उत्तम खिलवणारे नि बोलणारे ‘जगन्नाथशेठ!’

जगन्नाथशेठची आणि माझी ओळख चक्क ५० वर्षांपूर्वीची. तेव्हा ‘वैशाली’चं नाव ‘मद्रास हेल्थ होम’ आणि ‘रुपाली’चं ‘मद्रास कॅफे’ होतं.
jagannathsheth shetty
jagannathsheth shettySakal
Summary

जगन्नाथशेठची आणि माझी ओळख चक्क ५० वर्षांपूर्वीची. तेव्हा ‘वैशाली’चं नाव ‘मद्रास हेल्थ होम’ आणि ‘रुपाली’चं ‘मद्रास कॅफे’ होतं.

आम्हा पुणेकर मराठी खवय्यांच्या पोटात सहजतेनं शिरलेला दाक्षिणात्य जगन्नाथशेठ शेट्टी यांचं नुकतचं निधन झालं. त्यांच्या सहवासातील आठवणींना उजाळा...

जगन्नाथशेठची आणि माझी ओळख चक्क ५० वर्षांपूर्वीची. तेव्हा ‘वैशाली’चं नाव ‘मद्रास हेल्थ होम’ आणि ‘रुपाली’चं ‘मद्रास कॅफे’ होतं. त्यांना मी मालक म्हणून गल्ल्यावर कधीच बसलेलं पाहिलं नाही. कडकचा पांढरा हाफ शर्ट, ग्रे पॅन्ट, माऊंट ब्लॅक पेन, लाँग नेस्ट घड्याळ अशा विशिष्ट आवडी जपत, सकाळी दहाच्या सुमारास ते हॉटेलमध्ये शिरत आणि मंद स्मित करत आम्हा ग्राहकांशी हितगूज करत. पदार्थांत विशेष काय आवडलय, कुणाची काही सूचना आहे का?, याचा अंदाज घेत.

ब्रेकफास्ट कम टेस्ट चेकिंग ‘वैशाली’तच

जवळजवळ तीन पिढ्यांच्या पोट्यात उडपी पदार्थांतून शिरलेल्या जगन्नाथशेठना स्वतःच्या पोटात सकाळी काय खात पदार्थ ढकलायला आवडतात, याची मला उत्सुकता होती. यावर ते एकदा माझ्याशी सविस्तर बोलले होते. ‘‘रोज अगदी रोज सकाळी माझं ब्रेकफास्ट कम टेस्ट चेकिंग ‘वैशाली’तच होतं. ‘वैशाली’त येण्यापूर्वी सकाळी घरी पाच ग्लास पाणी पिऊन दोन पपया खातो. एक तास मेडिटेशन करून मग फ्रेश होऊन ‘वैशाली’त येतो. थेट किचनमध्येच जातो. एका प्लेटमध्ये थोडं सांबार, अर्धी इडली, कधी छोटंसं टोमॅटो ऑम्लेट, अर्धा मेदूवडा, बटाटा वड्याचा तुकडा घेऊन खातो. टेस्टही होते, भूकही भागते. सायंकाळी दोनच पुरी टाकून ‘एचपीडीपी’ खातो. विश्‍वासानं माझ्या हॉटेलात प्रेमानं येणाऱ्या ग्राहकाच्या पोटात माझा पदार्थ जाण्यापूर्वी रोज चेक करणं महत्त्वाचं वाटतं.’’

‘चहा’वर तासन्‌तास चर्चा

चवीनं खिलवून आणि हळूवारपणे हसत चौकशी करून जगन्नाथशेठनं नाना तऱ्हेचे ग्राहक जोडले होते. पुरुषोत्तम करंडक किंवा फिरोदिया करंडक जिंकल्यावर सारे महाविद्यालयीन विजेते कलावंत इथंच येऊन दही बटाटा पुरी खात (एचपीडीपी). जल्लोष करत. फर्ग्युसन, बीएमसीसी, मराठवाडा इथं पाल्याला प्रवेश मिळवण्यासाठी रांगा लावणारे देशभरचे बहुभाषी पालक इथला ‘डोसा’ खाऊनच आपल्या गावी परतत. समोर जर्नालिझम डिपार्टमेंटमध्ये डोकावणारे पत्रकार ‘रुपाली-वैशाली’तल्या ‘चव’ न बदललेल्या ‘चहा’वर तासन्‌तास चर्चा करत. ब्रिटिश कौन्सिलमध्ये पुस्तक बदलायला येताना इथलं इडली-सांबार भुरकल्याशिवाय चैन पडत नसे आणि बरोबर अशा अभ्यासू मंडळींच्या हातातलं पुस्तक ममत्वानं स्वतः हातात घेऊन चाळून जगन्नाथशेठ प्रेम जोडत.

आई-बापाचं आणि त्यांच्या मुलांचं प्रेम इथं या जगन्नाथशेठच्या राज्यातच जुळलं आणि दोन पिढ्यांच्या या संकेतस्थळी दोन्ही पिढ्यातल्या कुणाचं कोण हे शेठना माहीत असे. विचारलं तर गमतीत सांगत. बॅडमिंटन, टेनिस खेळणाऱ्या ग्रुपपैकी एखाद्या डॉक्‍टरला दाताची वा पोटाची शंका विचारण्यासाठी ते सकाळी चक्कर लवकर टाकत. ज्यूदो कराटेवाले कधी येतात आणि भिशीवाल्या बायकांचा कलकलाट कधी होतो हे हॉटेलात क्वचितच डोकावणाऱ्या जगन्नाथशेठना अगदी अलीकडपर्यंत नेमकं माहीत होतं.

मराठी पदार्थांवर प्रेम

लॉकडाउनच्या दिवसातले काही काळ सोडल्यास चहा-सांबाराच्या चवीत ४०-४५ वर्षांत जराही बदल न झाल्याची ग्वाही पुणे भेटीवर आलेले अमेरिकास्थित फर्ग्युसोनियन देतात आणि ते पदार्थ खाता-खाता समोर डोकावणाऱ्या जगन्नाथशेठचाही अंदाज घेतात. ‘वैशाली’ची टेस्ट घेणं सोडून स्वतःच्या घरी जगन्नाथशेठ तुम्ही नेमकं काय खाता?’ असं थेट माझ्या अमेरिकेतल्या फिलाडेल्फियाच्या मित्राने त्यांना विचारले.

‘पूर्वी घरी रोज रात्री फिश किंवा मटण लागायचे. नंतर हिरव्या फ्लॉवरचं, ब्रोकोली किंवा टोमॅटो कॉर्न सूप आणि बाऊलभर फ्रूट सॅलड एवढाच रात्री आहार. दुपारी एक चपाती, थोडा भात, भेंडी, गवार, घेवडा, तोंडली यापैकी एक-दोन भाज्या, दुधी भोपळ्याची पातळ भाजी असं घरी माफक खाणं. फिश अगदी हवेच असे. नारळाची ग्रेव्ही रोज आवडे. आमच्या घरी माझ्या बायकोच्या म्हणजे शकुंतलाच्या मार्गदर्शनाखाली आमचा कुक नीर डोसा बनवतो तो खातो. पाण्याइतकं तांदळाचं पातळ पीठ, किती पातळ? तर एक किलोत १०० डोसे बनतील. खडकवासल्याजवळ स्वतःच्या मांडवी फार्मवरची फळं, पालेभाज्याच घरी आणतो. विशेष म्हणजे एकही महाराष्ट्रीयन मित्राघरचं लग्न मी चुकवत नाही. कारण मला अळूची भाजी आणि जिलेबी फारच आवडते.’’

जिलेबी तोंडात टाकत असल्याच्या आविर्भावात जगन्नाथशेठ मराठी पदार्थांवरचं प्रेम व्यक्त करत होते. गावोगावाहून शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या विद्यार्थ्यांचंही ‘रुपाली-वैशाली’ जगन्नाथशेठच्या पदार्थांवर ५० वर्षे प्रेम आहे. कुणी भेटलं की आठवणी हमखास. अलीकडेच जगन्नाथशेठ गेल्याची बातमी वाचली. त्याच दुपारी नगरचे ‘स्नेहालय’चे प्रदीप कुलकर्णी भेटले. ते मला म्हणाले, ‘‘अहो, आपले जगन्नाथशेठ गेले. मी ५० वर्षांपूर्वी ७१ सालचे एम. जे. होस्टेलला राहायचो. तिथून सकाळी चालत ‘वैशाली’ला यायचो. त्यावेळी अवघ्या १०-२० पैशांत प्यायलेला चहा अद्याप लक्षात आहे.’’

मुलींच्या लग्नासाठी मदत

मी स्वतः तर जगन्नाथशेठना ५० वर्षे अनुभवतोय. ते दक्ष इतके, की एक टोमॅटो जरी नासका निघाला तरी सारी टोपली फेकून द्यायला सांगत. शंभरहून अधिक लिटर सांबार शिळं झालं म्हणून ओतून द्यायला सांगितलेलं मी पाहिलंय. पदार्थात आम्ही (मी) विद्यार्थी असतानाही जराशी चवीची चूक काढली तर वेटर-कूकला ते दटावत. ते म्हणत, ‘वैशाली’ माझं देऊळ आहे. देवळात येणाऱ्याचा विश्‍वासघात होता कामा नये. पैशापेक्षा लोकांच्या मनातली प्रतिमा महत्त्वाची.’’ एंटरप्रिनर्स असोसिएशनचं क्वाॅलिटी ॲवॉर्ड त्यांना मिळालं होतं. देवाच्या तसबिरीला नमस्कार करण्यापेक्षा गावाकडच्या गरीब मुलींची लग्नं लावण्याकरता ते मदत करत.

पक्का पुणेकर

जाता-जाता मराठी चाहत्या खवय्यांसाठी एक गोष्ट नोंदवतो. एकदा पु.लं. आणि नंदा नारळकर ‘वैशाली’त येऊन गेल्यावर जगन्नाथशेठ मलाच म्हणाले होते की, ‘आज पु.ल. आले. छान वाटलं. अहो, मी त्यांचा चाहता आहे. ‘फुलराणी’ पाहिलंय. डॉ. श्रीराम लागूंचं ‘हिमालयाची सावली’ पाहिलंय.’

‘काय म्हणता?’ असे आश्‍चर्योद्‌गार माझ्या तोंडून येताच जगन्नाथशेठ मला म्हणाले, ‘‘अहो, या पुण्यातच सलग ५० वर्षे काढली आहेत. पक्का पुणेकरच आहे. पुण्याच्या मोकळ्या हवेत गोल्फ खेळायला, मराठी मित्राकडे अळूची भाजी चाखायला खूप आवडते.’’

तर असा आम्हा पुणेकर मराठी खवय्यांच्या पोटात सहजतेनं शिरलेला दाक्षिणात्य जगन्नाथशेठ गेला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com