स्थिती नि उत्तरं

सोनाली नवांगुळ
Friday, 1 March 2019

सर्जकता म्हणजे काय तर रोज उठून अनिश्‍चिततेची भुई धोपटायची असं एक वाक्‍य पाहिलं. आवडून गेलं. हे वाक्‍य टॉड हेन्री या लेखकाचं नि वक्‍त्याचं, त्याच्याच ‘द ॲक्‍सिडेंटल क्रिएटिव्ह’ या पुस्तकातलं. त्यानं लिहिलेल्या नव्या पुस्तकाची कल्पना व त्याची ही गोष्ट. तर हा टॉड व्यावसायिक कामानिमित्त एका मीटिंगमध्ये बसलेला. तिथल्या डायरेक्‍टरनी सगळ्यांना उद्देशून एक प्रश्‍न विचारला. ‘सगळ्यात श्रीमंत जमीन जगात कुठं आहे?’ - एकानं उत्तर दिलं तेलांच्या विहिरी असणारे गल्फ देश. दुसरा म्हणाला आफ्रिकेतल्या हिऱ्यांच्या खाणी. कुणी काय तर कुणी काय उत्तरं दिली. शेवटी डायरेक्‍टर महाशय म्हणाले, ‘कब्रस्तान.

सर्जकता म्हणजे काय तर रोज उठून अनिश्‍चिततेची भुई धोपटायची असं एक वाक्‍य पाहिलं. आवडून गेलं. हे वाक्‍य टॉड हेन्री या लेखकाचं नि वक्‍त्याचं, त्याच्याच ‘द ॲक्‍सिडेंटल क्रिएटिव्ह’ या पुस्तकातलं. त्यानं लिहिलेल्या नव्या पुस्तकाची कल्पना व त्याची ही गोष्ट. तर हा टॉड व्यावसायिक कामानिमित्त एका मीटिंगमध्ये बसलेला. तिथल्या डायरेक्‍टरनी सगळ्यांना उद्देशून एक प्रश्‍न विचारला. ‘सगळ्यात श्रीमंत जमीन जगात कुठं आहे?’ - एकानं उत्तर दिलं तेलांच्या विहिरी असणारे गल्फ देश. दुसरा म्हणाला आफ्रिकेतल्या हिऱ्यांच्या खाणी. कुणी काय तर कुणी काय उत्तरं दिली. शेवटी डायरेक्‍टर महाशय म्हणाले, ‘कब्रस्तान. तीच सगळ्यांत श्रीमंत जागा. किती लोक कितीतरी बहुमोल अशा कल्पना आपल्या आतच ठेवून इथं शेवटच्या मुक्कामाला आले. त्या कल्पना जर फळल्या असत्या तर समाजाचा फायदा होऊ शकला असता.’ यातून टॉडला उत्साह मिळाला व कल्पनाही. त्यातून नवं पुस्तक लिहिलं त्यानं. पुस्तकाचं नाव ‘डाय एम्टी’. या पुस्तकात त्यानं माणसांमधली, समाजातली सुप्त ऊर्जा झळझळून उठावी व त्यांनी त्यांच्या कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रेरित व्हावं अशा काही गोष्टी लिहिल्यात. तो म्हणतो, ‘तुमच्यातलं जे जे चांगलं आहे, तुम्हाला जे म्हणून करावंसं वाटतं व अंकुर फुटण्याच्या स्थितीत आहे ते प्रत्यक्षात आणा थडग्यापर्यंत पोचण्यापूर्वी. रिकामं मरा. ‘डाय एम्टी’ आपल्या आतलं सर्जन कीटकमुंग्यांचं ताट होऊ देऊ नका.’

हा थोडा चकचकीत प्रेरणेचा वगैरे भाग जाऊदे; पण मृत्यू कधीही झडप घालेल अशा स्थितीत असंख्य मृत्यू बघत, अत्याचार सोसत, युद्धग्रस्त देशातली कौटुंबिक, सामाजिक, राजकीय ताणतणावांची दाहकता झेलत कुणी आपला हुरूप टिकवून ठेवत असेल तर मग धीर सोडायचा हक्कच कुणाला नाही. अलीकडंच वाचलेल्या ‘मरम अल-मसरी : निवडक कविता’नी हा अनुभव दिला. ही सीरियन कवयित्री म्हणते, भोगलं खूप. रडले खूप. निमूटपणानं सहन करण्याशिवाय आपल्या हातात काही नाही. यानं हतबल झाले तेव्हा हिंसा सोसलेल्या माणसांच्या विदारक अवस्थेविषयी सूक्ष्म जाणीव झाली. वाटलं की जगभरात हिंसेनं कितीतरी माणसं खच्ची होतात. त्यांच्याशी संवाद साधायची गरज आहे. - हा संवाद मरम कवितेतून साधते. तिला वाटतं कविता ही आरशासारखी नि निर्विष असते. ‘तिच्या वाट्याला जे जगणं आलं त्यातूनही कवितेपर्यंत येण्याची आच टिकून राहू शकते या जाणीवेनं हादरून गेल्यामुळेच तिच्या कवितांचा अनुवाद केला.’ असं कृष्णा किंबहुने म्हणतात. अनिश्‍चिततेतून पार होण्याच्या प्रवासातून प्रसवतं काय ही बाकी आपलं आपण नीट न्याहाळायची गोष्ट!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sonali navangul write pahatpawal article in editorial