esakal | कलाबहर : भाव, ऊर्जेचा आविष्कार वारली चित्रकला
sakal

बोलून बातमी शोधा

kalabahar

कलाबहर : भाव, ऊर्जेचा आविष्कार वारली चित्रकला

sakal_logo
By
गायत्री देशपांडे

-गायत्री तांबे-देशपांडे

दोन त्रिकोण, त्यावर एक गोळा, त्याला जोडणारी एक काडी आणि मग हाता-पायासाठी दोन-दोन काड्या काढल्या की झालं! इतकी सोप्पी तर आहे वारली चित्रकला! असे मत आपल्यापैकी बहुतेकांचे असेल. माझेही होते कधी; पण आता नाही. ते त्रिकोण, त्या काड्या नव्हे तर त्या रेषा, यांमध्ये किती अर्थ, भाव, ऊर्जा सामावलेलं आहे हे राजेश वांगड या आदिवासी वारली चित्रकाराशी बोलल्यावर लक्षात आलं. आपल्या समाजाबद्दल, परंपरेबद्दल आणि कलेबद्दल त्यांचा आदर आणि प्रेम प्रत्येक शब्दांत जाणवत होते. वरवर सोपी दिसणारी ही कला केवळ चित्रकला नसून, वारली समाजजीवनाचा महत्त्वाचा भाग आहे.

प्रत्येकाला ती अवगत असते, ही परंपरा शेकडो वर्षे चालू आहे. परंपरागत पद्धतीत लाल मातीने/शेणाने भिंती सारवल्यावर, उखळीत तांदूळ कुटून त्याची पेस्ट बनवतात. मग बांबूच्या काडानी चित्रण होते. लग्नसमारंभात वर-वधूच्या घरी सुवासिनींना आमंत्रित करतात, त्यांनी ‘लग्नचौक’ लिहायचा (चित्रित करायचा). गावातील लहान-मोठे सर्व यात सहभागी होतात, मुक्तपणे चित्रण करतात.

निसर्गाच्या सान्निध्यातील हा आदिवासी समाज निसर्गदेवतेला पूजतो. बदलत्या ऋतूप्रमाणे त्यांच्या चालीरीती, सण, उत्सव जसे बदलतात तसेच त्यांची चित्रं. घराच्या भिंती हाच त्यांचा कॅनव्हास. त्यांची निरीक्षण क्षमता आणि निसर्ग याचा सुरेख मेळ म्हणजे त्यांची चित्रं. ‘‘आम्ही जे अनुभवतो, निरीक्षण करतो तेच चित्रित करतो. तेव्हाच ते चित्रण जिवंत होते,’’ हे त्यांचं म्हणणं पूर्ण पटलं मला. मोजून मापून, आधी शीघ्र रेखाटने करून, विचार करून केलेली ही कला नव्हेच! एक कथा, कल्पना जशी कथाकार सांगतो, तसेच सहज, ओघवत्या पद्धतीत हे ‘कथा चित्रण’ घडते. तुम्ही बोलत असतानाच त्याचे चित्रण करतो, इतके सहज! चित्र जेव्हा इतकं सहज घडतं तेव्हा त्यातून वेगळीच ऊर्जा आपल्यापर्यंत पोचते.

वारली चित्रकलेला आज जगात मानाचे स्थान आहे. पद्मश्री जिव्या सोमा म्हसे यांनी ही कला जगात वेगळ्याच उंचीवर नेली. राजेश वांगड ही पताका पुढे नेणारा एक. दैनंदिन जीवन व निसर्गाचे निरीक्षण या चित्रांचा विषय ठरवते. उत्सवांत सर्वजण एकत्र येऊन नाचतात. त्याचे चक्राकृती चित्रण आपण अनेकदा बघतो. वारली चित्रकला कधी करायची, काय व कशी करायची याची वेळ व पद्धत असते, शास्त्र असते. प्रत्येक आकृतीमागे कहाणी असते. त्यात चित्रकाराचा प्रत्यक्ष अनुभवच चित्रीत होतो, एखाद्या दिनदर्शिकेसारखे. आज बदलत्या काळाबरोबर त्यांच्या घराच्या भिंती सिमेंटच्या झाल्या. मागणी जशी वाढली तसे चित्रांचे पृष्ठभाग बदलले. पेपर, कॅनव्हास, रंगाचा वापर होऊ लागला. आज राजेशजींनी जगातील घडामोडी, बदलता काळ, कोरोना हे विषय चित्रीत केले आहेत. जगातील प्रतिष्ठित संग्रहालयांमध्ये उदा. मोमा (MOMA), टेट मॉडर्न, त्यांना मानाचे स्थान आहे.

प्रगती मैदान, मुंबई विमानतळ या ठिकाणीही त्यांची चित्रं विराजमान आहेत. ‘आम्ही एकमेकांची चित्रं एका रेषेवरूनही ओळखतो,’ हे ऐकताना गंमत वाटली. रेषा सर्वांत महत्त्वाची. ती शुद्ध असावी. त्यात रस असावा. एक शक्ती, एक भाव असावा -प्रामाणिक! दोन रंगांतील ही चित्रं पण यात किती भाव दडून असू शकतात. बरं यातही नियम आहेत बरं का आणि ते प्रत्येक जण शिकतोच, अगदी सहज, नकळत. त्या कलेचा अभ्यास केला तर नक्की समजेल. त्रिकोण हा या कलेचा आधारस्तंभ! दोन त्रिकोणात ही कला सामावून आहे, हे ते सांगतात तेव्हा त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन मिळतो. व्यवहारज्ञान शिकतानाही या कलेची शुद्धता या समाजाने जपली आहे. आंतरराष्ट्रीय प्रकल्पातून कलेच्या माध्यमातून हा समाज प्रगतिपथावर आहे. ही कला आमच्या समाजाची आहे. या कलेच्या माध्यमातून आम्हाला रोजगार मिळाला. ही आम्हाला मिळालेली नैसर्गिक देणगी आम्ही अनंत काळ चालू ठेवूच, असा विश्‍वास वांगड अभिमानाने वारली समाजाचे प्रतिनिधी म्हणून देतात.

loading image
go to top