सर्वांगीण बदलांसाठी ‘स्वास्थ्यम्’ उपयुक्त

श्रीमद्‌भगवद्‌गीतेचा विचारांचा जगभरात प्रसार करणारे प्रेरणादायी व्याख्याते म्हणून गौरांग दास यांची ओळख आहे.
Gaurang Das
Gaurang DasSakal
Summary

श्रीमद्‌भगवद्‌गीतेचा विचारांचा जगभरात प्रसार करणारे प्रेरणादायी व्याख्याते म्हणून गौरांग दास यांची ओळख आहे.

श्रीमद्‌भगवद्‌गीतेचा विचारांचा जगभरात प्रसार करणारे प्रेरणादायी व्याख्याते म्हणून गौरांग दास यांची ओळख आहे. मनुष्य जन्म कशासाठी हे सांगत असताना त्याची कर्मे कोणती याची साध्या शब्दात मांडणी ते करतात. इस्कॉनची विविध जबाबदारीची पदे सध्या ते सांभाळत असून मुंबईजवळ ‘गोवर्धन इकोव्हिलेज’ विकसित केले आहे. ‘स्वास्थ्यम्’ उपक्रमात येत्या रविवारी (ता. ११) सकाळी त्यांना ऐकण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. या उपक्रमाबद्दल व एकूणच मानसिक- शारीरिक आरोग्य, त्यासाठी भारतीय संस्कृतीत व परंपरेत दिलेले उपाय यावर त्यांनी व्यक्त केलेले विचार.

मानसिक आणि शारीरिक आरोग्याच्या दृष्टीने आपला समाज आज कुठल्या स्तराला आहे?

- जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, २०२२च्या शेवटापर्यंत भारतातील सुमारे २० टक्के लोक मानसिक आजारापासून पीडित असतील. सुमारे ५.६ कोटी भारतीयांना नैराश्याने ग्रासले आहे, तर ३.८ कोटी भारतीय चिंता विकाराने ग्रस्त आहेत. सन २०१२ ते २०३० दरम्यान मानसिक आजारासंबंधी समस्येवर भारताने केलेला आणि करावा लागणारा खर्च सुमारे एक ट्रिलियन अमेरिकी डॉलर (२०१० च्या डॉलर किमतीनुसार) एवढा आहे. भारतीय मानसोपचार सोसायटीच्या अंदाजानुसार, भारतात सुमारे नऊ हजार मानसोपचारतज्ज्ञ आहेत आणि त्यात दरवर्षी सुमारे ७००ने भर पडते. याचाच अर्थ एक लाख भारतीयांच्या मागे ०.७५ मानसोपचारतज्ज्ञ आहेत. एक लाख लोकसंख्येमागे किमान तीन मानसोपचारतज्ज्ञ असावेत हे योग्य मानले जाते. याचा अर्थ भारताची लोकसंख्या लक्षात घेता सध्या २७ हजार मानसोपचारतज्ज्ञांची गरज आहे. जगाच्या लोकसंख्येचा विचार केला तर (२०१८ नुसार) जगभर ९७ कोटी लोकांना मानसिक आजार आहे. ‘चिंता’ हा जगात सर्वांत जास्त आढळणारा मानसिक आजार आहे. याचा फटका सुमारे २८.४ कोटी लोकांना बसला आहे. मानसिक आजार हा जास्त करून पुरुषांपेक्षा (९.३ टक्के) महिलांना (११.९ टक्के) सतावत आहे. मानसिक आजारामध्ये काही चिंता, नैराश्‍य, गैरवर्तन करणे हे सर्वसाधारपणे आढळणारे आजार आहेत.

शारीरिक आरोग्यासाठी भारतीय संस्कृती कोणता खजिना उपलब्ध आहे?

- १) योग : भारतात प्राचीन काळापासून योगविद्येचा वापर केला जातो. यात विविध आसने आणि प्राणायाम यांचा समावेश आहे. आसन म्हणजे सावकाश शरीर ताणण्याचा व्यायाम असून, ज्यासाठी शरीराची प्रत्यक्ष हालचाल करणे गरजेचे आहे, तर प्राणायाम म्हणजे श्‍वासावर एका लयीमध्ये नियंत्रण ठेवणे. ज्यामुळे मानसिक आरोग्याला लाभ होतो. अनुलोम-विलोम हा प्राणायामचा सर्वांत प्रसिद्ध प्रकार असून, यात एक नाकपुडी बंद ठेवून दुसऱ्या नाकपुडीतून दीर्घ श्‍वास घेतला जातो. योगबाबत जनजागृती होऊन त्याचा लाभ सर्वांना व्हावा, या हेतूने २१ जून हा दिवस दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो.

२) आयुर्वेद : आयुर्वेदामध्ये वापरले जाणारे सर्वच पदार्थ हे सेंद्रिय आणि पर्यावरणास अनुकूल असे असतात. आयुर्वेदाचे अनेक शारीरिक फायदे आहेत- जसे की, ते शरीराला खोलवर स्वच्छ करतात. अन्न व वाईट राहणीमानामुळे शरीरात निर्माण झालेले टॉक्सिनसारखे घातक घटक साफ करण्याचे काम पंचकर्म उपचारपद्धतीतून होतात. ताण हलका करून चांगली झोप देण्याचे काम आयुर्वेद करते. शरीराचे योग्य वजन राखण्याचे कामही आयुर्वेद उपचारपद्धतीतून होते. चांगल्या त्वचेसाठीही आयुर्वेद फायदेशीर आहे.

३) गवतावर अनवाणी चालणे : अनेक संशोधनातून हे सिद्ध झाले आहे, की गवतावर अनवाणी चालल्याने चांगली झोप मिळते, वेदना कमी होते, स्नायूंवरील ताण कमी होतो आणि तणावाची पातळीही कमी होण्यास मदत होते.

४) उपवास : हिंदू संस्कृतीमध्ये अनेक व्रतवैकल्ये असतात, तर मुस्लिमांमध्ये रोजा असतात. दोन्हींमध्ये उपवास हा महत्त्वाचा घटक असतो. उपवासामुळे वजन कमी होण्यास मदत होते, चयापचय गतिमान होते आणि मेंदूचे कार्य सुधारते. या प्राचीन भारतीय परंपरेचा लाभ घेण्यासाठी लोक त्यांच्या सोयीनुसार वेगवेगळ्या प्रकारचे अधूनमधून उपवास करू शकतात.

५) तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे : तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढू शकते, पचनास मदत होते, जखमा बरी होण्याचा वेळ कमी लागतो, सांधे मजबूत होतात आणि पचन सुधारते. सकाळी कोमट पाणी पिणे, सूर्य नमस्कार, हाताने खाणे, चांदीची भांडी वापरणे अशा अनेक चांगल्या गोष्टी भारतीय परंपरेने दिलेल्या आहेत.

योग संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार गेल्या दशकभरात सर्वाधिक होतो आहे का, त्यामागे कोणती कारणे आहेत?

- लोक शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिकरित्या शांती मिळवण्याचे मार्ग शोधत आहेत. योगाचा सराव समाजातील सर्व स्तरातील लोकांमध्ये करता येतो. यासाठी कोणत्याही उपकरणाची किंवा व्यायामशाळेत स्वतंत्र गुंतवणुकीची गरज नाही. गरज आहे ती खुल्या मनाची आणि शिकण्याची आणि सराव करण्याची इच्छा. गेल्या १२ वर्षांत योगासने करणाऱ्या अमेरिकन लोकांच्या संख्येत ६३.८ टक्के वाढ झाली आहे. योगासनांमुळे लवचिकता सुधारते, शरीर मजबूत होते, संतुलन राखले जाते, श्वास शुद्ध होतो, चांगली झोप लागते, फुफ्फुसांच्या क्षमतेत मदत होते, तणाव आणि नैराश्य कमी होते; तसेच साखर, रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करण्यासाठी योग मदत करतो.

जगाचा योगासनांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपल्याला कसा वाटतो?

- अमेरिकेच्या लोकसंख्येपैकी दहा टक्के लोक योगाभ्यास करतात. २०१० ते २०२१ दरम्यान योगाची लोकप्रियता ६३.८ टक्के वाढली आहे. अमेरिकेत सध्या सात हजार योग स्टुडिओ आहेत आणि एक लाख योग शिक्षकांची योग अलायन्समध्ये नोंदणी आहे. ३० ते ४९ वयोगटातील स्त्रिया सर्वांत जास्त योगाभ्यास करतात. २८ टक्के योग अभ्यासक पुरुष आहेत. जागतिक योग उद्योग आकडेवारीनुसार बाजाराचा आकार ८८ अब्ज अमेरिकन डॉलरपेक्षा पेक्षा जास्त आहे. एका अंदाजानुसार जगभरात ३० कोटी योग अभ्यासक आहेत.

‘स्वास्थ्यम्’बद्दल काय सांगाल?

- ‘स्वास्थ्यम्’ हा एक उत्तम उपक्रम आहे, जो मानसिक निरोगीपणा आणि सर्वांगीण कल्याणासाठी संपूर्ण दृष्टिकोन देतो. आजच्या युगात, विशेषतः कोविड १९ महासाथीनंतर, मानसिक आरोग्यावर भर देण्याची गरज पूर्वी कधीही नव्हती. अशा परिस्थितीत, हा उपक्रम राबविल्याबद्दल आणि अशा प्रकारची जनजागृती केल्याबद्दल मी आयोजकांचे कौतुक करतो. देशातील विविधतेची जाणीव असलेल्या ‘स्वास्थ्यम्’ अनेक पर्याय उपलब्ध करून देत आहे. लोकांना सेंद्रिय शेतीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी घरच्या घरी सराव कसा सुरू करू शकतो ते शिकवणे; शाश्वत जीवन ते निरोगी स्वयंपाकासाठी मार्गदर्शन व त्याचबरोबर तज्ज्ञांना ऐकण्याची संधी व त्यांच्या मार्गदर्शनातून पुढे कार्यरत राहण्यास मदत करणारा हा उपक्रम आहे.

अशा उपक्रमामध्ये आपल्याला प्रेक्षकांकडून काय अपेक्षा आहेत?

- मी सर्व वाचक/प्रेक्षकांना प्रथम स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन करीन. तुम्ही स्वतःसाठी महत्त्वाचे आहात. स्वतःची काळजी घ्या, तुमच्या आरोग्याची, शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिकतेची कदर करा. खुल्या मनाने ‘स्वास्थ्यम्’सारख्या मंचाचा लाभ घ्या, उपलब्ध विविध पर्यायांचा शोध घ्या, तज्ज्ञांकडून त्यांच्या जीवनकथा ऐका, निरोगी जीवनासाठी आयोजित केल्या जाणाऱ्या विविध कार्यशाळांमध्ये सहभागी व्हा, तज्ज्ञांना भेटा आणि निरोगीपणाचा अनुभव घ्या. अशाप्रकारे, तुम्ही जीवनातील बदलाचा अनुभव घेऊ शकता. मी तुम्हा सर्वांना निरोगी आरोग्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com