भाष्य : ‘असंसदीय’ शब्दांची संदर्भकथा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Om Birla

संसदेत सार्वजनिक धोरणांविषयी खुली, चिकित्सक चर्चा व्हावी, ही अपेक्षा असते. सभागृहातील अशा चर्चेला, वादविवादांना एक वेगळे महत्त्व असते.

भाष्य : ‘असंसदीय’ शब्दांची संदर्भकथा

- सुभाष कश्यप

संसदेत सार्वजनिक धोरणांविषयी खुली, चिकित्सक चर्चा व्हावी, ही अपेक्षा असते. सभागृहातील अशा चर्चेला, वादविवादांना एक वेगळे महत्त्व असते. असंसदीय शब्द कामकाजातून वगळण्याची तरतूद चर्चेची पातळी सांभाळण्यासाठी आवश्‍यक असली तरी कोणत्या संदर्भात ते शब्द वापरले आहेत, हे पाहणे आवश्‍यक असते. तसे झाले नाही तर मूळ हेतूलाच बाधा येऊ शकते.

अलीकडेच काही शब्दांना ‘असंसदीय’ ठरविण्यात आल्याने या तरतुदीविषयी चर्चा सुरू झाली. काही आक्षेपार्ह शब्दांना कामकाजातून वगळण्याचा इतिहास जुना आहे. सुरुवातीपासून लोकसभेचे अध्यक्ष किंवा पीठासीन अधिकाऱ्यांना हा अधिकार होता की सभागृहात कुठलाही शब्द ‘असंसदीय’ वाटला तर तो सभागृहाच्या नोंदीतून काढू टाकायचा. पीठासीन अधिकाऱ्याच्या मदतीला जे अधिकारी असतात ते प्रत्येक सदस्याचे भाषण काळजीपूर्वक ऐकतात; त्यांना कुठला शब्द तसा वाटतो, तो अध्यक्ष किंवा सभापती यांच्या संमतीने ते नोंदीतून वगळतात. त्यानंतर हे शब्द छापील शब्दकोशात सामील केले जायचे. पूर्वी या शब्दांचे संकलन होत नव्हते. १९८६-८७मध्ये पहिल्यांदा अशा प्रकारच्या संकलनाची गरज भासली. जेणेकरुन लोकप्रतिनिधींना हे माहिती असावे की कुठले शब्द असंसदीय मानले आहेत. अर्थात कोणत्या विशिष्ट संदर्भात ते असंसदीय मानले आहेत, हाही मुद्दा महत्त्वाचा असतो. ही पुस्तिका त्या उद्देशाने काढली गेली. याचा अर्थ ते शब्द सरसकट बाद ठरविण्यात आले आहेत, किंवा त्यावर बंदी घातली आहे, असे नाही.

सभागृहात उच्चारलेला अश्‍लील शब्द किंवा असे शब्द जे संसदेच्या प्रतिष्ठेविरुद्ध समजले जातात, अशा शब्दांना संपादित करुन नोंदीतून काढण्याचा अधिकार संसदेच्या पीठासीन अधिकाऱ्याला आहे. मात्र ते शब्द कुठल्या संदर्भात वापरले त्यावर ते अवलंबून आहे. काही शब्द असेही आहेत की, काही संदर्भात ते असंसदीय तर दुसऱ्या संदर्भात संसदीय समजले जातात. यापूर्वी प्रत्येक वर्षी या शब्दांची यादी बनवली जायची. असे अनेक शब्द आहेत की, ते कुठल्याच संदर्भात वापरले जाऊ शकत नाहीत.

काही शब्द संसदेच्या प्रतिष्ठेविरुद्ध आहेत, असे जर अध्यक्षांना किंवा तालिका अधिकाऱ्याला वाटले तर ते रेकॉर्डमधून काढणे ही बाब अध्यक्षांच्या अधिकारक्षेत्रात येते. मात्र व्यापक प्रमाणात शब्दांवर बंदी घालायला नको. कारण त्याने संसदेतले वादविवाद कठीण होतील. यावेळी जुमला, स्नूपगेट, विश्वासघात, ढोंगी, जयचंद, तानाशाही, करप्ट यांसारखे अनेक शब्द असंसदीय शब्दांच्या यादीत घातले आहेत. मात्र हे शब्द काही संदर्भात मान्य होतील; मात्र दुसऱ्या संदर्भात वापरल्यास अमान्य होऊ शकतात. काय संसदीय किंवा असंसदीय, याबद्दल कुठलाही ठोस निर्णय होऊ शकत नाही. उदा. शिवीगाळ करणारे सगळेच शब्द कुठल्याही संदर्भात वापरल्यास असंसदीय ठरतील. मात्र जुमला, स्नूपगेट, विश्वासघात, ढोंगी, जयचंद, तानाशाही असे अनेक शब्द आहेत की जे काही संदर्भात वापरल्यास संसदीय आणि काही संदर्भात असंसदीय ठरू शकतील. माझ्या मते, साचेबद्ध असा एकच एक नियम या बाबतीत लागू करता येत नाही. याचे भान ठेवणे मात्र आवश्‍यक आहे. या पुस्तिकेचा मूळ उद्देश हा होता की, भूतकाळात कुठल्या शब्दाला कोणत्या विषयचौकटीत असंसदीय समजले त्याची सदस्याला माहिती आणि भविष्यासाठी संकेत मिळावेत.

सर्वच देशातील प्रथा

जगातील सर्वच देशात संसदेत असंसदीय शब्द वापरण्यास मनाई आहे. ब्रिटिश ‘हाऊस ऑफ कॉमन्स’मध्ये कुठले शब्द असंसदीय आहेत, याची यादी आहे. पुस्तकही आहे. या व्यतिरिक्त राष्ट्रकुलातील देशातल्या संसदेत असंसदीय शब्दांच्या वापराला बंदी आहे. ते शब्द कामकाज नोंदीमधून काढले जातात. सुरुवातीला संसदेत विरोधी आणि सत्तापक्षाच्या सदस्यांकडून भाषणात वापरलेल्या शब्दांना फारसे आक्षेप घेतले जात नसत. माझ्या कार्यकाळात पहिल्यांदा असंसदीय शब्दांचे पुस्तक प्रकाशित झाले. भूतकाळात काय झाले ते सदस्यांना कळावे, हा त्यामागचा उद्देश होता. मात्र त्यात भविष्यासाठी काही सरसकट निर्देश नव्हते किंवा शब्द वापरावर सरसकट बंदीही नव्हती. मी जेव्हा ही पुस्तिका प्रकाशित केली तेव्हा खासदारांनी त्याचे सकारात्मक स्वागत केले. हाऊस ऑफ कॉमन्स, परदेशातील संसद, राज्यांच्या विधानसभांच्या कामकाजांचा अभ्यास करुन पुस्तिका बनवलेली होती. त्यावेळी लोकप्रतिनिधींनी त्याचे स्वागत केले होते.

संसदेत एक सदस्य बोलत असताना दुसऱ्याने ‘तुम्ही खोटं बोलत आहात’ असं म्हटल्यास, या संदर्भात खोटे हा शब्द असंसदीय मानला जाईल. त्यापेक्षा ‘तुम्ही जे म्हणताहेत ते बरोबर नाही,’ ‘मी सहमत नाही’, ‘ते वास्तवाला धरुन नाही,’ असे बोलणे सयुक्तिक ठरेल. संसदेत पंतप्रधान किंवा विरोधी पक्षाच्या सदस्याला, ‘तुम्ही खोटं बोलत आहात’, हे म्हणणे माझ्या मते असंसदीय होईल. मात्र ‘तुमचे बोलणे वास्तवाला धरुन नाही’, ‘सत्यापासून दूर आहे’ असं म्हटल्यास तेच विधान संसदीय मानले जाईल. त्यामुळे संदर्भ महत्त्वाचाच आहे.

चर्चा लोकशाहीचा आत्मा

संसदेचे अनेक नियम आहेत. सभागृहात घोषणाबाजी करणे, पत्रकबाजी, पोस्टर फडकावणे यावर नियमाने बंदी आहे. मात्र हल्ली सभागृहात याच गोष्टी जास्त घडतात. पूर्वी वादावादीवर खेळीमेळीने तोडगा काढला जाई. मात्र हल्ली छोट्या-मोठ्या वादावरुन सत्ताधारी आणि विरोधकांत मारामारी, वादविवाद होतात. एक लक्षात ठेवले पाहिजे की, संसदेचे व्यासपीठ हे घोषणाबाजी, आंदोलनासाठी नाही; वाद, संवाद, जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी आहे. संसदेचे ‘विट अँड ह्युमर’ हे पुस्तक आहे. ते वाचल्यास लक्षात येईल की, अनेकदा संसदेत उत्पन्न झालेल्या असंसदीय प्रसंगातून काय तोडगा निघाला आहे. एकदा पंतप्रधान इंदिरा गांधी अतिशय रागात होत्या, लोकसभेत त्या विरोधकांवर बरसत होत्या. अचानक मधू दंडवते आपल्या जागेवर उभे राहिले. ते म्हणाले, ‘मॅडम प्राईम मिनिस्टर, तुम्हाला मी नुकतंच दक्षिण आफ्रिका दौऱ्यादरम्यान दूरचित्रवाणीवर बघितलं, त्यावेळी तुमच्या मुद्रा मनमोहक होत्या. तुम्ही हसतमुख, आनंदी दिसलात. मात्र भारतात परतल्यावर नेमकं तुम्हाला काय झालं?’ हे ऐकताच इंदिरा गांधींचा राग निवळला आणि त्या हसायला लागल्या. असाच एक प्रसंग. विरोधी पक्षातील नेते आचार्य कृपलानी कसलेले भाषापटू आणि हजरजबाबी होते. एकदा सभागृहात त्यांनी काँग्रेसवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. सत्ताधारी काँग्रेसकडून एक ज्येष्ठ नेता उभा राहिला. तो म्हणाला, ‘आचार्य साहेबांनी हे विसरता कामा नये, की काँग्रेस असा पक्ष आहे की त्याने आचार्यजींच्या पत्नीला आकर्षित केले आहे.’ हजरजबाबी आचार्य ताडकन म्हणाले, ‘I

know congress man are fool, but now I realised are scoundrels too, running away with other people’s wives.’ मात्र या प्रसंगात स्काऊंड्रल हा शब्द असंसदीय मानला गेला नाही. उलट सारं सभागृह हास्यात बुडाले. कारण विधानाचा संदर्भ वेगळा होता. तुम्ही एखाद्या सदस्याला थेट स्काऊंड्रल म्हणालात तर तो शब्द असंसदीय ठरेल. त्यामुळे तुम्ही कुठल्या संदर्भाने बोलता, त्यावर तो संसदीय किंवा असंसदीय ठरेल.

(लेखक लोकसभेचे माजी सचिव आहेत.)

(शब्दांकन - विनोद राऊत)

Web Title: Subhash Kashyap Writes Context Of Unparliamentary Words

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Editorial Article
go to top