‘नाम’मुद्रा : जीवनाचे सार सांगणारे सूर

इकडे मुंबईत राजकीय (तार)स्वर लागलेले असतानाच लास वेगासहून सोमवारी पहाटे आलेल्या एका बातमीने भारतीयांची मान पुन्हा एकदा अभिमानाने उंचावली.
Falguni shah
Falguni shahSakal
Summary

इकडे मुंबईत राजकीय (तार)स्वर लागलेले असतानाच लास वेगासहून सोमवारी पहाटे आलेल्या एका बातमीने भारतीयांची मान पुन्हा एकदा अभिमानाने उंचावली.

इकडे मुंबईत राजकीय (तार)स्वर लागलेले असतानाच लास वेगासहून सोमवारी पहाटे आलेल्या एका बातमीने भारतीयांची मान पुन्हा एकदा अभिमानाने उंचावली. संगीतप्रेमींसाठी सर्वश्रेष्ठ असलेल्या यंदाच्या ६४व्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात भारतीय वंशाची फाल्गुनी शहा हिच्या ‘अ कलरफुल वर्ल्ड’ अल्बमने छाप पाडली आणि शास्त्रीय संगीताची पताका अमेरिकेत फडकली. विशेष म्हणजे फाल्गुनीने बालसंगीतातील उत्कृष्ट कामगिरीसाठी पुरस्कार मिळवला आहे. जागतिक संगीत क्षेत्रात मूळच्या मुंबईकर गायिकेने मोठ्या मेहनतीने हे साध्य केले.

तिच्या गाण्याला पाश्चिमात्य किनार असली, तरी प्राचीन भारतीय शास्त्रीय संगीताचे अनोखे मिश्रण मनात रुंजी घालते. आई किशोरी दलाल यांच्याकडून तिला शास्त्रीय गायनाचे धडे मिळाले. तिसऱ्या वर्षापासून फालू सप्तसूरांत रमू लागली. फाल्गुनीने जयपूर घराण्याच्या शास्त्रीय संगीतात तालीम घेतली आहे. कौमुदी मुन्शी यांच्याकडून तिने बनारसी ठुमरीचे शिक्षण घेतले. उदय मुझुमदार यांच्याकडून ती उपशास्त्रीय संगीत शिकली. प्रसिद्ध सारंगीवादक आणि गायक उस्ताद सुलतान खान अन् किशोरी आमोणकर यांच्यासारख्या आघाडीच्या शास्त्रीय संगीत गायकांकडून गायकीचे धडे घेतल्याने तिचा स्वतःचा एक बाज तयार झाला. पुढे पती गायक-गीतकार गौरव शहा यांच्या सान्निध्यात त्याला बहार आला. फाल्गुनीने जयपूर घराण्याच्या संगीत परंपरेचे प्रशिक्षण घेताना दररोज सुमारे १५ ते १६ तास रियाज केला. २००० मध्ये संगीताचा अभ्यास करण्यासाठी ती बोस्टनला गेली. तिथे इंडो-अमेरिकन बॅण्डमध्ये सहभाग घेत मुख्य गायिका बनली. त्यानंतर सुरू झाला तिचा इंडो-वेस्टर्न संगीत प्रवास... आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संगीतकारांबरोबर काम करण्याची तिला संधी मिळाली. ए. आर. रहमान, यो-यो मा, फिलिप ग्लास, वायक्लेफ जीन, ब्लूज ट्रॅव्हलर, रिकी मार्टिन आणि बर्नी वॉरेल यांच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय स्टारसोबत ती शिकत गेली.

अमेरिकेत आल्यानंतर फाल्गुनीने विद्यापीठ, क्लब आणि फेस्टिव्हल वर्तुळात प्रवेश केला. बोस्टनमधील संगीत विद्यापीठात दोन वर्षांचे भारतीय संगीत अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर ती न्यूयॉर्कला स्थायिक झाली आणि तिथे तिने ‘फालू’ नावाने स्वतःचा बॅण्ड तयार केला. मग न्यूयॉर्कमध्ये तिच्या संगीत मैफली रंगू लागल्या. २००५ मध्ये न्यूयॉर्कमधील कार्नेजी हॉलमध्ये भारतीय संगीताची राजदूत म्हणून तिची नियुक्ती झाली. जानेवारी २००८ मध्ये फॉक्स चॅनेलवर ‘फालू बॅण्ड’ झळकला.

फाल्गुनीने ऑगस्ट २००७ मध्ये आपली पहिली सीडी आणली. त्यानंतर लगेचच तिच्या ‘इंडी हिंदी’ संगीतशैलीने ‘वॉल स्ट्रीट जर्नल’मध्ये म्युझिकल हायब्रीडच्या नव्या वर्गाचे प्रतिनिधी म्हणून ठसा उमटवला. मे २००९ मध्ये ‘टाइम’साप्ताहिकात फालूने जगातील १०० प्रभावशाली व्यक्तींमध्ये स्थान मिळवले. त्यानंतर आले ‘स्लमडॉग मिलेनिअर’ चित्रपटातील संगीतकार ए. आर. रहमान यांच्यासोबत ‘जय हो’ गाणे... २००९ मध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यासाठी व्हाईट हाऊसमध्ये तिने ए. आर. रहमान यांच्याबरोबरीने सादरीकरण केले. काळा-गोरा भेद काय, असा प्रश्न जेव्हा फालूच्या मुलाला पडला तेव्हा संगीताच्या माध्यमातूनच तिने जीवनाचे सार सांगण्याचा प्रयत्न केला. रंगीबेरंगी खडूंचे महत्त्व तिने आपल्या गाण्यांत अधोरेखित केले. त्यातून मुलांना संदेश दिला, की जग ब्लॅक अॅण्ड व्हाईट नाहीये. त्यात अनेक रंग आहेत... बालमनाला पडलेले प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न तिने ‘अ कलरफुल वर्ल्ड’मधून केला आहे. तिच्या गाण्यातील प्रत्येक बोल जीवनाचे सार सांगतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com