खारीचा वाटा

सुनीता तारापुरे
बुधवार, 29 मे 2019

नित्याची प्रभातफेरी. येता जाता कधीतरी दिसणारी सखी आज सोबत. हातात पिशवी आणि नजर भिरभिरती. विचारल्यावर कळलं, सकाळच्या या फेरफटक्‍यावेळी रस्त्यावरचा प्लॅस्टिकचा कचरा गोळा करून कचराकुंडीत टाकण्याचं काम ती नित्यनेमानं करतेय. या खारूताईकडं कौतुकानं पाहताना, घरासमोरचा रस्ता गल्लीच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत लख्ख झाडून काढणारे निवृत्त गृहस्थ आठवले. जवळजवळ दोनशे मीटरचा तो रस्ता मन लावून झाडताना त्यांना अनेकदा पाहिलं होतं. एकदा विचारलंच. तर म्हणाले, ‘हा कचरा डोळ्यांना खुपायचा; पण ऑफिसच्या वेळा सांभाळताना काणाडोळा करावा लागे. निवृत्तीच्या दुसऱ्याच दिवशी हातात खराटा घेतला आणि गल्ली लख्ख केली.

नित्याची प्रभातफेरी. येता जाता कधीतरी दिसणारी सखी आज सोबत. हातात पिशवी आणि नजर भिरभिरती. विचारल्यावर कळलं, सकाळच्या या फेरफटक्‍यावेळी रस्त्यावरचा प्लॅस्टिकचा कचरा गोळा करून कचराकुंडीत टाकण्याचं काम ती नित्यनेमानं करतेय. या खारूताईकडं कौतुकानं पाहताना, घरासमोरचा रस्ता गल्लीच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत लख्ख झाडून काढणारे निवृत्त गृहस्थ आठवले. जवळजवळ दोनशे मीटरचा तो रस्ता मन लावून झाडताना त्यांना अनेकदा पाहिलं होतं. एकदा विचारलंच. तर म्हणाले, ‘हा कचरा डोळ्यांना खुपायचा; पण ऑफिसच्या वेळा सांभाळताना काणाडोळा करावा लागे. निवृत्तीच्या दुसऱ्याच दिवशी हातात खराटा घेतला आणि गल्ली लख्ख केली. त्या दिवशी जे समाधान लाभलं त्याची तुलना नाही होऊ शकत कशाशी. आता सवयीनं पहाटे पाचला डोळे उघडतातच.’
पाच लिटर पाण्याचा कॅन कॅरियरला लावून सायकलिंगला बाहेर पडणारे एक परिचित नामांकित कंपनीत वरिष्ठ अधिकारी आहेत. सकाळी सायकलिंगच्या व्यायामाबरोबरच रस्त्याच्या कडेला लावलेल्या लहान झाडांना पाणी देण्याचं काम निष्ठेनं करतात. रस्त्याच्या दुभाजकावरल्या फुलझाडांची किंवा इतरांच्या घरासमोरची, कुंपणावरची फुलं ओरबाडून नेणारे खूप दिसतात. पण ही झाडं जगवण्याकरिता धडपडणारे दुर्मीळ. सत्तरीच्या घरातल्या उत्साही स्त्रियांचं महिला मंडळ आहे. नित्याच्या भजन कीर्तनाखेरीज, त्या कापडी पिशव्या शिवण्याचं काम करतात. स्वत:बरोबरच शेजारी नि परिचितांकडून जुन्या साड्या-ओढण्या आणतात. त्यापासून छोट्या-मोठ्या पिशव्या शिवून मंडईच्या दाराशी त्यांचं मोफत वाटप करतात. काही तरुणांनी ओसाड झालेल्या डोंगरांना पुन्हा हिरवा शालू नेसवण्याचा ध्यास घेतलाय. कोणी बियाण्यांची बॅंक बनवलीय नि मागेल त्याला फुकट वाटतोय. कोणी स्थानिक झाडांची रोपवाटिका तयार केलीय. कोणी निर्माल्य नदीत पडू नये म्हणून त्यापासून अगरबत्ती बनवतोय आणि मोफत देतोय. कोणी घरातल्या काडी-कचऱ्यापासून खतनिर्मितीचे प्रकल्प हाती घेतलेत. इतरांना त्याबाबतीत आग्रह नि मार्गदर्शन करतोय. आपला परिसर स्वच्छ, सुंदर, हरित आणि प्रदूषणमुक्त करण्यासाठी अशा काही खारोट्या आपापला वाटा उचलताहेत. निरपेक्ष. ‘मी एकट्यानं केल्यानं काय होणारेय’ हा विचारही शिवत नाही त्यांच्या मनाला. खारूताईची गंमत माहिती आहे ना? खाण्याकरिता कुठून कुठून शोधून आणलेल्या बिया ती जमिनीत लपवून ठेवते आणि नंतर स्वत:च विसरून जाते. अनुकूलता लाभताच भूमीच्या कुशीतल्या या बिया रुजतात, अंकुरतात, फोफावतात. इवल्याशा खारूताईच्या एवढ्याशा विसराळू कृतीनं जंगलं जगताहेत. मग आपला खारीचा वाटा आपणही उचलूया ना!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sunita tarapure write pahatpawal in editorial