शिवसृष्टीचे स्वप्न पूर्ण करू या

अनेक पिढ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची जाणीव करून देण्याचे आणि त्यांच्यात शिवप्रेरणा जागविण्याचे कार्य बाबासाहेब पुरंदरे यांनी केले.
shivshrusti
shivshrustisakal
Summary

अनेक पिढ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची जाणीव करून देण्याचे आणि त्यांच्यात शिवप्रेरणा जागविण्याचे कार्य बाबासाहेब पुरंदरे यांनी केले.

- सुमित्रा महाजन

अनेक पिढ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची जाणीव करून देण्याचे आणि त्यांच्यात शिवप्रेरणा जागविण्याचे कार्य बाबासाहेब पुरंदरे यांनी केले. त्यांचे ‘शिवसृष्टी’चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी योगदान द्यायला हवे. गेल्या वर्षी निधन पावलेले बाबासाहेब आज हयात असते तर त्यांचा शंभरावा जन्मदिन साजरा झाला असता.

शिवसृष्टी....! हे शब्द कानी पडताच छत्रपती शिवाजी महाराज यांनी पराक्रमाच्या जोरावर स्थापलेल्या आणि संगोपन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या कल्पनेनेच एका विलक्षण चैतन्याची अनुभूती होते. या भारत भूमीस शिवप्रभूंचा पदस्पर्श झाला आणि त्यांच्या कर्तृत्वानेच हिन्दवी स्वराज्याच्या स्वरूपात एका महान राष्ट्राने आकार घेतला. म्हणूनच देहत्यागाला तीनशे वर्षे उलटून गेल्यावरही महाराजांचे नाव एखाद्या प्रभावी मंत्रासारखे भारतीयांना प्रेरणा देत आहे. म्हणूनच आजही आपल्या येथे शिवभक्तीने मंतरून गेलेल्या पिढ्यान् पिढ्या आढळतात. शिवभक्तांच्या या मांदियाळीत शिवशाहीर स्व. बाबासाहेब पुरंदरे यांचे नाव अर्थातच सर्वोच्च स्थानी आहे.

जवळजवळ शतायुषी आयुष्यातील तब्बल सात दशके शिवाजी महाराज आणि शिवप्रताप यांचा निदिध्यास घेऊन जगणारा असा निरलस, निरपेक्ष आणि समर्पित शिवप्रेमी पुन्हा होईल का? ‘महाराज शिव छत्रपती’ हा जणू बाबासाहेबांच्या जगण्याचा मंत्र होता. शिवरायांचे चरित्र आणि विचारांचीच सेवा आणि प्रचार प्रसार त्यांनी केला. त्यांनी शिवरायांची थोरवी प्रत्येक व्यक्तीपर्यंत आणि विशेषतः युवकांपर्यंत समर्थपणे पोहचवण्याचा प्रयत्न केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा ध्यास घेतला. असंख्य ग्रंथ अभ्यासले, गड किल्ल्यांना भेटी दिल्या. सरदार घराण्यांकडून माहिती घेतली. अभ्यासाच्या आधारे त्यांनी शिवचरित्र सोप्या, रंजक, प्रभावी पद्धतीने लोकांसमोर मांडले. ‘राजा शिवछत्रपती’ ग्रंथाच्या माध्यमातून लाखो घरांपर्यंत शिवचरित्र पोहचविले, आणि ‘जाणता राजा’ महानाट्याद्वारे शिवचरित्र ओजस्वी पद्धतीने समजावून दिले.

शिवरायांच्या ओजस्वी कर्तृत्वाने आजच्या पिढीला विशेष करून तरुणांना झपाटून टाकेल, असा शिवशाहिरांचा प्रकल्प म्हणजेच ‘शिवसृष्टी’. या प्रकल्पामागे सुमारे पन्नास वर्षांची अखंड साधना आहे. बाबासाहेब पुरंदरे, राजमाता सुमित्राराजे भोसले, श्रीमंत प्रतापसिंहराजे भोसले, मुकुंदराव दाबके आदींनी एकत्र येऊन शिवचरित्राच्या प्रसारासाठी १९६७ साली ‘महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान’ची स्थापना केली. त्या संस्थेतर्फे शिवराज्याभिषेकाच्या ३०० व्या वर्षात, १९७४मध्ये मुंबईत शिवतीर्थावर अस्थायी शिवसृष्टी साकार करण्यात आली होती. तेथे लोकांना एकाच ठिकाणी शिवकार्य आणि शिवकाळ अनुभवता आला. यशवंतराव चव्हाण यांनी तेव्हा सूचना केली होती की, अशी शिवसृष्टी कायमस्वरूपी व्हावी. बाबासाहेबांच्या मनात ती कल्पना रुजली. विविध ठिकाणी व्याख्याने देऊन त्यांनी निधीसंकलनास सुरुवात केली. ‘जाणता राजा’च्या माध्यमातून येणारा सर्व निधी शिवसृष्टीसाठी जमा होऊ लागला. या निधी संकलनाच्या ध्यासापायी बाबासाहेबांनी जगभर व्याख्याने व ‘जाणता राजा’चे प्रयोग केले.

राज्य सरकारने १९९५मध्ये या प्रतिष्ठानला नऱ्हे आंबेगाव (बु.) येथे २१ एकर जमीन शुल्क आकारून खरेदीने दिली. तिथेच ही शिवसृष्टी साकारत आहे. सगळी हयात शिवाजी महाराजांच्या स्मृती आणि पराक्रमगाथा जागृत ठेवायच्या सेवेला समर्पित केल्यानंतर त्या अनुभवाचे फलित म्हणजे ही शिवसृष्टी. उच्च तंत्रज्ञान व कलाकौशल्य वापरून शिवसृष्टी तयार झाली पाहिजे, हे स्वप्न बाबासाहेबांनी बघितलं होतं. सर्वशक्तिनिशी ते पूर्ण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. हे कार्य कोणा एका व्यक्तीचं नाही आणि नसतंही. यासाठी संपूर्ण समाजाने उभे राहावे हा त्यांचा आग्रह होता. तसेच ही शिवसृष्टी छत्रपतींच्या इतमामाला साजेशी आणि जागतिक दर्जाची व्हावी, यावरही त्यांचा कटाक्ष होता. शिवसृष्टीला मेगा पर्यटन प्रकल्प म्हणून मान्यता मिळाली आहे. मात्र ती निव्वळ पर्यटन केंद्र म्हणून न राहता प्रेरणा व संस्कार केंद्र म्हणून विकसित व्हावे, ही बाबासाहेबांची संकल्पना होती.

बरोबर एक वर्षापूर्वी, १३ ऑगस्ट २०२१ रोजी, शतकवीर ‘पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे सत्कार समारोह समिती’च्या वतीने शंभराव्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा सत्कार झाला होता. या समितीची अध्यक्ष नात्याने मलाही या आयोजनात तिळभर हातभार लावता याला, याचा अभिमान वाटतो. शिवसृष्टीतील सरकार वाड्यातच हा कार्यक्रम झाला होता. त्यावेळीही शिवशाहिरांनी शिवसृष्टी पूर्ण करण्याचा विचार मांडला होता. मला आठवते, ते म्हणाले होते, “माझे परमदैवत असलेल्या शिवछत्रपतींचे स्मारक शिवसृष्टीच्या निमित्ताने उभे राहताना मी पाहतो आहे, ही आनंदाची बाब.

शिवछत्रपतींनी हिंदवी स्वराज्याची संकल्पना मांडून ती पूर्णत्वास नेली. महाराजांचे चरित्र हेच मूर्तिमंत स्वातंत्र्य व स्वराज्य आहे. अशा या महापुरुषाचे, योग्याचे हे स्मारक सर्वांना नेहमीच प्रेरणा देत राहील.” त्यांनी सुरू केलेलं हे काम बऱ्यापैकी प्रगती होऊनही अद्याप अपूर्ण आहे. हा प्रकल्प ३५० कोटींचा असून तो चार टप्प्यांत विभागला आहे. शिवसृष्टीचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून त्यासाठी सुमारे ५० कोटी रुपये खर्च झाले आहेत. सरकारवाडा बांधून पूर्ण झाला आहे. भवानी मंदिराचे आणि राजसभेचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. या शिवसृष्टीचा पहिला टप्पा लवकरच पूर्ण होऊन जनतेसाठी खुला होणार आहे. भविष्यात येथे दररोज १५ हजार लोक येतील, हे लक्षात घेऊन वाहनतळाची व इतर सुविधा उपलब्ध करण्यात येत आहेत. आगामी पाच-सहा वर्षांत संपूर्ण प्रकल्पाचे लोकार्पण व्हावे, या दिशेने प्रयत्न चालू आहेत. ही शिवसृष्टी साकार व्हावी आणि आपल्या राजांचा काळ, त्यांचे कर्तृत्व, त्यांचा पराक्रम याची झळाळी जगासमोर यावी, हे तमाम शिवप्रेमींचं स्वप्न आहे.

शिवसृष्टीचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत विश्रांती घ्यायची नाही, हा बाबासाहेबांचा बाणा होता. त्यांचा हा ध्यास पूर्ण करणे, हाच आपलाही संकल्प असला पाहिजे. ज्या प्रमाणे श्रीकृष्णाने करंगळीवर ‘गोवर्धन’ उचलला; पण सर्व बालगोपालांनी देखील आपापल्या काठ्या खाली धरून, आपापल्या क्षमतेप्रमाणे त्यास साहाय्य केले, त्याचप्रमाणे बाबासाहेबांच्या या गोवर्धनरूपी संकल्पपूर्तीसाठी आपण सर्वांनीच आपल्या क्षमते प्रमाणे योगदान द्यावे व बाबासाहेबांचे स्वप्न साकार करावे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

( लेखिका माजी लोकसभाध्यक्ष आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com