बाभळीची दोन रूपं

सुनीता तारापुरे
बुधवार, 10 एप्रिल 2019

नववर्षाच्या स्वागताचा गुढीपाडव्यासारखा सण नसता किंवा दिनदर्शिकेच्या पानानं फडफडून कालमहिमा सांगितला नसता, तरी जीर्ण पानं ढाळत उभ्या पिंपळानं अचानक पोपटी-अंजिरी साज ल्यालेला पाहताच जाणीव झालीच असती... नटली चैत्राली नवलाई! निसर्गाच्या अंकुरण्या-फुलण्या-कोमेजण्याशी आपल्या सण-उत्सवांचा किती छान मेळ घातला आहे आपल्या द्रष्ट्या पूर्वजांनी! ‘बा माणसा, तूही निसर्गाचा एक घटक(च) आहेस!’ हे मोठ्या चतुईनं आपल्या मनावर बिंबवलंय.

 चैत्राची चाहूल जशी तळपणाऱ्या उन्हातून, वड-पिंपळाच्या कोवळ्या पालवीतून, कोकिळेच्या आर्त सादेतून, चाफ्याच्या घमघमाटातून, गुलमोहोराच्या लालबुंद पिसाऱ्यातून लागते, तशी बाभळीच्या अंगावरल्या हळदी गेंदांमधूनही जाणवते. सूर्य आग ओकायला लागला, की त्याची पर्वा न करता फुलत-फुलतच जाणाऱ्या या झाडाचं मला कौतुक वाटतं. त्याचं मूळ म्हणे ऑस्ट्रेलियातलं; पण इतकं आपलं वाटतं, की त्याचं परकेपण उपरं वाटावं. बाभळीला शहरवासीयांनी कुंपणापलीकडंही स्थान दिलं नाही; पण शेत-मळ्यांच्या बांधावर ते रुजलं. जागा अडवत नाही, गर्द सावली नसल्यानं पिकांना अडचणीचं ठरत नाही, निगराणीखेरीज वाढतं म्हणून शेतकऱ्यांनी मात्र त्याला आपलंसं केलं. बांध पक्के करण्याकरिता नि काट्यांमुळे कुंपण म्हणूनही सलगी करू जाल, तर ‘रुतला बाई काटा’ म्हणत नाचायला लावणारी बाभूळ ‘काटा काट्यानं काढण्याचा’ सल्ला देत अंगचा काटा उदार मनाने बहालही करते. औदार्य एवढं, की तिच्या खोडावर केल्या तरी पाझरणाऱ्या अश्रुरूपी डिंकानंही आपल्याला आरोग्याचं दान देते. तिच्या काटक्‍यांनी ग्रामीण माउलींची चूल पेटती ठेवली. बाभळीचे पिवळे गेंद कानात लेऊन त्या वनकन्येसारख्या सजल्या. खोकल्यावरचं घरगुती औषध म्हणून तिच्या शेंगा आपल्या कडोसरीच्या बटव्यात सांभाळल्या.

पण, या बाभळीनं मला कोड्यात टाकलंय... ‘ती’ बाभूळ? की ‘तो’ बाभूळ? याक्षणी बाभळीवरच्या दोन कविता आठवताहेत. इंदिरा संतांची ‘बाभळी’ आणि वसंत बापटांची ‘बाभूळझाड.’ परस्परविरोधी, तरीही परस्परपूरक! इंदिरा संतांच्या कवितेतली बाभळी ‘‘येते परतुन नवेच होऊन, लेऊन हिरवे नाजूक लेणे, अंगावरती माखुन अवघ्या, धुंद सुवासिक पिवळे उटणे...’’ अशी लोभस, निरागस वनदेवीसारखी सृजनाचं रूप होऊन अवतरलीय; तर वसंत बापटांचं बाभूळझाड ‘‘अस्सल लाकूड भक्कम गाठ, ताठर कणा टणक पाठ, वारा खात गारा खात, बाभूळझाड उभेच आहे...’’ असं संघर्षरत रांगड्या मर्दगड्यासारखं आहे. एकाच बाभळीची दोन रूपं; शिव आणि शक्ती! जीवनाची दोन अंगं! परिपूर्णतेकडे नेणारी!

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sunita tarapure write pahatpawal in editorial