अविचारानं जगून पाहूया!

सुनीता तारापुरे
बुधवार, 5 जून 2019

‘सगळे पैसे पाण्यात गेले. एवढी मोठी फी भरून ऋतुजाला त्या क्रिएटिव्हिटीच्या शिबिरात पाठवलं, तर ही पाहा हिची चित्रं...ना माणसं माणसासारखी दिसतायंत, ना प्राणी...’ ‘अगं, हे तिचं एक्‍स्प्रेशन आहे...’ ‘तू पण त्या शिबिरवाल्यांसारखीच बोलतेयंस. म्हणे माध्यम मुलं स्वत:च शोधतात नि त्यांच्या पद्धतीनं अभिव्यक्त होतात. ही असली चित्रं...’ ‘अगं, नीट पाहा ही चित्रं... कुणाचंही अनुकरण न करता स्वत:चं निरीक्षण, आकलन, कल्पनाशक्तीच्या जोरावर काढलेल्या या चित्रांसाठी ऋतुजाला शाबासकी द्यायला हवीस तू.

‘सगळे पैसे पाण्यात गेले. एवढी मोठी फी भरून ऋतुजाला त्या क्रिएटिव्हिटीच्या शिबिरात पाठवलं, तर ही पाहा हिची चित्रं...ना माणसं माणसासारखी दिसतायंत, ना प्राणी...’ ‘अगं, हे तिचं एक्‍स्प्रेशन आहे...’ ‘तू पण त्या शिबिरवाल्यांसारखीच बोलतेयंस. म्हणे माध्यम मुलं स्वत:च शोधतात नि त्यांच्या पद्धतीनं अभिव्यक्त होतात. ही असली चित्रं...’ ‘अगं, नीट पाहा ही चित्रं... कुणाचंही अनुकरण न करता स्वत:चं निरीक्षण, आकलन, कल्पनाशक्तीच्या जोरावर काढलेल्या या चित्रांसाठी ऋतुजाला शाबासकी द्यायला हवीस तू. हा क्रिएटिव्ह अँगल तिला त्या शिबिरामुळे मिळाला असेल तर त्या शिबिरवाल्यांचेही आभार मान.’ माझा मुद्दा पटला, न पटलासा चेहरा करून सखी शेजारणीनं निरोप घेतला.

मला वाटतं की क्रिएटिव्हिटी किंवा सर्जनशीलता यांसारखे मोठाले शब्द वापरून हे काहीतरी आपल्या जगण्यापेक्षा निराळं प्रकरण आहे, असा आभास निर्माण केला जातो. खरं तर नित्याच्या जगण्यातली प्रत्येक गोष्ट कलात्मकरीत्या करता येते. साधं झाडून काढण्याचं काम असेल, तेही मन लावून केलं, तर त्यावर आपला ठसा उमटतोच. संगीत-नृत्यादी कलेत रममाण झाल्यानं जेवढा आनंद मिळतो, तेवढा मनापासून केलेल्या घरकामांतूनही मिळू शकतो. प्रत्येकाकडं सर्जनशीलता असतेच. आपण ती वापरतो की नाही, कुठे नि कशी वापरतो, आपल्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन मिळतं की उपयुक्ततेच्या निकषावर तिचा गळा घोटला जातो या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात.

लहानपणी कुतूहलापोटी आपल्याला प्रत्येक गोष्ट पंचेंद्रियांनी स्वत: अनुभवायची असते. आपापल्या पद्धतीनं ती अभिव्यक्त करायची असते. पण संस्कारांच्या नावाखाली घरात काय किंवा शाळेत काय हे कुतूहल, सर्जनशीलता संपवण्याचा प्रयत्न होतो. त्यामुळं परिसरात दिसत नसूनही किंवा प्रत्यक्षात पाहिलेलं नसतानाही, मुलांनी चितारलेल्या सूर्योदयाच्या देखाव्यात डोंगराआडून उगवणारा सूर्य, झुळझुळणारा झरा, झोपडी, भिरभिरणारी पाखरं नि नारळाचं झाड दिसतं. वेगळं काही करू पाहणारा, सांगू पाहणारा वेडा ठरतो म्हणून हे वेगळेपण ठाकूनठोकून एका विशिष्ट चौकटीत बसवण्याचा प्रयत्न होतो. यामध्ये जे काही कोवळं, चांगलं, वेगळं आपल्या आत असतं ते नष्ट होत जातं. बंदिस्त साचलेपण येत जातं. ज्या कुणा व्यक्तींना आपण आता क्रिएटिव्ह म्हणून ओळखतो, त्यांना हयातभर वेडेपणाचा शिक्का माथी मिरवावा लागला होता, हे विचारात घेता शहाणपणाच्या चाकोरीतून बाहेर पडून कधीतरी आपणही थोडंसं अविचारानं जगून पाहणं आवश्‍यक आहे. नाही?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sunita tarapure write pahatpawal in editorial