राजपक्ष कुटुंबावर परतफेडीची वेळ?

हजारो सामान्य श्रीलंकन नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केल्यामुळे राजपक्ष कुटुंबाला संवैधानिक पदावरून पायउतार होणे आणि आपल्या घरातून पळून जाणे भाग पडले.
Sri Lanka economy collapse Rajapaksa family left their constitutional position and flee their homes
Sri Lanka economy collapse Rajapaksa family left their constitutional position and flee their homes sakal
Summary

हजारो सामान्य श्रीलंकन नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केल्यामुळे राजपक्ष कुटुंबाला संवैधानिक पदावरून पायउतार होणे आणि आपल्या घरातून पळून जाणे भाग पडले.

परागंदा झालेले तमिळ आणि कथित युद्धगुन्ह्यातील व नरसंहारातील पीडितांच्या कुटुंबीयांनी राजपक्ष कुटुंबाला खटला चालवण्याची विनंती केली आहे. श्रीलंकेची अर्थव्यवस्था कोसळल्यामुळे एकेकाळचा शक्तिशाली आणि कलंकित राजपक्ष परिवारही कोसळला आहे. हजारो सामान्य श्रीलंकन नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केल्यामुळे राजपक्ष कुटुंबाला संवैधानिक पदावरून पायउतार होणे आणि आपल्या घरातून पळून जाणे भाग पडले. एवढेच नव्हे, तर त्यांची भव्यदिव्य घरे आणि महालांची संतप्त जमावाकडून तोडफोड करण्यात आली.

आंदोलकांनी राष्ट्राध्यक्षाचा महाल ताब्यात घेतल्यानंतर राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्ष यांनी आश्रयासाठी अनेक शेजारी देशांची दारे ठोठावली, असे म्हणतात. त्यांना या आठवड्यात मुस्लिमबहुल मालदीवमध्ये आश्रय मिळाला. विरोधाभास म्हणजे त्यांच्या पक्षाने देशात मुस्लिमांविषयी भीती पसरवण्याचे काम केले. तसेच, मुस्लिमांना आश्वस्त करण्यासाठी त्यांच्या सरकारने काहीही केले नाही. त्यानंतर ते सिंगापूरला गेले आणि मध्य पूर्वेतील देशांत ते आश्रय शोधत असल्याचे सांगितले जात आहे.

गोटाबाया यांचे बंधू महिंदा राजपक्ष निष्ठावान श्रीलंकन सैन्याच्या संरक्षणाखाली देशातच तळ ठोकून आहेत. त्यांचे दुसरे बंधू माजी अर्थमंत्री बासिल राजपक्ष यांना कोलंबोच्या विमानतळावर अडवण्याचा अयशस्वी प्रयत्न झाल्यानंतर ते आपल्या कुटुंबासह श्रीलंकेतून बाहेर पडले आहेत. ते अमेरिकेत गेल्याचे सांगितले जाते. तिसरे बंधू चमल राजपक्ष आणि महिंदा यांचे पुत्र निमल अद्यापही लष्कराच्या संरक्षणाखाली श्रीलंकेतच आहेत.

आपल्या विरोधक आणि टीकाकारांबाबत राजपक्ष कुटुंब क्षमाशील नसल्याबद्दल आणि क्रूर असल्याबद्दल ओळखले जाते. तसेच, मोठ्या प्रमाणातील भ्रष्टाचार आहेच. याशिवाय मे २००९ मध्ये तीन दशके सुरू असलेल्या नागरी युद्धाच्या शेवटी तमीळ नागरिकांचा नरसंहार करणे, युद्धगुन्हा, मानवी हक्कांचे उल्लंघन केल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे. त्यांनी सिंहली पत्रकार आणि टीकाकारांनाही सोडले नाही. त्यातील अनेकांचे पांढऱ्या रंगाच्या व्हॅनमधून अपहरण झाले, त्यानंतर ते कधीच दिसले नाहीत. मानवी हक्क कार्यकर्त्यांचा असा विश्वास आहे, की या पांढऱ्या व्हॅन सरकारी संस्थांकडून नियंत्रित केल्या जातात आणि राजपक्षंच्या आदेशानुसार चालतात.

संयुक्त राष्ट्रे आणि आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्थांनी दिलेल्या आकडेवारीनुसार गृहयुद्धात ४० हजार ते एक लाख तमीळ नागरिकांचा संहार केला गेला. प्राध्यापक, पत्रकार आणि कार्यकर्ते यांसारख्या सिव्हिल सोसायटी सदस्यांची हत्या किंवा ते गायब होण्याची संख्या शेकडोवर आहे. हे सगळे सरकारच्या संस्थांकडून गुप्तरीत्या केले गेले, असे म्हटले जाते. यात सिंहली आणि तमीळ भाषकांसह सर्वधर्मीय लोकांचा समावेश आहे. या कथित अत्याचार, गुन्हे आणि नरसंहाराला बळी पडलेल्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्यांनी अलीकडच्या घटना चिकित्सकपणे पाहिल्या आहेत.

देशातील सर्व घटनांचा निष्पक्ष तपास व्हावा, ही आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत मागणी रोखण्यासाठी बलाढ्य राजपक्ष कुटुंब गेल्या तेरा वर्षांपासून सरकारी यंत्रणांचा आणि आपल्या राजकीय सत्तेचा वापर करत आहे. युद्ध गुन्हेगार असलेल्या आणि मानवी हक्कांचे उल्लंघन केल्याचा आरोप असणाऱ्या अनेक लष्करी अधिकाऱ्यांना त्यांनी पदोन्नती दिली आणि निवृत्तीनंतर त्यांना राजनितिज्ञ (diplomat) बनवले. युद्धसमाप्तीचा वर्धापनदिन त्यांनी दर वर्षी विजयी परेडसह थाटामाटात साजरा केला. या वेळी आपल्या जवळच्या नातेवाईकांना न्याय मिळवून देण्याच्या लोकांच्या भावनांचा त्यांनी विचार केला नाही. अतिशय निर्ढावलेपणाने त्यांनी हे सर्व केले.

पण, आता राजपक्ष सरकार पडल्यानंतर २००९च्या युद्धगुन्ह्यांची, मानवी हक्क उल्लंघनाची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी श्रीलंकेतून आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापक समर्थन मिळेल, अशी आशा आहे. श्रीलंकन जनतेकडून गोटाबाया राजपक्षे यांच्या अटकेची आणि त्यांची खाती व पासपोर्ट गोठवण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे चौकशी होण्याची आशा निर्माण झाली आहे. त्यामुळे राजपक्ष कुटुंबाला त्यांच्या कर्माची परतफेड करण्याची वेळ आली आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

राजपक्ष सरकार पडल्यानंतर २००९च्या युद्ध गुन्ह्यांची, मानवी हक्क उल्लंघनाची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी श्रीलंकेतून आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापक समर्थन मिळेल, अशी आशा आहे. त्यामुळे राजपक्ष कुटुंबाला त्यांच्या कर्माची परतफेड करण्याची वेळ आली आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

- राजेश सुंदराम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com