समजुतीपाशी...

sonali navangul
sonali navangul

कधीतरी एकटंच बसावंसं वाटतं. एकटं बसणं म्हणजे उदासवाणं वाटणं नव्हे. काहीतरी गप्पा नि काहीतरी मूकपण असतं स्वत:शीच. हवा तेव्हा, हवा तसा एकांत लाभणं व तो समजून घेणारी माणसं लाभणं हे लोभस चित्र असतं. क्वचित सापडणारं. तर एखाद्या प्रहरी मनाची वेगळीच तार लागलेली असते. मागं घडलेल्या सुख-दु:खाच्या किंवा वेगळ्याच प्रसंगावर आपण टक लावून बसलेलो असतो. अशा वेळी आजूबाजूच्या माणसांच्या अगदी श्‍वासाचाही कोलाहल वाटतो. जे चांगलं-वाईट भोगलं ते रिचवण्यासाठी असा मनुष्यनिर्वात काळ हवासा वाटतो. मात्र त्या वेळी कुठल्याही नात्यातलं, पण कुणीतरी खूप आपलं असणारं आपल्याबाबतीत अगदीच अगतिक होतं. ते वेगवेगळ्या युक्‍त्या करत, आपल्याला सांगतं की ‘मी आहे, अशी एकुटली बसू नको. रडतेहेस? का? रडू नकोस... काय झालं इतकं? सांग मला...’ आपण नकार दर्शवला तर प्रश्‍न नि उद्गार थांबतात, पण घिरट्या चालू राहातात. अशा वेळी राग येतो, हताश वाटतं, रडवेलं व्हायला होतं की काही प्रश्‍नांची उत्तरं शोधतेय. नको नं असं डेस्परेटली प्रूव्ह करू की मी आहे! मला ठाऊक आहे ते. आपल्याला किती काळजी आहे समोरच्याची, केवढालं प्रेम आहे हे सांगण्यासाठीही विशिष्ट वेळ पाळण्याचा संयम नको? आपल्याला वाटतं त्या माणसाला सारखं कशाला सांगायला पाहिजे की माझ्याइतकं कुणीच नाही समजू शकत तुला! - कितीतरी पिंगट नि जांभळेसे काहूर आहे ते सारख्या सोबतीनं हलून जातं. ते नीट अनुभवण्यासाठी हक्काचा एकांत मिळणं इतकं कठीण आहे? काही काळ ठरवून सोबत टाळणं ही अधिक शहाणी सोबत आहे हे का कळत नाही ‘आपल्या’ माणसांना? संदेशला मी म्हटलं, ‘अरे, खूप प्रश्‍न आहेत, एकांतात उत्तरं शोधतेय.’ तर म्हणाला, ‘वेडे उत्तर नाही, समजूत मिळेल तुला. पण तिच्यापाशी विश्‍वासानं राहिलीस तर ती शांत करते!’

‘संहिता’ नावाच्या सिनेमातली राणी जंगलात पक्षी बघायला जाते, तेव्हा दुर्बिणीनं पाहत असताना तिला आपला नवरा कलावंत गायिकेबरोबर रत आहे असं दिसतं. या दृश्‍यानं हादरून ती दुर्बीण बरोबरच्या सचिवांच्या हाती देते. ते ती डोळ्यांना लावतात नि बघतात. इतक्‍यात राणी झर्रकन ती दुर्बीण त्यांच्याकडून काढते नि निघण्याच्या तयारीत म्हणते, ‘असं कुणाच्या एकांतात प्रवेश करणं बरं नाही!’ संदेश म्हणाला ती समजूत या राणीच्या ठायी आढळली. आपल्या प्रेमाचं, काळजीचं, आपुलकीचं नि स्पर्शाचंही अतिक्रमण तर होत नाही ना, आपले मानवी व्यवहार खरे समंजस आहेत ना, याकडे आता नव्या तऱ्हेनं टक लागून राहिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com