उभारी येतेच...

sonali navangul
sonali navangul

स्वित्झर्लंडमधल्या सुंदरशा ठिकाणी होतो. लूत्सर्न. किती अपार देखणं शहर. तिथं पोचता पोचताच शहारल्यासारखं झालं होतं. लांबून आल्प्सच्या रांगा नि त्यावर साचलेलं बर्फ पाहताना वाटत होतं हे खरं नाहीये, चित्रच आहे. एकदम उत्साहाचं उधाण आल्यासारखं झालं. शहर पर्यटकांनी फुललेलं, तरी गर्दीमुळं येणारी अस्वस्थता जाणवलीच नाही. शिस्तशीर इमारती, वळणं, सिग्नल्स, कॉफीशॉप्स. नीटनेटकं काही बघताना का कोण जाणे मनातल्या उधळलेल्या गोष्टीही ज्या त्या कप्प्यात नीट बसवण्याची हुशारी मनात चढत जाते. तर तसं होता होता एकदमच गाडी त्या सरोवराकाठी थांबली. शहराचं नाव तेच त्या सरोवराचं. तळं म्हणवत नाही. ढगांचे शुभ्र पुंजके तरंगत असलेल्या लख्ख निळ्या आभाळाचं प्रतिबिंब पाचू-हिरव्या पाण्यात दिसत होतंही नि नव्हतंही. त्या पाण्याकडे बघताना वाटत होतं की तसंच लखलखीत नि पारदर्शी होत निघालो तर काय होईल? पारदर्शी होण्याचा पोत किती भरभरीत असेल तर मला झेपेल... मला पाहणाऱ्यांना-ऐकणाऱ्यांना झेपेल? की काही अशी ठिकाणंही असतील जिथं आपल्या त्या नव्हाळीचं प्रतिबिंब पडेल नि एकमेक सुखावून जाऊ!

इकडेतिकडे बघत, खूप रेंगाळत राहाण्याइतका वेळ नव्हता. त्यामुळं मग कायम फोटोत पाहिलेल्या त्या प्रसिद्ध लाकडी पुलावर जाऊन येऊ असं ठरलं. हिरव्यानिळ्या पाण्यातून दुसऱ्या काठापर्यंत गेलेला तो लांबलचक चॅपेल पूल. थोड्या पायऱ्या होत्या त्या चढवल्या, कारण तिथल्या पोर्टेबल लिफ्टची किल्ली कुठं असते, याची चौकशी करण्याइतपत सवड नव्हती. पण चढतानाच पायऱ्यांच्या कोपऱ्याशी एक जिवंत सिगारेट दिसली. मला, उभं राहाणाऱ्या माणसांच्या निम्म्या उंचीत गेल्यामुळं जमिनीवरचं कदाचित जास्त ठसठशीत दिसतं. मित्राला म्हटलं, ‘ती सिगारेट विझव रे.’ त्यानं ते केलं नि आम्ही वर चढलो. छतावरच्या निमुळत्या भागात त्रिकोणी जागेत या शहराचा इतिहास सांगणारी सतराव्या शतकातली चित्रं होती. काही ठिकाणी नव्हती. त्याचं कारण तिथंच एका जागी लिहिलेलं दिसलं. -आगीच्या भक्ष्यस्थानी पडून या पुलाचा व त्यातील चित्रांचा काही भाग जळून खाक झाल्यामुळं ‘अमुक’ भाग नव्यानं पूर्वीसारखा लाकडात बांधून इतिहासाचं प्रतिबिंब शक्‍यतो जसंच्या तसं जतन करण्यात आलेलं आहे! हा पूल १३३३ मध्ये बांधलेला. १९९३ मध्ये निष्काळजीपणे टाकलेल्या सिगारेटच्या थोटकानं कितीतरी काळजीनं नि प्रेमानं जपून ठेवलेल्या शहराच्या वैभवाला नि मानबिंदूला काही क्षणात नाहीसं केलं. आजूबाजूला शांत देखणा निसर्ग मढवून आजही हा पूल तसाच सुंदर दिसतो नि आजही एखादं निष्काळजीपणानं टाकलेलं थोटूक तिथं भिरकावलं जातंय. पण तरी ते आजच्याच कुणाकुणाला दिसतं नि काहीही घातपात होण्याआधी विझवलं जातं, यानं उभारी येतेच!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com