यकीन आ गया...

sonali-navangul
sonali-navangul

शेजारचे कापरेकाका गेलेत नर्मदा परिक्रमेला. तिथून म्हणाले, ‘तुला कदाचित पटणार नाही, पण श्रद्धा आहे म्हणून बहुदा इथे चमत्कारिक अनुभव येतात. सगळ्यांत आधी भावना हीच होते, की आपण फार लहान आहोत निसर्गाच्या या पसाऱ्यापुढे. अगदी शून्य म्हटलं तरी चालेल.’ श्रद्धा असतेच की. एखाद्या नव्या अनुभवाला भिडण्याची, तो कोरून काढण्याची, त्याचे पापुद्रे निरखून पाहण्याची इच्छा भौतिकतेपलीकडे काहीतरी असणार या श्रद्धेपोटीच असते ना! तर श्रद्धेला काही धार्मिकच संदर्भ नसतात. समीर आठवतोय आत्ता. प्रथमच त्याच्या अलिशान ऐसपैस घरी राहणार होते, तेही तो परदेशी असताना. त्याला सारखी काळजी. सतत मेसेज की ‘आहे का आरामात?, मिळतंय का सगळं? बोलताना म्हणाला, मी नसताना तू ‘आपल्या’ घरी असणं मला जास्त आवडतंय. घराचा प्रत्येक कोपरा बघ. वापर. गच्चीत बस. एकीकडून सूर्योदय, एकीकडून सूर्यास्त बघ. वारा खा. निवांत नि आरामशीर राहा. त्याच्या त्या लाख विश्‍वासानं मी हेलावले नि त्या क्षणी ते घर माझं हक्काचं झालं. कपाटाच्या किल्ल्या तशाच, वापरात नसलेल्या खोल्या बंद न करून ठेवलेल्या. माझ्यावरच नव्हे, अनुपस्थितीत घरी कामाला येणाऱ्या ताईंवरही किती विश्‍वास! समीरची चांगुलपणावरची, माणसांना खऱ्या अर्थानं आपलीशी करून घेणारी नि त्यांना दुसऱ्यांच्या बाबतीत हेच करायला प्रवृत्त करणारी अबोल श्रद्धा मला सुखकर नि मन मोठं ठेवण्याच्या व्यायामासारखी वाटली. नर्मदा परिक्रमा इथंच नि अशा माणसांत मी पुरी करू शकते याची एक प्रबळ जाणीव मला हलकं करत गेली.

आणि दरम्यान माझं तब्येतीचं जरा त्रांगडं होऊन बसलं नि तासन्‌तास कमोडवर बसून कपडे नि अंग मन शांत ठेवत, आत्मविश्‍वास खच्ची न होता स्वच्छ करत होते. त्या वेदना नि निःशक्तपणाच्या वेळी देहाची जाणीव जी होत होती, ती निव्वळ सुबक होती. वेदनेच्या प्रहरी वाटतं किती काय सोसतोय हा देह. तापाच्या प्रत्येक गुंगीत अंधुकशा दिसण्या-न दिसण्याच्या उजेडात हा देह, त्याचे सोहळे मला खरोखर झुकवताहेत, विनम्रतेने. गोष्टीत आणखी नवी गोष्ट उजळली. नुकतीच भेटलेली इन्सिया. तिच्या पद्धतीप्रमाणे रिदा नावाचा नक्षीदार अंगभर बुरखा वापरणारी. बुद्धिमान, भावुक, देखणेपणाच्या सर्वसाधारण निकषात अगदीच बसणारी, ऐकत राहावी अशी हिंदी बोलणारी. दोन दिवस आम्ही एकत्र होतो. फार इच्छा होती की तिला बघावं. तिचं असणं डोळ्यांसमोर संपूर्णपणे यावं. म्हटलंही, पण ती संकोचली. मग विषय नाही वाढवला. सकाळी ती अचानक आली, मी बघतच राहिले. उंचनिंच तेजस्वीपण भावलंच, पण मोहरून गेले तिनं माझ्यावर टाकलेल्या विश्‍वासानं, मला दिलेल्या खासगी स्पेसनं ! मुझे अपने होने पे यकीन आ गया...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com