लढा भयमुक्तीचा आणि प्रतिकार शक्ती वाढविण्याचा... 

लढा भयमुक्तीचा आणि प्रतिकार शक्ती वाढविण्याचा... 

कोरोना विषाणू आणि त्यापासून होणाऱ्या आजारानं सगळी जगरहाटी बदलून टाकली आहे. भारतात लॉकडाउन हा त्यावरचा महत्त्वाचा उपाय ठरवला गेला. देशातील २१ दिवसांची कुलूपबंदी संपताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यात आणखी १९ दिवसांची भर टाकण्याची घोषणा केली. कोरोनाचा प्रसार होऊ नये हे त्यामागचं सूत्र आहे. लोकांच्या जीवनाची अधिकची काळजी घेतली पाहिजे, त्यासाठी आर्थिक नुकसान दुर्लक्षित केलं पाहिजे, असा हा सूर आहे. खरंतर या दोन्हींत काही मेळ साधता येणारी धोरणं ठरली पाहिजेत. पण त्या पलीकडं, ‘लॉकडाउन २.०’ जाहीर होताना देशात कोरोनाविषयी भयाचं वातावरण आहे. हे वातावरणच कोरोनाची बाधा झालेल्यास जवळपास सामजिक बहिष्कारापर्यंत घेऊन जातं. हेच वातावरण या संकटाशी झुंजणाऱ्या डॉक्‍टर आणि अन्य निमवैद्यकीय सेवा देणाऱ्यांपासून ते कामगारांपर्यंत साऱ्यांना चिंताक्रांत बनवतं. तेव्हा लॉकडाउनची मात्रा टप्प्याटप्प्यानं कमी करण्याचा आग्रह धरतानाच भय संपवणारी मात्रा संपूर्ण समजाला देण्याची गरज आहे. 

न संपलेल्या कोरोनाचे भविष्यातलं आव्हान 
एकतर स्पष्ट आहे की लॉकडाउन उपयुक्त ठरतं. मात्र ते कितीही काटेकोरपणे पाळलं तरी कोरोनाचं संकट पूर्णतः संपत नाही, यावर जागतिक आरोग्य संघटनेपासून अनेक तज्ज्ञांनी शिक्कामोर्तब केलं आहे. प्रसाराची गती कमी करण्यासाठी ही कडेकोट व्यवस्था, बंदी उपयोगाची ठरते. मात्र त्यातून कोरोनामुक्तीची हमी नाही. दुसरीकडं जगभरात धुमाकूळ घालणारा हा विषाणू पुढचे १८ महिने तरी अस्तित्व दाखवत राहील हेही जाणकार मान्य करतात. साथीचा फेरा संपल्यानंतर हे प्रकरण पुन्हा पुन्हा उद्‍भवू शकतं, याचे इशारे दिले गेले आहेत. जो चीन साथीतून बाहेर पडल्याचे दावे केले जातात, तिथंही नव्यानं कोरोनाबाधितांची प्रकरणं समोर येतच आहेत. या स्थितीत जोवर एक बाधितही शिल्लक राहात नाही तोवर बंधन ठेवण्याचं धोरण दीर्घकाळ चालवता येणं कठीण आहे. म्हणजेच जेव्हा केव्हा केंद्र सरकार आणि राज्य सरकार लॉकडाउन मागं घेतील किंवा त्यात सवलती देत काही व्यवहार सुरू करायला लागतील, तेव्हा हे व्यवहार सुरू करण्यासाठी जे कोणी बाहेर पडतील, त्यांच्यापुढं संपूर्णतः न संपलेल्या कोरोनाचं आव्हान असेलच. 

आत्मविश्‍वास, मनाची तयारी हवी 
इथं मुद्दा असतो तो अशी कामं सुरू राहण्यासाठी जे कोणी आताच्या आव्हानात्मक परिस्थितीतही काम करताहेत त्यांच्यात विश्‍वास तयार करण्याचा. हा विश्‍वास कोरोनाची सर्वांगिण माहिती देण्यातून येऊ शकतो तसाच कोरोनाचा विषाणू तुमच्यातील रोगप्रतिकार शक्तीनं मान टाकली तरच तापदायक ठरतो अन्यथा तीव्र सर्दीइतकाच त्याचाही परीणाम असू शकतो, हे समजावण्यातूनही तयार होऊ शकतो. म्हणजेच कोरोनाची काळजी घेणं समजू शकतं. त्यासाठी वैयक्तिक स्वच्छतेपासून ते सामाजिक अंतर ठेवण्याच्या निकषांपर्यंतचा अंमलही समजण्यासारखा आहे. मात्र, आधी माणसाला मग अर्थव्यवस्थेला आणि समाजस्वास्थायला पोखरणारी भीती अनाठायी आहे. दुसरा लॉकडाउन अंमलात येत असताना भीतीचा सामना हे सर्वात मोठं आव्हान आहे. भीती अनेकदा अज्ञानातून जन्मते, चुकीच्या माहितीच्या माऱ्यातून तयार होते यावरचं नियंत्रण हा एक मार्ग. दुसरीकडं कोरोना हे पुढचं दीड वर्षे आपल्या भवतालचं वास्तव असेल तर या विषाणूचा परिणाम होऊ न देण्याइतपत प्रतिकारशक्ती वाढवणं हा रास्त मार्ग ठरतो. कोणत्याही विषाणूचा शरीरावर हल्ला होतो तेव्हा शरीर तो परतवून लावण्यासाठी अंतर्गत यंत्रणा कार्यरत करते. बहुतांश वेळा तंदुरुस्त शरीर अशा हल्ल्यांना परतवून लावते. जिथं या परतवून लावण्याच्या क्षमतेपेक्षा हल्ल्याची तीव्रता वाढते तिथं धोका तयार होतो. कोरोनासंदर्भात हेच लागू पडतं. म्हणून कोरोनाचा विषाणू आपल्यापर्यंत पोचू नये याची जमेल तितकी काळजी घेण्यासोबत पोचलाच तर आपलं शरीर पुरेसं सक्षम ठेवणं आणि मानसिकता खंबीर ठेवणं याचं मोल दुर्लक्ष करण्यासारखं नाही किंबहुना अशा कोणत्याही अज्ञाताविरोधातील लढ्यात आत्मविश्‍वास आणि मनाची तयारी हा महत्त्वाचा घटक असतो. 

शरीर, मन स्वस्थ ठेवण्यासाठी... 
रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं हा मार्ग असेल तर, कोरोनावरील संभाव्य लशीबद्दल जितकं लिहिलं बोललं जातं तितकचं या विषयावरही लक्ष द्यायला हवं. सध्या सुरू असलेल्या संशोधनातून लस येईल तेव्हा येईल, तोवर प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी जे काही उपलब्ध उपाय आहेत, त्याचा वापर करण्यात गैर काही नाही. इथं प्रत्येक देशतीाल पारंपरिक उपचार पद्धतीची उपयुक्तता असू शकते. चीनमध्ये साथीत आणि त्यातून बाहेर पडत असतानाही पारंपरिक चिनी औषध योजनेचा, काही अनुभवसिद्ध उपायांचा वापर केला जातो आहे. तो कोरोनावरील उपायापेक्षा त्याला सक्षमतेनं तोंड देण्याचा भाग आहे. सातत्यानं गरम पाणी पित राहावं, हा यातलाच एक उपाय. त्यानं ‘कोविड१९’ बरा होतो का? प्रश्‍न फिजूल आहे. त्यानं शारीरिक क्षमता वाढत असेल तर, तेही आवश्‍यकच आहे. भारतात इथल्या वातावरणाशी जोडलेल्या जीवनशैलीस पूरक अशी औषधयोजना सांगणारं तंत्र उपलब्ध आहेच. आयुर्वेदासारख्या उपचार पद्धतीत आपल्या भवताली असणाऱ्या किंबहुना घरीच उपलब्ध असलेल्या अनेक पदार्थांचा वापर प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी केला जातो. भारतीयांच्या रोजच्या खाण्यातील पदार्थांचा वापर करून हे साध्य करण्याचं तंत्र आयुर्वेद सांगतो. होमिओपॅथीतही अशी औषधयोजना सांगितली जाते. ध्यान, योग यासारख्या मार्गांचाही अशा संकटात शरीर आणि मन स्वस्थ ठेवण्यात उपयोग होऊ शकतो. 

निसर्गस्नेही जगण्याकडे वळा... 
आता यावर कोणी यातील कशाचा कोरोनाविरोधात उपयोग झाल्याचं सिद्ध झालं आहे का? अशा प्रश्‍न करू शकतो. इथं मुद्दा कोरोनाविरोधातील अंतिम औषधाचा नाही तर, त्याविरोधात लढण्यासाठीचा आत्मविश्‍वास तयार करण्याचा आहे. कोरोनाविरोधात ज्याला आधुनिक वैद्यकशास्त्र म्हटलं जातं त्या ॲलोपॅथीनंही अजून काही ठोस उपचार सिद्ध केलेला नाही. उपलब्ध औषधांचाच वापर सुरू आहे. किमान प्रतिकार शक्ती वाढविण्याच्या आघाडीवर हेच सूत्र पारंपरिक उपचार पद्धतींसाठीही लागू पडतं. मुद्दा लोकांमधील भय कमी करण्याचा आहे. ते यातून होत असेल तरी सध्या त्याची मोठीच गरज आहे. कोरोनाविरोधातील लढाईत भयाचा समाना करणं ही मोठीच आघाडी आहे. अन्यथा लॉकडाउन संपलं तरी विषाणूचं भय कायम असेल. ते कित्येकांना बाहेर पडताना साशंक बनवू शकतं. ही साशंकता झटकण्याचा मार्ग संसर्ग होणार नाही याची पुरेशी काळजी घेण्यासोबतच प्रतिकार शक्ती वाढवणं आणि आपण मुकाबला करण्यासाठी खंबीर आहोत, अशी मानसिकता तयार करणं हा असू शकतो. कोरोनाशी लढताना आणि कोरोनानंतरच्या जगरहाटीत या पर्यायांचा विचारही करावा लागेल या साथीनं एक वळण जगासमोर नक्कीच आणलं आहे, ज्यात आजवर विकासाच्या नावाखाली निसर्गाचा जो काही विध्वंस झाला तो तसाच सुरू ठेवायाचा की अधिक निसर्गपूरक जगण्याकडं वळायचं. कोरोनानं जगाला एक धक्का दिला आहे. तो शक्‍य तितकं निसर्गस्नेही जगण्याकडं वळा असं सांगणाराही आहे. हे ध्यानात घेता व्याधीच्या भयापासून दूर जाण्यासाठी प्रतिकार शक्तीचं संवर्धन महत्वाचं बनतं. सरकारनं लॉकडाऊन तीन मे पर्यंत सुरू ठेवायचं ठरवलं आहे. देशातील विविध भागांचं निरिक्षण २० एप्रिलपर्यंत करून काही सवलतींचा विचार होऊ शकतो, असं सूतोवाचही पंतप्रधांनाच्या निवेदनात होतं. म्हणजेच व्यवहार सुरू करण्याची अनिवार्यता स्पष्टपणे पुढं आली आहे. ते सुरू होताना लोक अधिकाधिक चिंतामुक्त राहतील, असं वातावरण तयार करणं ही आवश्‍यकता बनते. याचा भाग म्हणून लॉकडाउन संपेपर्यंतच्या काळात एक मोहीम राबविल्यासारखा भयमुक्तीचा आणि प्रतिकारशक्ती वाढविण्याचा जागर करायला हवा. 

चला तर आपल्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी आणि समाजासाठीही अशी पूर्वतयारी करायला लागूया. अर्थातच ‘सकाळ’ यात तुमच्या साथीला असेलच. आम्ही हा भयमुक्तीचा जागर आणि त्यासाठीच्या तज्ज्ञ मांडत असलेल्या उपाययोजना सातत्यानं देत राहू. त्याचा अवश्‍य विचार करा. 

कोरोनाविरोधी लढ्यात... 
- लशीइतकंच रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यावरही लक्ष द्यायला हवं. 
- व्याधीच्या भयापासून, चिंतेपासून मुक्तीसाठी प्रतिकार शक्तीचं संवर्धन महत्त्वाचं आहे. 
- कोरोनाविरोधातील औषधाइतकीच त्याविरोधात लढण्यासाठीच्या आत्मविश्‍वासाची गरज आहे. 
- भयमुक्ती आणि प्रतिकारशक्ती वाढविणे यासाठी जागर झाला पाहिजे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com