गजानन महाराजांचा प्रकट दिनाचा प्रसाद

संत गजानन महाराज प्रकट झाले त्यापूर्वीचे या महापुरुषाचे चरित्र, त्यांचा ठावठिकाणा आणि त्यांचा पूर्वेतिहास कोणालाच माहीत नव्हता.
Gajanan Maharaj
Gajanan Maharajsakal

- जसू पंजवानी, पुणे

संत गजानन महाराज यांचा आज (माघ वद्य सप्तमी) प्रकट दिन. त्यानिमित्त विशेष लेख...

संत गजानन महाराज प्रकट झाले त्यापूर्वीचे या महापुरुषाचे चरित्र, त्यांचा ठावठिकाणा आणि त्यांचा पूर्वेतिहास कोणालाच माहीत नव्हता. असो... तर या तेजमान हिऱ्याची खाण कोणती, याचा विचार करण्याची मुळीच गरज नाही. ईश्वरस्वरूप असा ‘योगज्ञानी’ महाराजांच्या स्वरूपात पाहायला मिळत होता.

महाराजांच्या प्रकटीकरणाने आर्त, जिज्ञासू साधक अथवा सिद्ध अवस्थेप्रत पोहोचण्याच्या अवस्थेत असलेल्या सर्व पातळीच्या भक्तांसाठी ईश्वर साक्षात्काराचा मार्ग अधिक स्पष्ट, खुला झाला. त्या वाटचालीला मार्गदर्शक आणि ‘हात देणारा सांगाती’ मिळाला.

हा दिवस होता शनिवार, माघ वद्य सप्तमी शके १८०० म्हणजे २३ फेब्रुवारी १८२८. लोकांची धारणा आहे, की सज्जनगडावरून समर्थ रामदास स्वामींनी महाराजांच्या रूपाने लोकोद्धारासाठी अवतार धारण केला. महाराजांच्या जीवनप्रसंगामध्ये त्यांनी भक्तांना समर्थ रूपात दर्शन दिल्याचे अनेक प्रसंग आहेत.

हा ‘प्रगाढ ज्ञानी’ आणि शुद्ध ज्ञानाची प्रत्यक्ष मूर्तीच होती. त्यांची इतकी पूर्ण योगाची अवस्था कोणाला कशी कळली नाही आणि का?... याची उत्तरे माहीत नाहीत. यथेच्छेने म्हणा किंवा त्यांच्या इच्छेने म्हणा... त्यांना ‘शेगावी’च प्रकट व्हायचे होते. महाराज त्यांच्या योगज्ञानासह, ब्रह्मज्ञानासह प्रकट झाले. महाराजांचे शब्द केवळ शब्द नसून ब्रह्मज्ञानच शब्दरूपाने प्रकट होत असे.

ते स्वतः ब्रह्मरूप झालेले असल्यामुळे त्यांचे कर्म ब्रह्मरूपातच होऊन जाते. पहिल्या प्रकटीकरणाच्या प्रसंगात ते स्थित व योगज्ञानाच्या मूर्ती स्वरूपात दिसले. ते जीवनात सर्वच प्रसंगांत तसेच दिसतात. त्यांना मधमाश्‍या चावतात तो प्रसंग, त्यांना प्रत्यक्ष उसाने मारले जाते तो प्रसंग, जळत्या पलंगावर शांत बसण्याचा प्रसंग, नर्मदेत नाव बुडू लागली तेव्हा ते स्थिर असतात तो प्रसंग.

या सर्व प्रसंगांतून त्यांचा योगज्ञानाच्या परिपूर्ततेची आणि नित्यत्वाची परीक्षा व्यवहारात होऊन गेली. जाणकार आणि सर्व साधक सर्वच त्याने स्तिमित व प्रभावित होऊन गेले. ज्ञानी पुरुष स्वतः ‘ब्रह्मरूप’ झालेला असल्यामुळे त्याचे कर्म ‘ब्रह्मरूपा’त होतात. पहिल्या दर्शनात शिते वेचून मुखात घालत असलेले महाराज पाहून बंकटलाल आणि दामोदरपंत यांना यात काहीतरी विशेष असल्याचे जाणवले.

कारण नकळत ते ज्ञानी पुरुषाचे ब्रह्मकार्य पाहत होते. महाराज पवित्र ‘ईश्वर स्वरूप’ आहेत. भक्तांनी महाराजांचे स्मरण करून काही गोष्टी नित्यनेमाने पाळल्या तर त्यांची पारमार्थिक पातळी निश्चितच उंचावेल. त्यापैकी पहिली गोष्ट अन्नाकडे उपयोग भावनेने पाहू नका. प्रसाद भावनेने ते ग्रहण करा. ते ब्रह्मरूप आहे हे नेहमी लक्षात ठेवा. अन्न म्हणजे ज्ञान आणि पाणी म्हणजे ज्ञानरूपी अन्न जिरायला भक्तीचे पाणी हवे.

महाराज म्हणतात, ‘नुसतं व्यवहारात घुटमळत राहू नका. त्यातून मन थोडेसे बाजूला घेत देवात लावा आणि त्याला जाणून घ्या. चिंतन, मनन करा, स्थिर राहा हा संदेश मनात रुजू द्या. अन्नाची निंदा किंवा अवहेलना कदापि करू नका. अन्न कुठेही ग्रहण करताना पहिला घास ईश्वर स्मरण करून घ्यावा.’

‘जिवात्मा अन्न’ हे पूर्णब्रह्म ही समर्थांची शब्दांतून शिकवण आहे. तेच प्रसंग महाराजांनी पत्रावळीवरची शिते वेचून मुखी घालत होते. ही निःशब्द कृतीतून शिकवण आहे. कोणत्याही प्रसंगी अवस्था किंवा काम-क्रोधादी विकार नसणे तसेच स्थिर राहण्याचा प्रयत्न हे साधक भक्तीचे लक्षण आहे.

महाराजांमधील ‘ज्ञान’ लक्षण पाहून आणि स्वतःमध्ये साधक लक्षत्व बाळगण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. आपण ईश्वराशी अंतरात्म्याशी मन जोडून स्थिर राहायला हवे. त्यासाठी नाम-मंत्र, महाराजांचे स्मरण आणि त्यांची स्थिर मुद्रा आपल्याला स्थिरतेचे सामर्थ्य नक्की देईल.

गजानन महाराज म्हणतात, ‘माणूस आजूबाजूला चाललेल्या गोष्टी, त्यातील सर्वसामान्य ज्ञान, त्यातील ऐहिक संबंध, आकर्षण यातच रमून जातो. त्या ऐहिक व्यवहारात माणसाचे मन गोवलेले राहील. हे विश्व परमात्म्यापासून निर्माण झाले, याचा विचार करा. पर्यायाने या मानवजन्मात ईश्वराची लीला उमजू शकेल. सरतेशेवटी माणूस देवाची प्राप्ती करून धन्य होऊ शकतो, यात तिळमात्र शंका नाही.’

‘गण-गण-गणांत-बोते’

(लेखक स्थापत्य अभियंते आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com