शिवसूत्र आणि पवित्रतेची लक्षणे

श्री श्री रविशंकर  प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंग
शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020

जीवनाचा एक गुणधर्म हा आहे, की जिथून प्रारंभ झाला, तिथंच समाप्ती व्हावी आणि आयुष्य हे असं चक्र आहे, ज्याचा आरंभ प्रसन्नतेनं होतो ‘आनंदेना जतनी जिवंती.’ उपनिषदात सांगितलं आहे, की आयुष्याची सुरुवात आनंदानं होते आणि त्याची पूर्तताही आनंदातच असते.

शिवसूत्र : सूत्र म्हणजे धागा आणि शिव म्हणजे जे पवित्र आहे ते. प्रत्येकाच्या जीवनात काहीना काही शुभ असतंच. आपल्या भोवताली घडणाऱ्या अनेक नकारात्मक गोष्टींमधून एक सकारात्मक बाब निवडा आणि त्याला धरून रहा. कुणी खोल विहिरीत पडला तर तुम्ही काय करता? तुम्ही त्याच्याकडे दोर फेकता आणि दोर पकडून तो वर येतो. तुम्ही त्याला वर ओढून घेता. शिवसूत्र नेमकं हेच करतं. ही सारी एकेक ओळीची सूत्रं आहेत, जी तुम्हाला जाणीव करून देतात की तुमचा मूळ स्वभाव हा ‘स्वात्मानंदा प्रकाशा वपुसे.’ तुमचा मूळ स्वभाव परमानंदाचा, आनंदाचा, प्रकाशाचा आहे. म्हणूनच असं म्हटलं जातं, की ‘नमः श्री संभवे स्वात्मानंदा प्रकाशा वपुसे.’ शांती प्रदान करणाऱ्या आणि आनंदित करणाऱ्या संपदेला मी साष्टांग नमस्कार करतो. या शुभदायकतेचा प्रारंभ कसा होतो? मन अंतर्मुख होतं तेव्हा हे घडू लागतं. मन बहिर्मुख असतं, तेव्हा ते विविध समस्यांत आणि संदेहात अडकून पडतं. दुःख म्हणजे काय हे तुम्हाला माहित आहे काय? मन बाह्यजगतात अडकून पडतं आणि स्वतःला विसरतं, त्याला दुःख म्हणतात. स्वतःलाच स्वतःची जाणीव करून देणं म्हणजे आनंद असं म्हणता येईल. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

समजा जवळचा नातेवाईक किंवा मित्र तुमच्या भेटीला येणार आहे. त्यांच्या स्वागतासाठी तुम्ही मिठाई तयार ठेवता, सारी जय्यत तयारी करता आणि त्यांना आणण्यासाठी स्टेशनवर पोचता. त्यांची उत्सुकतेनं वाट बघता, ट्रेन  वेळेत येणार आहे ना की ते पोचले याची खात्री करून घेता. आणि सरतेशेवटी त्यांची भेट होते तेव्हा तुम्हाला कसं वाटतं? रोमांचित होता ना! मन कसं लगेच प्रफुल्लित होऊन जातं. जिथे उत्सुकता किंवा दाद नसते, तिथं प्रेमाची कमतरता असते. ज्याबद्दल तुम्हाला आत्मीयता आहे, प्रेम आहे, तिकडं मन सहजपणे धाव घेतं. तुम्ही आपल्या प्रियतम मित्रासोबत असता, तेव्हा तुमचं मन अगदी तुमच्यासोबत असतं. तेव्हा ते इतर कुठंही भटकत नाही. तुम्ही खूप आनंदी असता, तेव्हा स्वतःसोबत एकरूप असता याचा अनुभव घेतला असेलच. तुमचा मूळ स्वभाव आनंदी आहे आणि हेच कारण आहे की तुम्ही त्या आनंदाचा अनुभव घेता. तुम्ही मन हा शब्द उलटा वाचा, तो नम होईल. याचा अर्थ काय? जेव्हा मन आत वळतं, अंतर्मुख होतं, तेव्हा ते ‘नमः’ होतं आणि बहिर्मुख होत असतं ते ‘मन’. तुम्ही मंदिरात प्रवेश करता, तेव्हा तुम्ही ‘नमः’ म्हणता आणि मन आपोआप अंतर्मुख होऊ लागतं. 

दुःखाचं मूळ कारण काय?
मनाचं बाहेरच्या दिशेनं लक्ष कोण वेधून घेतं? ते आहे वैभव, धनसंपदा, यश आणि सौंदर्य. कोणतंही सुंदर दृश्‍य मनाला तिकडे वळायला भाग पाडतं. सारं जग केवळ एकाच गोष्टीभोवती गिरक्‍या घेतंय, ते म्हणजे ‘श्री’, म्हणजेच वैभव, ऐश्वर्य. तुम्हाला ज्ञानाची लालसा असते, सुखाची असते, सौंदर्य, धन, यश, प्रगती- ज्या कशाची आसक्ती असते ती म्हणजे ‘श्री’. मात्र, लोक जेवढ्या तीव्रतेनं त्याची आसक्ती करतात, तेवढीच ती प्राप्त होणं दुष्कर होतं आणि लोक तेवढेच जास्त दुःखी होतात. म्हणूनच भगवान गौतम बुद्धांनी अगदी थोडक्‍यात सांगितलं, ‘आसक्ती हेच दुःखाचं मूळ कारण आहे.’ तुम्ही अगदी कुठंही जा आणि बघा, लोक कशाबद्दल बोलत आहेत ते आणि तुम्हाला आढळून येईल की सारेकाही ‘श्री’बद्दलच आहे. 

सारं जग तर या ‘श्री’ भोवतीच फिरतंय, पण हे मिळवायचं कसं? आणि ते मिळालं, तरी कोण असं म्हणणार की एवढं मला पुरेसं आहे. खरंच कुणाला ‘श्री’ प्राप्त करायचं आहे, तर त्याचं मन अंतर्मुख व्हायला हवं. आपण नमःच्या अवस्थेत असतो, जेव्हा आपण अंतर्मुख असतो, तेव्हा आपल्याला ’श्री’ गवसते आणि खरी संपदा जन्माला येते. खरी संपत्ती म्हणजे आपण आपल्या ‘स्व’मध्ये असणं आणि आपण अंतर्मुख होतो, तेव्हा खऱ्या सुखापर्यंत आणि आनंदापर्यंत पोहोचू शकतो. अगदी गर्भश्रीमंत व्यक्ती बाह्यतः स्मित करताना दिसेल, पण त्याच्या अंतरंगात डोकावून बघा, तुम्हाला ती प्रसन्नता आणि तृप्ती आढळणार नाही. समाधान नसेल तर अशा आयुष्याचा आणि संपत्तीचा उपयोग तरी काय? ते चिंतेनं व्यापलं असेल आणि ती व्यक्ती चिंतेने ग्रस्त होत मरणार असेल तर ही कसल्या प्रकारची ‘श्री’ आहे? 

’संभवे’ - धन आणि भरभराटीनं शांती लाभायला हवी. तथापि, एखाद्याला खूप संपत्ती मिळाली की त्यासोबत कटकटीही येतात. आई-वडील आणि मुलांमध्ये, तसेच नवरा- बायकोत भांडणे सुरू होतात. न्यायालयात रखडलेले खटले बघितले तर ते बहुतांशी पैशाच्या वादावरून उद्‌भवलेले आढळतील. आपल्याला खूप पैसा मिळवायचा असेल तरी त्यात काय अर्थ आहे? इतकी संपत्ती हवी असेल तर सोबतीला पोटदुखी, अल्सर, मधुमेह, हृदयविकार असे आजारही येतात.

जीवनाचं ध्येय 
‘स्वात्मानंदा’ - परमानंदानं व्यापलेली मनाची प्रसन्नचित्त अशी अवस्था. काही असे लोक आहेत जे खूप चांगलं कर्म करतात, पण त्यांच्या जीवनात शांती नसते, आनंद नसतो. पण तुम्ही मुलांकडे बघा. ती खूप गंभीर नसतात, ती आनंदी असतात. त्यांचा हा कोणत्या प्रकारचा आनंद असतो? ‘स्वात्मानंदा प्रकाश वपुसे’ - त्यांच्यात आनंद भरभरून वाहत असतो. ते अशा आनंदलहरी प्रसारित करीत असतात. मुलाचं मन पूर्ण सजगतेसह निरागस आणि शांत असतं. हेच जीवनाचं ध्येय आहे. आपल्या जीवनाचा एक गुणधर्म हा आहे की जिथून प्रारंभ झाला तिथंच समाप्ती व्हावी आणि आयुष्य हे असं चक्र आहे, ज्याचा आरंभ प्रसन्नतेनं होतो. ‘आनंदेना जतनी जिवंती.’ उपनिषदात सांगितलं आहे, की आयुष्याची सुरुवात आनंदानं होते आणि त्याची पूर्तताही आनंदातच असते. आत्मा हा आनंदानं भरून असायला हवा - शिवसूत्राचं हेच उद्दिष्ट आहे : स्वात्मानंदा प्रकाश वपुसे’.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sri sri ravi shankar article shivsutra