कोरोनाची दुसरी लाट संपणार कधी? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona

कोरोना लाटेची प्रगती आणि ती संपण्याचा कालावधी याचा मागोवा घेवून त्याबाबत भाकीत करता येते. तथापि, कोरोनाबाबतचे दक्षतेचे नियम पाळणे आणि बाधित होवून बरे झालेल्यांनी रोगाविरोधातील लढ्यात योगदान दिल्यास परिस्थितीवर मात करता येईल.

कोरोनाची दुसरी लाट संपणार कधी?

कोरोनाची दुसरी लाट (second wave of corona) झपाट्याने वाढत गेली आणि बघता बघता तिने कहर केला. बरीचं जीवने उद्धवस्त केली. या लाटेमध्ये एकेका परिवारातील सर्वजण एका पाठोपाठ एक पॉझिटिव्ह (Positive) होत गेले. ही लाट बरीच जीवघेणी आहे. ती लवकर संपावी म्हणून आपल्याला खूप प्रयत्न करायचे आहेत. त्यासाठी जाणून घेऊया लाटेमागची कारणे. (Some of the reasons behind the onset of the second wave of corona)

विषाणूमधील जनुकीय बदल अर्थात डबल म्यूटंट, ट्रिपल म्यूटंट स्ट्रेन. हे म्युटेशन बरेच घातक आहे. त्यामुळे विषाणू फुफ्फुसात लवकर प्रवेशतो. त्यामुळे प्रथम ताप, कफ आणि खोकला अशी लक्षणे दिसतात. नंतर घसा कोरडा पडणे, घसा दुखणे, वास न येणे, चव न येणे ही लक्षणे दिसतात. परिणामी, आजार लक्षात येईपर्यंत विषाणूने बराच घात केलेला असतो. तसेच तो हवेतून पसरतो, असे लॅंसेट मासिकात प्रकाशित झाले आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फायदा होतो की नाही, यावर प्रश्नचिन्ह आहे. विषाणू हवेत बराच काळ राहात असून वेगाने पसरतो. यामुळे घरातील एका व्यक्तीला आजार झाल्यास बाकीच्यांना होण्याचे प्रमाण वाढते.

दुसरे कारण लोकांचा अति आत्मविश्वास. त्यामुळे मास्क न घालणे, काळजी न घेणे, मुलांचे घराबाहेर येणे. या लाटेमध्ये कोविड वाढविण्यात सुपर स्प्रेडर व्यक्तींचा मोठा वाटा आहे. या व्यक्तींमध्ये लक्षणे नसणारी लहान मुले, मास्कऐवजी साडीचा पदर किंवा स्कार्फ बांधणाऱ्या महिला, तसेच मास्कऐवजी रूमाल बांधणारे पुरुष यांचा समावेश होतो.

हेही वाचा: कोरोना काळात गर्भवती महिलांनी लक्षात ठेवाव्या अशा 'पाच' गोष्टी

लागतो चौपट कालावधी

ही लाट कशी, कधी संपेल आणि आपण सर्वजण यामध्ये कसा हातभार लावू शकतो, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. यासाठी जाणून घेऊ या भारतातील पहिली लाट कशी संपली, तसेच इंग्लंडमधील दुसरी लाट कशी आटोक्‍यात आली. हे गणित आहे, असे मला वाटते. सर्वात जास्त रुग्णसंख्या व त्याच्या अर्धी रुग्णसंख्या यामध्ये जेवढ्या दिवसांचा कालावधी असतो, त्याच्या साधारण चौपट कालावधी ही लाट पाच ते दहा टक्‍क्‍यांवर यायला लागतो, असे माझे निरीक्षण आहे.

या निरीक्षणाला जोड मिळावी म्हणून मी तुम्हाला भारतातील कोविडची पहिली लाट उदाहरण म्हणून बघण्यास सांगेन. 17 सप्टेंबर रोजी रोज 96,793 कोविडचे नवीन रुग्ण होत होते. 5नोव्हेंबर रोजी नवीन रुग्णसंख्या 47,622 (साधारण 50%) झाली. 23 डिसेंबर रोजी ही रुग्णसंख्या 24,236 (साधारण 25%), तर 6 फेब्रुवारी रोजी 11,948 (साधारण 12%) नवीन रुग्णांचे कोविड निदान झाले.

दुसरे उदाहरण मी तुम्हाला इंग्लंडचे देईन. तिथल्या दुसऱ्या लाटेचा अभ्यास करूया. तिथे 6 जानेवारी रोजी 62,208 नवीन कोविड रुग्णांचे निदान झाले. 29 जानेवारी रोजी नवीन रुग्णसंख्या 29,026 (साधारण 47%) झाली. नंतर 9 फेब्रुवारी रोजी नवीन 12,341 ( साधारण 20%) रुग्ण कोविड पॉझिटीव्ह झाले. तर 18 मार्च रोजी 6,291 (साधारण 10%) नवीन कोविड रुग्णांची भर पडली. 27 एप्रिल रोजी 2,685 (साधारण 4%) नवीन रुग्ण वाढले.

या निरीक्षणांवरून असे लक्षात येते की, ही लाट आटोक्‍यात आणण्यासाठी 2 ते 3 महिने लागू शकतात. ही लाट लवकर आटोक्‍यात आणण्यासाठी आपण सर्वजण यथाशक्ती प्रयत्न केले पाहिजेत.

हेही वाचा: पान खाल्ल्यानं कोरोना होत नाही? जाणून घ्या सत्य

पाळूया कडक नियम

सगळ्यात महत्वाचे म्हणजे मास्क घातला पाहिजे. रूमाल, स्कार्फ, साडीचा पदर यांचा वापर बंद करणे. सुपर स्प्रेडर्सना अटकाव करणे. यासाठी लहान मुले, स्त्रिया यांची न भावनिक होता तपासणी करणे. वेगळे राहण्याची व्यवस्था करणे. आजारी रुग्णांचे आयसोलाशन केल्याने आजाराचा प्रसार कमी होतो. नवीन रुग्ण तयार होण्याची शक्‍यता कमी होऊ शकते. फाजील आत्मविश्वास न बाळगणे की, मी खूप स्ट्रॉंग आहे, मला कोविड होणार नाही. तसेच कोविड होऊन बरे झालेल्या लोकांनी नवीन कोविड रुग्ण व त्यांच्या परिवारास मदत करणे. असे आढळत आहे की, री-इन्फेक्‍ट म्हणजे परत कोविड होण्याचा दर हा नगण्य आहे. त्यामुळे कोविड होऊन गेलेल्या तरुण जनतेने स्वयंसेवक म्हणून मदत करावी. तसेच देशाची अर्थव्यवस्था रुळावर आणण्याची जबाबदारी स्वीकारावी.

कोविडबाधितांनी बनावे ढाल

सगळ्यात महत्वाचे कोविड टाळता येतो. तसेच लसीकरण करून कोविडची तीव्रता कमी करता येते. जसे मिळेल तसे व जी लस मिळेल ती घ्यावी आणि कोविड विरोधात लढाईत उभे राहिले पाहिजे. अजून महत्त्वाचे माझे निरीक्षण आहे की, कोविड एकदा झाला की त्याची (नैसर्गिक आजाराची) प्रतिकारशक्ती ही बराच काळ राहते. कारण माझ्या निरीक्षणात अशी खूप क्वचित व्यक्ती आहेत ज्यांना मागील वर्षी कोविड झाला आणि परत या वर्षी झाला. ‘आयसीएमआर'च्या निरीक्षणात असे आढळून आले की, 102 दिवस एखादा रुग्ण कोविड टेस्ट पॉझिटीव्ह येऊ शकतो. याचे कारण असते एक तर मृत विषाणू किंवा अतिशय कमी विषाणू शिल्लक राहणे. त्यामुळे कोविड होऊन बरे झालेले रुग्ण हेच कोविड न झालेल्यांचे संरक्षक बनू शकतात. अशा ‍या व्यक्तींनी पुढे यावे आणि समाजाची ढाल बनावी. आपल्या देशाला आता या महासंकटातून बाहेर पडायचे आहे. चला सर्व जण प्रयत्न करू या आणि ही लाट लवकर संपवू या.

(Some of the reasons behind the onset of the second wave of corona)

Web Title: Some Of The Reasons Behind The Onset Of The Second Wave Of

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Coronavirusviral
go to top