हास हास माझ्या जिवा...

सुनीता तारापुरे
बुधवार, 19 जून 2019

प्रभातफेरीकरिता बाहेर पडते, तेव्हा ट्रॅकवर सहसा कोणी नसतं. परतताना काही नित्याचे चेहरे दिसायला लागतात. बोलायला फुरसत नसते. नाव-गाव काय, कुठं राहतात, नोकरी की व्यवसाय, काही ठाऊक नाही. समोरासमोर येताच नजरा चुकवून जाणाऱ्यांना मी हसून ‘सुप्रभात’ म्हणत अभिवादन करते. सुरवातीला कुणी प्रत्युत्तर द्यायचं, कुणी नाही. काहींच्या कपाळावर आठ्या चढायच्या. काहींच्या नजरेत संशय असायचा, तर काहींच्या चेहऱ्यावर आश्‍चर्य उमटायचं. पण रोजच्या हास्याच्या देवघेवीतून हळूहळू मोकळेपणा आला. संशय निमाला. तटस्थपणा गळून पडला. तसं तर अजूनही परिचय फारसा नाहीच. तरीही सोबतीने येणाऱ्यांपैकी कोणी दिसलं नाही, तर चौकशी होते.

प्रभातफेरीकरिता बाहेर पडते, तेव्हा ट्रॅकवर सहसा कोणी नसतं. परतताना काही नित्याचे चेहरे दिसायला लागतात. बोलायला फुरसत नसते. नाव-गाव काय, कुठं राहतात, नोकरी की व्यवसाय, काही ठाऊक नाही. समोरासमोर येताच नजरा चुकवून जाणाऱ्यांना मी हसून ‘सुप्रभात’ म्हणत अभिवादन करते. सुरवातीला कुणी प्रत्युत्तर द्यायचं, कुणी नाही. काहींच्या कपाळावर आठ्या चढायच्या. काहींच्या नजरेत संशय असायचा, तर काहींच्या चेहऱ्यावर आश्‍चर्य उमटायचं. पण रोजच्या हास्याच्या देवघेवीतून हळूहळू मोकळेपणा आला. संशय निमाला. तटस्थपणा गळून पडला. तसं तर अजूनही परिचय फारसा नाहीच. तरीही सोबतीने येणाऱ्यांपैकी कोणी दिसलं नाही, तर चौकशी होते. कोणाचा उतरलेला चेहरा पाहून तब्येतीची विचारपूस होते. मुला-नातवंडांच्या यशाचे पेढे हातावर ठेवले जातात. या स्नेहबंधाची सुरवात साध्याशा हास्यातून झाली. एकमेकांकडं बघून स्नेहभावानं केलेलं निर्मळ हास्य! खरं तर हे असं साधं, सरळ हसू आपल्या बालपणी आपण खूप झेललेलं आहे. तितक्‍याच दिलखुलासपणे समोरच्याकडं टोलवलं आहे. मग आज हास्य समाजजीवनातून हरवलंय काय? मुळीच नाही. उलट अलीकडं हसण्याचा वापर सातत्यानं केला जातोय. पण त्याला चढवलेला कृत्रिमतेचा मुलामा आपल्याला अस्वस्थ करतो. विक्रेत्यांचं कमावलेलं हसू, दूरचित्रवाणी वाहिन्यांवरच्या निवेदकांचं नाटकी हसणं, राजकीय पुढाऱ्यांचं धूर्त, मतलबी हास्य, स्वागतकक्षातल्या सराईतांचं कमावलेलं आर्जवी हास्य... कितीतरी उदाहरणं देता येतील अशा कृत्रिम, फसव्या हास्याची. या प्रकारांची सवय झाल्यानं कदाचित आपण निर्हेतुक, निर्मळ हसू विसरून गेलो असू काय? लहान मूल दिवसातून चारशे वेळा, तरुण सतरा वेळा, तर ज्येष्ठ क्वचितच हसतात. त्यामुळंच वयाच्या उत्तरार्धात व्याधी जडतात. तेव्हा निरोगी राहायचं तर हसा, भरपूर हसा, असा सल्ला मिळाल्यानं हास्यक्‍लबात जाऊन हातवारे करत हसण्याचा उपक्रम होतोय. ‘आपल्याला विनोदबुद्धी आहे’ हे इतरांच्या मनावर ठसवण्यासाठी पातळी सोडून केलेल्या विनोदाला नि अंगविक्षेपाला ओढूनताणून हसलं जातं. पण अशा हसण्यानं मनाचा मोर थोडाच थुईथुई नाचायला लागणार आहे? त्याकरिता हसू अंत:करणातूनच उमलून यायला हवं. नातवंडांना पाहताच हास्यानं उजळणारा आजी-आजोबांचा चेहरा काय, आईच्या कुशीतल्या बालकाचं निर्व्याज खळाळतं हसू काय किंवा मित्र-मैत्रिणींच्या गोतावळ्यातलं दिलखुलास हास्य काय... ते हृदयातून उचंबळून आलेलं असतं. एकमेकांविषयी वाटणाऱ्या प्रेमाचं, स्नेहाचं, विश्वासाचं प्रतीक! जीवनाकडं निकोप, निर्मळ, स्वागतशील दृष्टीनं पाहण्याच्या वृत्तीचं निदर्शक!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sunita tarapure write pahatpawal in editorial