हॉट्सॲप व ॲपद्वारे घड्याळ वापरणारी व्यक्ती व त्याला लिंक असलेल्या सर्वांना जाईल. हे नोटिफिकेशन डॉक्‍टरकडे गेल्यानंतर या बदलाबाबत काय उपचार करायचे, हे त्वरित सांगू शकतील. 

स्मार्ट वॉचचे वेगळेपण 
स्मार्ट वॉच बनविणाऱ्या अनेक कंपन्या सध्या बाजारात आहेत. त्यांच्या वॉचमध्ये ठरावीक तपासण्या होतात व त्याची माहिती केवळ स्वतःपुरती ठेवता येते. त्या माहितीच्या आधारे स्वतःलाच स्वतःची काळजी घ्यावी लागते. मात्र, न्युक्‍लिस्पेसच्या वॉचमधून मिळालेली माहिती इतरांना पाठवता येते. त्याआधारे फॅमिली डॉक्‍टर मार्गदर्शन करू शकतात. 

हेल्थ कार्डही मिळणार 
एखादी व्यक्ती रुग्णालयात दाखल झाली व त्याकडे ‘न्युक्‍लिफिट’चे स्मार्ट वॉच नसल्यास त्यांनी मागणी केल्यानंतर त्यांना हेल्थ कार्ड दिले जाईल. ज्यात ते पूर्वीच्या उपचारांची माहिती अपलोड करू शकतात. त्यामुळे तेथील डॉक्‍टरांना रुग्णाची पूर्ण हिस्टरी समजेल व त्या आधारे उपचार करता येतील. वॉच असलेल्यांकडे त्यांची सर्व माहिती आधीच उपलब्ध असेल व त्यांचेदेखील कार्ड मिळेल. 

‘सकाळ’च्या वाचकांना २० टक्के सवलत 
‘सकाळ’च्या वाचकांसाठी न्युक्‍लिस्पेसकडून या स्मार्ट वॉचच्या खरेदीसाठी खास सवलत देण्यात आली आहे. कोणतेही वॉच खरेदी केल्यास त्यावर २० टक्के (६०० रुपयांपर्यंत) सवलत मिळणार आहे. Nuclefit.com या संकेतस्थळावरून वॉचची खरेदी करता येईल. ‘सकाळ’च्या वाचकांसाठी ही सवलत ३१ डिसेंबरपर्यंत आहे. खरेदीवेळी SAKAL हा प्रोमो कोड वापरावा. त्याआधारे सवलत मिळेल. 

आजाराचे निदान होण्यापासून वेळेत उपचार मिळण्यास मदत व्हावी, या उद्देशाने आम्ही दोन स्मार्ट वॉच बनवली आहेत. त्यात वेगवेगळ्या टेस्ट व हेल्थ रेकॉर्ड ठेवण्याची सुविधा आहे. चांगली आरोग्य सुविधा नसलेल्या ठिकाणी या वॉचचा प्रभावी वापर होऊ शकतो. 
- करण सावंत, संस्थापक, न्युक्‍लिस्पेस

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: smart watch will check your health